डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
मुलांमधील आवडनिवड, गुण, स्वभाव वैशिष्ट्ये, कौशल्ये बाहेर काढण्यासाठी उन्हाळी सुट्टी मोलाची ठरते. वर्षभर ही मुलं अभ्यासात, क्लासमध्ये इतकी गुंतलेली असतात की, त्यांना खेळ, व्यायाम, आरोग्य, मनोरंजन, भावना, प्रेरणा, फावला वेळ मिळतच नाही. व्यक्तिमत्त्व घडवण्याची ही संधी सुट्टीच्या निमित्तानं त्यांना मिळते. तिचं सोनं करणं हे पालकांच्या हाती आहे.
एक मे ते 13 जून या कालावधीत मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. सुट्टीमध्ये मुलांनी काय करावं, हा निर्णय घेण्यासाठी पालकांच्या विचारांची कल्पनांची, हिमतीची, भावनांची खरी कसोटी असते. ‘बरे होते ते दिवस... मुलं दिवसभर शाळेत होती. आपण बिनधास्त होतो...’ असं पालकांना वाटते; पण आता 45 दिवस मुले घरी असणार आहेत. या 45 दिवसांच्या वाटेवर आपल्याला कधी नैराश्य येईल, संकट वाटेल, मनात गोंधळ उडेल आणि कधी तर आपल्या सद्सद्विवेक बुद्धीची परीक्षाच घेतली जाईल. मुलांमधील आवडनिवड, गुण, स्वभाव वैशिष्ट्ये, कौशल्ये जास्तीत जास्त बाहेर काढण्यासाठी उन्हाळी सुट्टी मोलाची ठरते. वर्षभर ही मुलं अभ्यासात क्लासमध्ये इतकी गुंतलेली असतात की, त्यांना खेळ, व्यायाम, आरोग्य, मनोरंजन, भावना, प्रेरणा, फावला वेळ मिळतच नाही. चांगल्या पालकांना आपल्या पाल्याने गोंगाट करावा, पसारा करावा, उड्या माराव्यात, थोडेसे भांडावे, चांगले वाचावे, नमपणाने वागावे, रोज खेळावे असे वाटते.
सुट्टीमध्ये मुलांबरोबर राहण्याचा आनंद लुटण्यासाठी मुलांबरोबर वेळ घालवणे, ते काय काय करतात याचे निरीक्षण करणे, ते कशामुळे उदास होतात, कशामुळे दुखावले जातात, कशामध्ये त्यांना गंमत वाटते, कशामुळे त्यांची करमणूक होते, कोणती गोष्ट त्यांना आकर्षित करते, कशामुळे त्यांना कंटाळा येतो आणि कशामुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होतं, या सगळ्याची माहिती करून घेणं हे महत्त्वाचं आहे. पाल्याची तब्येत कशी आहे? त्याच्या आवडीनिवडी काय आहेत? तो कशात रमतो? त्याच्यामधल्या त्रुटी कोणत्या, हे समजल्यामुळे पाल्याच्या बलस्थानाचा वापर करून पूरक कार्यक्रम निवडता येतील.
नियोजन
सोमवारी खेळ, मंगळवारी वाचन, बुधवारी पोहणे, गुरुवारी मनोरंजन, शुक्रवारी कला, शनिवारी नातेवाईक, मित्र यांना भेटी व रविवारी आऊटिंग हा एक नमुना आहे. दैनंदिन नियोजनात सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंत व सायंकाळी पाच वाजून नऊ वाजेपर्यंत वेळ आहे. उन्हाळा असल्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळात मुले घरीच असलेली बरे. लवकर उठण्याची सवय लावण्यासाठी ही सुट्टी फार उपयुक्त आहे. स्वतःचे अंथरूण स्वतः आवरणे अशा गोष्टी त्यांनीच करायला हव्यात. दुपारी बारा ते चारमध्ये इनडोअर गेम्स, वाचन करावे. पाचनंतरची वेळ मात्र फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये एखादा बाहेरचा मैदानी खेळ, टीव्ही कार्यक्रम, एखादे दिवशी त्यांच्या आवडीचा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणे, नातेवाईकांना भेटणे, क्षेत्रभेटी असे कार्यक्रम असावेत. रात्री दहा वाजता झोपण्याची सवय लावणे, यासाठी ही सुट्टी महत्त्वाची आहे.
संकटांना सामोरे जायचे शिकवा
शालेय वयातच मुलांना नवनवीन शिकण्याची अनुभव घेण्याची, बोध घेण्याची, चुका करण्याची आणि अवघड मार्ग शोधून संकटांना, समस्यांना, प्रश्नांना सामोरे जाण्याची भेटण्याची सवय हवी. पालक म्हणून आपण यासाठी परवानगी द्यायलाच हवी. त्यांनी धोका पत्करला नाही, तर ते शिकणार कसे? धीट, धाडसी होणार कसे? सुट्टीमध्ये मुलांना सायकल चालवणे, पोहणे, झाडावर चढणे, ट्रेकिंगला जाणे, शिबिरासाठी बाहेर जाणे, बसने प्रवास करणे, घरचा किराणा, भाजी आणणे या गोष्टींसाठी भरपूर वेळ आहे. सुट्टीमध्ये या गोष्टी त्यांना करू द्या. यातच खरा व्यक्तिमत्त्व विकास आहे. काही गोष्टीत धोका जास्त असेल, तर नकारही द्या व तो नकार पचवायचं कौशल्य त्यांना शिकवा. आपण जर सुरक्षितता-सुरक्षितता म्हणून सगळ्या गोष्टीला नकार दिला, तर आपली मुलं काहीच नवीन शिकणार नाहीत आणि मोठे झाल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला असमर्थ ठरतील.
आहार
ज्यामध्ये काहीही पोषणमूल्य नाही असे पदार्थ मुलांनी जास्त खाल्ले, तर त्यांचं वजन वाढणार आहे. लहान वयापासूनच आपण ज्या खाण्याच्या सवयी लावू, ज्या पद्धतीने ते खातील त्या सवयी नंतर मोडणं खूप अवघड जातं. त्यामुळे सुट्टीपासूनच योग्य सवयी लावण्याबाबत आपण जागरूक राहूया. मोठेपणी त्यांची तब्येत ठणठणीत राहील, असा आहार घेण्याच्या सवयी त्यांना लावूयात. अन्न वाया घालवणे हे चुकीचे आहे, हे त्यांना आताच सांगितले पाहिजे.
राग आवरा
मुले अनुकरणप्रिय असतात. घरातल्या मोठ्या माणसांची वागणूक त्यांना खूप काही शिकवत असते. काही वेळा आपला तोल सुटतो, वेडेवाकडे शब्द तोंडातून बाहेर पडतात. अशावेळी मात्र पंचाईत होते. मुले नेमकं याचं अनुकरण लवकर करायला शिकतात. आपल्याला संयम पाळणे आवश्यक आहे. रागाबरोबरच मुलांना मारणेही योग्य नाही. तुमचं व्यक्तिगत मत काहीही असो, मारण्याने काहीही योग्य होत नाही. उलट मुलं कोडगी होतात, असाच सर्वत्र अनुभव आहे. मारण्याने काही वेळा मुलांच्या मनावर भावनिक परिणामही होतो. त्यामुळे मुले कमी बोलणं पसंत करतात. विशेषतः सुट्टीमध्ये या गोष्टी जास्त घडतात आणि यासाठी फक्त पालकच जबाबदार असतात. राग आला तर त्यासाठी पाच सकारात्मक शिक्षा शोधून ठेवा. पॉझिटिव्ह पनिशमेंट शोधणं हे पालकत्वाचं महत्त्वाचं काम आहे
सुंदर घर
घर या शब्दात ‘घ’ आणि ‘र’ ही दोन अक्षरे आहेत. ‘घ’ म्हणजे घडण्यासाठी किंवा घडविण्यासाठी आणि ‘र’ म्हणजे राहणे किंवा रमणे असा अर्थ येथे अपेक्षित आहे. आपल्या पाल्यांना हे समजणे आवश्यक आहे. घरातल्या प्रत्येकाचे एकमेकांशी सूर जुळावेत ही जबाबदारी पालकांची आहे. ‘घर’ या संकल्पनेत आई-बाबांची घरातील भूमिका, व्यवहार, आचारविचार, संकल्प यांना सर्वोच्च स्थान आहे. सुट्टीमध्ये मुलं हे दिवसभर पाहणार आहेत. आपलं घर याविषयी मुलांच्या मनात ‘माझं सुंदर घर’ ही संकल्पना दृढ व्हावी, त्यासाठी सुट्टीमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावे, असे वाटते.