- मुरलीधर कुलकर्णी
गानकोकिळा आणि ‘दक्षिण भारताची नाईटिंगेल’ अशा उपाधींनी ज्यांचा गौरव केला गेला, अशा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका एस. जानकी यांचे ११ जुलै रोजी वाढत्या वयामुळे उद्भवलेल्या आजारपणामुळे म्हैसूरच्या अपोलो रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने एक देदीप्यमान सुवर्ण पर्व संपले आहे.
आपल्या अथांग, मधूर आणि अष्टपैलू आवाजाने सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. एस. जानकी यांचा जन्म दि. २३ एप्रिल १९३८ रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेपल्ले या गावी एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात संगीताची कोणतीही मोठी पिढीजात पार्श्वभूमी नसली, तरी बालपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील श्रीराम मूर्ती हे व्यवसायाने शिक्षक होते; परंतु त्यांनी जानकी यांच्यातील उपजत कला ओळखून त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. अवघ्या तिसऱ्या वर्षापासून जानकी यांनी गायनास सुरुवात केली. त्यांनी नादस्वरम विद्वान आणि संगीतकार श्री पैडी स्वामी यांच्या हाताखाली शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. नादब्रह्माची उपजत देणगी लाभलेल्या जानकी यांनी काकांच्या सल्ल्यानुसार चेन्नई गाठले आणि तिथे एव्हीएम स्टुडिओमध्ये गायिका म्हणून रुजू होत संगीत प्रवासाला सुरुवात केली.
१९५७ मध्ये ‘एमएलए’ या तमिळ चित्रपटातून त्यांच्या व्यावसायिक पार्श्वगायनाची सुरुवात झाली आणि पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी त्यांनी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गाण्याचा अनोखा विक्रम केला. एस. जानकी यांनी प्रदीर्घ कारकिर्दीत तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, मराठी, ओडिया, बंगाली, इंग्रजी, सिंहली आणि जपानी अशा २० हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गायिली. विविध भाषांमधील त्यांचे उच्चार इतके अचूक असायचे की, त्या त्या राज्यातील लोकांना जानकी या आपल्याच राज्यातील आहेत असे वाटायचे. त्यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकताना रसिकांना आशा भोसलेच गात आहेत, असे वाटायचे. बालपणीच्या निरागस आवाजापासून ते वृद्धेच्या आवाजापर्यंत, कोणत्याही वयोगटातील पात्रासाठी हुबेहूब आवाज बदलण्यात त्या निष्णात होत्या. त्यांनी संगीत दिग्दर्शक इलयाराजा आणि पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्यासोबत सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केली, तसेच कन्नड चित्रपटसृष्टीत सुपरस्टार डॉ. राजकुमार यांच्यासोबत असंख्य सुपरहिट गाणी दिली.
त्यांच्या या अजोड संगीत सेवेसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विविध राज्य सरकारांचे जवळपास ३० हून अधिक पुरस्कारही त्यांना लाभले. म्हैसूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिली, तर कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार’ देऊन गौरव केला. केंद्र सरकारने २०१३ मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘पद्मभूषण’ पुरस्काराची घोषणा केली होती; परंतु अत्यंत नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. हा नकार अहंकारापोटी नव्हता, तर दक्षिण भारतातील कलाकारांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर उशिरा मिळणाऱ्या ओळखीबद्दलची ती एक मूक प्रतिक्रिया होती. त्यांचा हा निर्णय कलाविश्वात त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीची साक्ष देणारा ठरला. १९५९ मध्ये त्यांचा विवाह व्ही. रामप्रसाद यांच्याशी झाला. १९९७ मध्ये पतीच्या निधनानंतर त्या हैदराबाद येथे स्थायिक झाल्या होत्या. आज एस. जानकी आपल्यात नसल्या, तरी त्यांनी गायिलेल्या गाण्यातून त्या नेहमीच आपल्यात राहतील.