AI Rakshak | चालता-बोलता ‘एआय’ रक्षक! 
संपादकीय

AI Rakshak | चालता-बोलता ‘एआय’ रक्षक!

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

‘अरे बापरे, तुम्ही जिन्यातून पडलात का?... थांबा, मी घरच्यांना आत्ताच फोन लावतो!’... एखाद्या इमर्जन्सीवेळी तुमच्या मदतीला धावून येणारे हे शब्द घरातल्या कोणा व्यक्तीचे नसून, तुमच्या सभोवताली फिरणार्‍या एका छोट्याशा फुटबॉलचे आहेत! ऐकायला अजब वाटेल, पण गॅजेट वर्ल्डमध्ये आता अशा एका स्मार्ट फुटबॉलसारख्या दिसणार्‍या रोबोची एन्ट्री झाली आहे. ज्याला दोन मोठे क्यूट डोळे आहेत आणि तो चाकांवर गरगर फिरत संपूर्ण घराची सुरक्षा सांभाळतो. एआय तंत्रज्ञानाने सज्ज असलेला हा अनोखा फॅमिली बॉट आता घरातील निर्जीव उपकरणांची जागा घेऊन तुमचा एक नवा कौटुंबिक मित्र बनणार आहे.

आजवर आपण घरात फक्त कचरा साफ करणारे किंवा एका कोपर्‍यात शांतपणे बसून राहणारे रोबो पाहिले आहेत. पण हा रोबो घरातून फिरतो. घरातल्या लहान मुलांशी, पाळीव प्राण्यांशी खेळण्यासोबतच तुमच्या आरोग्याची आणि घराच्या सुरक्षेची काळजीही घेतो. ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखे वाटत असले, तरी आता हे प्रत्यक्षात आले आहे.

हा रोबो दिसायला अत्यंत आकर्षक असून याचा आकार एखाद्या फुटबॉलसारखा गोल आहे. याच्या दर्शनी भागावर जपानी ‘कावाई’ शैलीतील मोठे, भावुक डोळे डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून चमकतात, जे या मशिनला एक जिवंत पाळीव प्राण्यासारखे रूप देतात. हे यंत्र म्हणजे एका प्रकारे चाके असलेला चालता-बोलता एआय असिस्टंट आहे. हा रोबो स्वतःहून पूर्ण घरात फिरू शकतो, घरातील सदस्यांचे आवाज आणि व्हिडीओ नोटस् रेकॉर्ड करू शकतो आणि अगदी स्वयंपाकघरात काम करताना तुम्हाला हव्या असलेल्या रेसिपीज किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामांचे रिमाईंडर्स देखील बोलून दाखवू शकतो. बॅटरी संपत आल्यास हा स्वतःहून आपल्या चार्जिंग स्टेशनकडे जातो आणि स्वतःला टॉपअप करून घेतो.

रोबोचा सर्वात मोठा आणि व्यावहारिक फायदा म्हणजे घरात एकट्या राहणार्‍या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींची काळजी घेणे. यामध्ये ‘फॉल डिटेक्शन’सारखे अत्यंत प्रगत सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत. जर घरातील एखादी वृद्ध व्यक्ती चक्कर येऊन पडली, तर हे यंत्र त्वरित ओळखून नातेवाईकांना अलर्ट पाठवते. इतकेच नाही, तर या रोबोमध्ये टू वे व्हिडीओ कॉलची सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल, तरी या छोट्या रोबोच्या माध्यमातून घरातील व्यक्तीशी थेट संवाद साधू शकता आणि त्यांना तातडीने मदत हवी आहे का, याची खात्री करू शकता.

सुरक्षेच्या दृष्टीने यात नाईट व्हिजन कॅमेरे आणि अत्याधुनिक सेन्सर्स देण्यात आले आहेत, जे रात्रीच्या वेळी देखील घरावर पाळत ठेवतात. आता चर्चा करूया याच्या किमतीची. हा बहुगुणी फॅमिली बॉट आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 500 पौंड म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 50 ते 53 हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT