अंगावर शहारे आणणारी थंडी, समोर धगधगती शेकोटी, सोबतीला जीवाभावाचे मित्र आणि त्यात एखाद्या गाण्याची सुरकुती मैफल... अशा वातावरणात संध्याकाळ आणखी रंगते ती फक्त एका गिटारच्या साथीने! शेकोटीच्या उजेडात गिटारच्या तारा छेडत गाण्याला सूर द्यावा, अशी इच्छा आपल्यापैकी अनेकांच्या मनात दडलेली असते. पण गिटार शिकण्याचे धडे गिरवणे प्रत्येकालाच जमते असे नाही. संगीताची हीच नितांत आवड असणाऱ्या, पण वाद्यांची कोणतीही पूर्वपार्श्वभूमी नसणाऱ्या नवशिक्यांसाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये एक अतिशय देखणा आणि संगीतमय आविष्कार अवतरला आहे. वरून पाहताना कॅप्सूलच्या आकाराचा एक स्टायलिश ब्लूटूथ स्पीकर वाटणारे हे उपकरण सहज उघडताच त्याचे रूपांतर एका आधुनिक डिजिटल ट्रॅव्हल गिटारमध्ये होते. संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता, केवळ एका क्लिकवर एखाद्या कसलेल्या कलाकारासारखी सुरेल धून निर्माण करण्याची जादू या गॅजेटने प्रत्येकाला बहाल केली आहे.
पॉकेट गिटार हे मूळ गाण्यांना झटपट म्युझिक बॅकिंग देण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. जेव्हा हे उपकरण बंद असते, तेव्हा ते कॅप्सूलच्या आकाराच्या एका स्टायलिश ब्लूटूथ स्पीकरसारखे दिसते. मात्र, ते उघडताच एका भौमितिक रचनेच्या आकर्षक गिटारचे रूप धारण करते. पारंपरिक वाद्यांप्रमाणे यावर तारा किंवा अवघड फ्रेटबोर्ड नसतो. हे गॅजेट थेट मोबाईल ॲपशी कनेक्ट होते. युझरला फक्त ॲपमध्ये जाऊन आपले आवडते गाणे किंवा प्रीसेट निवडायचे असते आणि हे म्युझिकल शॉर्टकट मशिन बॅकग्राऊंड रिदम आणि कॉर्डस् स्वतःहून हाताळते.
या गॅजेटचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. संगीत तयार करताना युझरच्या डाव्या हातासाठी १४ कस्टमायझेशन पर्याय असणारे ७ बार पॅड दिले आहे, ज्यावर फक्त बोटे फिरवून कॉर्डस् बदलता येतात. तर उजव्या हातासाठी एक खास स्ट्रम नॉब दिला आहे, जो गिटारच्या तारा छेडल्यासारखा डायनॅमिक प्रतिसाद देतो. यामध्ये सिंग अँड प्ले मोड दिला आहे, जो क्लिष्ट कॉर्ड प्रोग्रेशन आणि तालाचे व्यवस्थापन स्वयंचलितपणे करतो. तर सोलो मोडमध्ये प्रत्येक बटणावर स्वतंत्र नोट सेट करता येते. म्हणजेच संगीत क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेली व्यक्तीही यावर उत्तम ताल धरू शकते.
या उपकरणाची स्पीकर सिस्टीमदेखील तितकीच दमदार आहे. यामध्ये १० व्हॅटचे दोन फुल रेंज ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, जे ४० हर्टझ् ते २० किलोहर्टझ् फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि बेसयुक्त आवाज देतात. संगीत वाजवायचे नसेल, तेव्हा हे उपकरण एक उत्तम ब्लूटूथ स्पीकर म्हणून गाणी ऐकण्यासाठी वापरता येते. यात चार्जिंग आणि डिजिटल ऑडिओ ट्रान्सफरसाठी यूएसबी-सी पोर्ट आणि ३.५ मिमी जॅक दिला आहे. यातील ३,२५० एमएएचची बॅटरी सलग ८ तासांचा प्लेबॅक टाईम देते, जी अवघ्या २ तासांत फास्ट चार्ज होते.
नावात जरी ‘पॉकेट’ असले तरी हे गॅजेट पँटच्या खिशात मावणारे नाही. पण ते वजनाने अवघे ८०० ग्रॅम असून सहज फोल्ड करून लहान बॅगेत किंवा पाठीवर अडकवून नेण्यासारखे कॉम्पॅक्ट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची मर्यादित काळासाठी प्री-ऑर्डर किंमत भारतीय चलनात अंदाजे १९ ते २४ हजार रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. - आशिष शिंदे