स्मार्ट मिरर  (Pudhari File Photo)
संपादकीय

Smart Mirror Technology | स्मार्ट मिरर

सध्या प्रत्येकजण आरशात पाहताना आपण कसे दिसतो, यापेक्षा त्वचेवर काय बदल झालेत, याकडे अधिक लक्ष देतो.

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

सध्या प्रत्येकजण आरशात पाहताना आपण कसे दिसतो, यापेक्षा त्वचेवर काय बदल झालेत, याकडे अधिक लक्ष देतो. पूर्वी स्किन केअर ही फक्त मुलींची गोष्ट मानली जायची. आमचं काय, तोंडावर पाणी मारलं की आम्ही तयार, असे म्हणणारे तरुणही आज फेसवॉश, सीरम आणि ऑईल्सच्या विश्वात आपल्या त्वचेसाठी योग्य स्किन केअर प्रॉडक्ट शोधण्यात व्यस्त दिसतात. शहरांपासून अगदी गावखेड्यांपर्यंत ही स्किन केअरची क्रेझ पाहायला मिळते; पण कोणते प्रॉडक्टस् वापरायचे, आपली त्वचा नेमकी कशाप्रकारची आहे आणि कोणत्या भागाला अधिक काळजी हवी, या गोंधळात अनेकजण अडकतात. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही.

सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक भन्नाट स्मार्ट आरसा तयार झाला आहे. तुम्ही या आरशात पाहताच काही सेकंदांत तुमच्या त्वचेची सर्व माहिती हा तुम्हाला देईल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्किन अ‍ॅनालिसिस सोल्युशन प्रणालीचा भाग असलेल्या या स्मार्ट आरशात पाहिल्यानंतर काही क्षणांत तो चेहरा स्कॅन करतो. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहर्‍याचे विश्लेषण करून सात महत्त्वाच्या घटकांवर निदान केले जाते.

जसे की, पोअर्स (रोमछिद्र), सुरकुत्या, तेलकटपणा, मेलास्मा (पिग्मेंटेशन), लालसरपणा, मुरुमे आणि त्वचेतील ओलावा व तेलाचा समतोल. हे सर्व 90 टक्क्यांहून अधिक अचूकतेने ओळखले जाते. या स्मार्ट मिररला वापरणे अगदी सोपे आहे. फक्त आरशासमोर उभे राहा आणि त्याला चेहरा स्पष्ट दिसेल अशा अंतरावरून आरशात पाहा. ऑटो फेस रिकग्निशन तंत्रज्ञानामुळे आरसा तुमचा चेहरा स्वतःच स्कॅन करतो. मेकअप केलेला असलात तरी त्वचेचे विश्लेषण अचूक होते. काही सेकंदांत तुमच्या मोबाईल अ‍ॅपवर त्वचेचा रिपोर्ट दिसतो. कोणत्या भागात समस्या आहे आणि कोणता स्किन केअर उपाय हवा, हे त्यात स्पष्ट नमूद असते.

फिचर्सबाबत बोलायचे झाले, तर हा स्मार्ट मिरर खरंच थक्क करणारा अनुभव देतो. हा आरसा त्वचेची स्थिती काही सेकंदांत तपासतो आणि वापरकर्त्याला रिअल-टाईम स्किन अ‍ॅनालिसिस देतो. एवढेच नाही, तर भविष्यात त्वचा काळानुसार कशी बदलेल याचाही अंदाज तो अचूक देतो. त्यामुळे वापरकर्त्याला योग्यवेळी योग्य स्किन केअर उपाय करणे शक्य होते. हा आरसा तुमच्या त्वचेसाठी योग्य असलेली उत्पादने ओळखतो आणि फक्त तुमच्यासाठीच कस्टमाईज्ड शिफारशी देतो. त्याचबरोबर यामध्ये इंटरॅक्टिव्ह अनुभवही आहे, यामुळे आरसा थेट वापरकर्त्याशी संवाद साधतो आणि त्वचेवरील सूक्ष्म बदल समजावून सांगतो. त्वचेतील दीर्घकाळातील सुधारणा ट्रॅक करणंही याच्याद्वारे सहज शक्य होते. या स्मार्ट मिररची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणपणे 45 ते 55 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. प्रीमियम मॉडेल्समध्ये अधिक रिझोल्यूशन असलेले कॅमेरे, प्रगत विश्लेषण तंत्र आणि लाईव्ह प्रॉडक्ट शिफारशी यासारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT