भगवान दत्तात्रेय हे गुरुस्वरूप दैवत आहे. त्यांचा उपदेश हा सर्व प्रकारचे भेद दूर करणारा व सर्वत्र ऐक्य दाखवणारा आहे. आज श्रीदत्त जयंती, त्यानिमित्त...
सचिन बनछोडे
भगवान दत्तात्रेयांचे प्राकट्य हे कृतयुगात म्हणजेच सत्ययुगात झाल्याचे मानले जात असले, तरी त्यांचे अस्तित्व चारही युगांमध्ये असते, असे मानले जाते. त्याचा एक अर्थ असा होतो गुरुतत्त्व किंवा गुरुपरंपरा अखंडितच असते. दत्तात्रेयांचा उल्लेख नेहमी ‘श्रीगुरुदेव दत्त’ असाच केला जात असतो. त्यांच्या सोळा अवतारांपैकी एका रूपाला ‘आदिगुरू’ असेही नाव आहे. पौराणिक काळापासूनच त्यांचे अनेक शिष्य असल्याचे वर्णन आढळते. हा ज्ञानावतारच असल्याने कोणताही भेद न ठेवता त्यांनी सर्वांनाच मुक्तहस्ते ज्ञानोपदेश केला. भगवान दत्तात्रेयांना ‘स्मर्तृगामी’ म्हणजेच ‘स्मरण करताच तत्काळ येणारे’ म्हटले जाते. हे ज्ञानाचेही एक लक्षण आहे. जे ज्ञान संपादन केले आहे, ते सत्शिष्याने स्मरण करताच तत्काळ उपस्थित होते. हे ज्ञान ज्या गुरुतत्त्वातून येते ते अंतर्यामीच आत्मस्वरूपात विलसत असते. गीतेत म्हटले आहे की, ‘सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च’ (सर्वांच्या हृदयात आत्मस्वरुपाने ईश्वराचे अस्तित्व आहे आणि त्याच्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृतीही येते.) भागवत पुराणातही म्हटले आहे की, ‘आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः। यत्प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयोऽसावनुविन्दते॥’ (मानवाचा विशेषतः आपला आत्माच गुरू आहे. कारण, प्रत्यक्ष किंवा अनुमानाने आपल्या आत्म्याच्या ज्ञानानेच मनुष्याचे कल्याण होते.) हा आत्मा म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपलाच शुद्ध ‘मी’ असतो. हा आत्मा वैयक्तिक नसून तो सर्वव्यापीही असतो. त्यामुळे वरकरणी नामरूपाचे किंवा कर्माचे भेद दिसत असले, तरी अंतर्यामी ऐक्यच असते. या ऐक्याचाच उपदेश भगवान दत्तात्रेयांच्या सर्व उपदेशांमध्ये पाहायला मिळतो.
पाहायला मिळतो. नित्य, शुद्ध, ज्ञानस्वरूप आत्म्याला बंधन नाही आणि त्यामुळे बंधनसापेक्ष मोक्षही नाही. त्यामुळे आत्म्यामध्येच रममाण असणार्याला कोणत्या बंधनाचे भय असणार? नेहमी आत्म्यामध्ये, परमानंदात असणार्या अशा बंधनरहित व्यक्तीस ‘अवधूत’ म्हटले जाते. असे अवधूत असलेल्या दत्तात्रेयांचा अद्वैत ज्ञानाचा उपदेश अवधूतगीतेत आहे. त्यामध्ये श्रीदत्तगुरूंनी म्हटले आहे की, ‘आत्मैव केवलं सर्वं भेदाभेदो न विद्यते’ म्हणजे केवळ एक आत्माच आहे, किंचितही भेदाभेद अस्तित्वात नाही. उपनिषदांमध्येही ‘नेह नानास्ति किंचन’ असे म्हटले आहे. त्याचा अर्थ ‘किंचितही भेद नाही, जो भेद पाहतो, तो जन्म-मृत्यूच्या फेर्यात अडकतो’. छांदोग्य उपनिषदात ‘तत्त्वमसि’ हे महावाक्य आहे. ‘ते तूच आहेस’ अशा स्वरूपाने हा आत्मा व परमात्म्याच्या ऐक्याचा थेट उपदेश आहे. अवधूतगीतेत म्हटले आहे की, उपनिषदातील ‘तत्त्वमसि’ या महावाक्याने आत्माच प्रतिपादित केला आहे.
अवधूतगीता आणि त्रिपुरारहस्य यासारख्या ग्रंथांमधून भगवान दत्तात्रेयांचा असा अभेद ज्ञानोपदेश या एकमेवाद्वितीय ब्रह्मतत्त्वाशिवाय अन्य काही नाही, जगत हे मिथ्या आहे, असे भगवान दत्तात्रेय यामध्ये सांगतात. अवधूतगीतेत अद्वैतच सांगितलेले असले, तरी गुरुकृपेचे महात्म्यही यामध्ये आहेच. ‘गुरुप्रज्ञाप्रसादेन मूर्खो वा यदि पंडितः। यस्तु सम्बुध्यते तत्वं विरक्तो भवसागरात्॥’ (मूर्ख असो किंवा पंडित, गुरुकृपेने ज्याने आत्मतत्त्वाला यथार्थरूपाने जाणले आहे, तो तत्काळ संसाररूपी सागरापासून विरक्त होऊन जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटतो. तो पुन्हा या भवचक्रामध्ये अडकत नाही.) हे कसे घडते याचेही वर्णन श्रीदत्तगुरू करतात.
जी व्यक्ती निरालम्ब होऊन म्हणजे कोणाचाही आश्रय न घेता केवळ आपल्या चेतनेवरच आश्रित राहून निरंतर अभ्यास करून त्याच्याशी युक्त होते, ती अविद्येच्या गुण-दोषांपासून मुक्त होते. त्यावेळी तिच्या चित्ताचा लय होतो आणि हा चित्त किंवा मनाचा अडथळा दूर झाला की, ती सर्वव्यापी परबह्मात लीन होते, असे ते सांगतात. ‘मी’ कसा आहे याचे सुंदर वर्णन अवधूतगीतेत आहे. ‘ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहं’ अर्थात ‘मी ज्ञानरूपी अमृत आणि समरस किंवा एकरस आकाशासारखा व्यापक आहे’. अभेद ज्ञानानेच असे व्यापकत्व येते, समन्वय साधला जातो आणि मनुष्य सर्वत्र ऐक्यच पाहतो. भगवान दत्तात्रेयांच्या समन्वयाच्या किंवा समत्वाच्या उपदेशाचे हेच मर्म आहे. श्रीदत्त जयंतीनिमित्त या समन्वयात्मक दैवताला शतशः वंदन!