Smart Door Lock | चेहरा पाहताच घराचा दरवाजा उघडेल स्मार्ट कुलूप! 
संपादकीय

Smart Door Lock | चेहरा पाहताच घराचा दरवाजा उघडेल स्मार्ट कुलूप!

पुढारी वृत्तसेवा

घरच्या सुरक्षेचा विचार केला की, आजही आपण मजबूत कुलूप आणि किल्लीवरच भर देतो. मात्र, अनेकदा घाईघाईत बाहेर पडताना कुलूप लावायचे विसरणे, किल्ली हरवणे किंवा हातामध्ये जड पिशव्या असताना खिशातून किल्ली शोधणे हा मोठा मनस्ताप ठरतो. डिजिटल युगात बायोमेट्रिक आणि फिंगरप्रिंट लॉक्स आले खरे; पण हात ओले किंवा खराब असल्यास तेही नीट काम करत नाहीत. या सर्व कटकटींवर मात करण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये आतापर्यंतचे सर्वात हाय-टेक आणि प्रगत स्मार्ट डोअर लॉक आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे कुलूप केवळ तुमच्या चेहऱ्याकडे पाहून अवघ्या एका सेकंदात घराचा दरवाजा उघडू शकते.

वाचायला थोडे नवल वाटेल; पण अगदी जसा तुमचा फोन फेस अनलॉक सिस्‍टीमने ओपन होतो तसेच तुमच्या घराचे दारदेखील आता उघडेल. स्मार्ट होम सिक्युरिटी क्षेत्रात नवनवे लॉक्स बाजारात दाखल होत आहेत. हे जगातील पहिले असे डेडबोल्ट लॉक आहे, ज्यामध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोनसारखे प्रगत थ्री-डी स्ट्रक्चर्ड-लाईट फेशिअल रेकग्‍निशन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे कुलूप यूजरच्या चेहऱ्यावर २० हजारांहून अधिक इन्फ्रारेड डॉटस्‌ प्रक्षेपित करते, ज्यामुळे चेहऱ्याचा अचूक थ्री-डी नकाशा तयार होतो. मिलिमीटर पातळीवरील ही अचूकता असल्यामुळे कोणताही फोटो किंवा व्हिडीओ दाखवून हे कुलूप फसवता येत नाही, ही याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

या गॅजेटचे आणखी एक सर्वात हटके वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ चेहराच नाही, तर दरवाजाला हात न लावता अनलॉक करण्यासाठी पाम व्हेन रेकग्‍निशन म्हणजेच हाताच्या तळव्यावरील रेषा व शिरा ओळखण्याचे तंत्रज्ञान दिले आहे. जर तुमचे हात ओले असतील, मातीने माखलेले असतील किंवा फिंगरप्रिंट सेन्सर स्कॅन करणे कठीण असेल, तर फक्त कुलपाच्या समोर तळहात दाखवूनही दरवाजा उघडता येतो. याशिवाय, हे स्मार्ट लॉक मॅटर-ओव्हर-वायफाय तंत्रज्ञानाला सपोर्ट करते, ज्यामुळे ते घरातील इतर स्मार्ट उपकरणांशी आणि होम इको-सिस्टीमशी थेट कनेक्ट होते.

दरवाजा उघडण्यासाठी या गॅजेटमध्ये एकाच वेळी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. यूजर्स मोबाईल ॲप, पासवर्ड, एनएफसी कार्ड, व्हॉईस असिस्टंट, स्मार्टवॉच, पारंपरिक चावी आणि सेमीकंडक्टर फिंगरप्रिंट यापैकी कोणत्याही पद्धतीने घर अनलॉक करू शकतात. इतकेच नाही, तर जिओफेन्सिंगच्या मदतीने तुम्ही घराच्या जवळ पोहोचताच दरवाजा आपोआप अनलॉक होण्याची सुविधाही यात आहे. या संपूर्ण उपकरणाला पॉवर देण्यासाठी १०,००० एमएएचची रिचार्जेबल लिथियम बॅटरी वापरण्यात आली असून, ती एकदा चार्ज केल्यावर तब्बल १२ महिने म्हणजेच वर्षभर आरामात चालते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT