अपत्य की आपत्ती? pudhari photo
संपादकीय

अपत्य की आपत्ती?

प्रमोशन घेताना आणि विशेषत: प्रशासकीय पदावर येताना कुटुंब लहान असणे आवश्यक असते

पुढारी वृत्तसेवा
कलंदर

एका मनपामधील एक अधिकारी सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने शिल्लक असताना सेवेतून बडतर्फ झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असणार्‍यांच्या बाबतीत हा काही पहिलाच प्रकार नाही. प्रमोशन घेताना आणि विशेषत: प्रशासकीय पदावर येताना कुटुंब लहान असणे आवश्यक असते. अशा अधिकार्‍यांच्या बाबतीत तिसरे अपत्य ही एक प्रकारची आपत्तीच म्हणावी लागेल.

सदर अधिकार्‍याने लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. याचा अर्थ तारुण्यात केलेली किंवा निसर्गत: झालेली चूक सेवानिवृत्तीच्या आसपासच्या काळात कशी महाग ठरू शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.तिसरे अपत्य झाल्यानंतर त्यांनी जे काय पेढे किंवा जिलेबी वाटली असेल त्यावरून सर्व सहकार्‍यांना समजले की तिसरे अपत्य यांच्या घरात जन्मलेले आहे. प्रतिज्ञापत्र देण्यास टाळाटाळ केल्यानंतर या अधिकार्‍याच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्यात आली आणि या यामध्ये त्यांना तीन आपत्ये असल्याचे सिद्ध झाले. प्रमोशन देताना अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यांना प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती दिली होती. इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तिसरे अपत्यही ता बर्‍यापैकी मोठे म्हणजे सज्ञान झालेले असेल आणि आपल्या आई-वडिलांनी केलेला प्रताप त्याही अपत्याला कळालेला असेल. एखाद्याचा जन्म एखाद्याचे करिअर कसे उद्ध्वस्त करू शकते याचेही हे नमुनेदार उदाहरण म्हणावे लागेल.

सदरील अधिकार्‍याने मनपा प्रशासनाने माझी बाजू समजून घेतली नाही हे अन्यायकारक आहे असे म्हटले आहे. ते जी स्वतःची बाजू मांडणार आहेत ती मात्र रंगतदार असण्याची शक्यता आहे. आमची दोघांची इच्छा नव्हती, पण त्याला न जुमानता अनावधानाने निसर्गत: हे घडून आले त्याचा दोष मला देण्यात येऊ नये, अशी आहे. पहिल्या दोन मुली असल्यामुळे वंशाला दिवा पाहिजे म्हणून सर्व कुटुंबाचा आग्रह होता. विशेषतः माझ्या वयोवृद्ध आई-वडिलांनी दोन नाती पहिल्या पण नातू पाहण्याची त्यांची इच्छा होती आणि आयुष्याच्या अंतिम पर्वात त्यांची इच्छा पूर्ण करणे हे माझे पुत्र म्हणून कर्तव्य होते असाही युक्तिवाद ते करू शकतात. ते जे काय असेल ते असो; परंतु प्रशासनाने त्यांची बाजू ऐकून घेतली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

आपल्याकडे कोणाही व्यक्तीवर काही अन्याय झाला तर कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची त्याला संधी असते. सदरील अधिकारी महोदयांनी कोर्टामध्ये जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि कोर्ट आपल्याला न्याय देईल याविषयी विश्वासही व्यक्त केला आहे. राजकारणामध्ये सरपंचपदासाठी सुद्धा तिसरे अपत्य अत्यंत घातक असते. राजकीय लोक बेरकी असतात. ते एका पत्नीला दोन आपत्ये आणि दुसर्‍या पत्नीला तिसरे आणि चौथे अपत्य असे दाखवून प्रशासनाला गोंधळात टाकू शकतात. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असणारा आपला भारत अशा कलाकार लोकांमुळे या क्रमांकावर दीर्घकाळ राहील, अशी शक्यता वाटते. ज्या तरुण शासकीय अधिकार्‍यांना पुढे नोकरीत प्रमोशनचा योग आहे त्यांनी आधीची दोन अपत्ये असतील तर अधिक काळजी घेतली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT