आज महाराष्ट्रदेशी सर्वात जटिल प्रश्न कोणता होऊन बसला असेल, तर तो आहे मुलांच्या लग्नाचा. सर्व स्तरातील, सर्व जातीपातीतील असंख्य लग्नाळू मुले लग्न होत नाही या समस्येने ग्रस्त झालेली आहेत. मुलगा जन्मला तेव्हा पेढे वाटणार्या आई-वडिलांना आता अत्यंत कठीण काळ आलेला आहे. ग्रामीण भागात तर दोन हजार लोकवस्तीच्या गावात किमान 20 ते 15 मुले लग्नासाठी इच्छुक आहेत; परंतु त्यांना नवरी मिळत नाही.
लग्न जुळण्याची प्रक्रिया कशी होते, ते पाहिले, तर ही समस्या दिवसेंदिवस का बिकट होत चाललेली आहेे ते दिसून येईल. शहरातील मुलगा असेल, तर त्याचे स्वतःचे घर आहे का? सासू-सासरे सोबत राहतात का? मुलाचे पॅकेज किती आहे? गावी शेती आहे का? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मुलगी आणि तिचे आई-वडील विचारत असतात. नंतरच ते प्रकरण पुढे सरकत असते. ठरलेले लग्न होईलच याची शाश्वती नाही, अशी काहीशी अनिश्चित परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठे मुलाचे शिक्षण आडवे येते, कुठे नोकरी आडवी येते. व्यावसायिकाला मुली द्यायला कोणी तयार नाही. हे सगळे जुळून आले, तर ग्रहमान जुळत नाही, हा एक मोठाच प्रश्न असतो. इच्छुक वर आणि वधू यांची कुंडली जुळणे अत्यंत महत्त्वाचे असते. ग्रहमान जुळले नाही, तर पुढील संसारात असंख्य अडथळे येतात आणि घटस्फोट होतात, या धास्तीने प्रत्येक ठिकाणी आजकाल ही पण काळजी घेतली जात आहे. विवाहेच्छुक मुलांसाठी आणखी एक समस्या नव्याने उभी राहत आहे आणि ती म्हणजे सिबिल स्कोअर. मूर्तिजापूर येथे सिबिल स्कोअर अत्यंत कमी असल्यामुळे एक लग्न मोडल्याची घटना घडली आहे. सर्व काही जुळून आले, प्राथमिक बोलणीही झाली आणि विवाह निश्चितीची वेळ आली तेव्हा मुलीच्या काकांनी मुलाचा सिबिल स्कोअर पाहण्याचा आग्रह धरला. सिबिल स्कोअर हा त्या व्यक्तीचे व्यवहार कशा प्रकारचे आहेत, याचा मानक असतो. सिबिल स्कोअर चांगला आहे, याचा अर्थ त्या मुलावर जे काही कर्ज आहे तो ते नियमित परतफेड करत आहे असा होतो. डोक्यावर खूप कर्ज आहे; परंतु परतफेड अत्यंत अनियमित असेल, तर सिबिल स्कोअर खराब होतो, म्हणजेच कमी होतो. सदरील प्रकरणामध्ये मुलीच्या काकांना भावी नवरदेवाने खूप बँकांचे खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे आणि तो त्यांची परतफेड करत नाही असे दिसून आले. काकांनी ही गोष्ट मुलीच्या आई-वडिलांच्या कानावर घातली आणि इतक्या मोठ्या कर्जाची जो परतफेड करू शकत नाही तो आपल्या मुलीला कसा सुखात ठेवू शकेल, असा प्रश्न उभा केला. मंडळी, खरे बोलायचे तर हा प्रश्न रास्त आहे. काकांच्या बोलण्यातील तथ्य समजावून घेऊन मुलीच्या वडिलांनी तत्काळ हे लग्न मोडले आणि नियोजित विवाह सोहळा रद्द करण्यात आला.