मंडळी, आज श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी काल खवय्यांचा सुकाळ होता. श्रावण सुरू झाल्याबरोबर नेहमी येणारी पहिली बातमी म्हणजे भीमाशंकर त्र्यंबकेश्वरसाठी एसटीच्या जादा गाड्या. भाविकांना ज्योतिर्लिंग दर्शन श्रावणामध्ये त महत्त्वाचे असते. ते करता यावे म्हणून एसटी आणि इतर गाड्यांची सोय केलेली असते. आषाढाच्या शेवटच्या दिवशी मात्र सर्वत्र बाजाराला उठाव आलेला असतो. श्रावण महिन्यामध्ये लोकांचा दोन गोष्टींवर भर असतो आणि याचे परिणाम संबंधित व्यवसायावर होत असतात.
कटिंग सलून चालवणार्या लोकांना श्रावणाची धास्ती असते. कारण या काळात बरेच लोक दाढी करत नाहीत किंवा कटिंगही करत नाहीत. या काळात सलूनवाले काम नसल्यामुळे बरेचदा नुसते बसून असतात. दुसरे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित लोकांनासुद्धा हा महिना जडच जात असतो.
दीप अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात. या काळात काही लोक थेट गटारीचेही दर्शन करत असतात. पुढे महिनाभर मांसाहार न करणारे खवय्ये यांनी बुधवारी गटारी अमावस्या साजरी करत मोठ्या प्रमाणात मटण, मासळी आणि चिकनवर ताव मारला, असे आपल्या लक्षात येईल. श्रावण महिन्यानंतर गणेश उत्सवाचा प्रारंभ होतो. गणेश उत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव असतो. या दोन्ही सणांमध्ये मांसाहारी पदार्थ वर्ज्य केले जातात. त्यामुळे आषाढ महिन्याची सांगता मात्र फार प्रचंड प्रमाणात मांसाहार करून केली जाते.
महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात बुधवारी आणि गुरुवारी सकाळपासूनच मटण, मासोळी आणि चिकनसाठी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. या खरेदीला अक्षरशः उधाण आले होते. पुण्यातील उदाहरण घेतले तर आकडेवारीने हे स्पष्ट होईल. गणेश पेठ मासळी बाजारात खोल समुद्रातील 20 ते 25 टन, नदीतील एक ते दोन टन आणि आंध— प्रदेशातून आलेले रोहू, कतला, सिलन अशी 20 ते 25 टन मासोळी आयात झाली. या काळामध्ये पापलेट, सुरमई, वाम, रावस, कोळंबी आणि ओले बोंबील यांना सर्वाधिक मागणी होती. ही आकडेवारी पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.
या काळात हॉटेलवालेही गिर्हाईकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्कीम राबवत असतात. उदाहरणार्थ दोन प्लेट चिकन थाळीवर एक प्लेट बिर्याणी फ्री. हॉटेल चालकांकडूनही मटणाला यावर्षी खूप मोठी मागणी होती. या मांसाहारी पदार्थांचे भाव या काळात वाढलेले असतात.
श्रावण महिन्याच्या सणावारांमध्ये महिलावर्ग मात्र व्यस्त असतो. एका पाठोपाठ अनेक सण असतात. यात विशेषत्वाने माहेरी भेट देण्याची संधी मिळणाराही सण असतो. एकंदरीत श्रावण हा महिना नवचैतन्याचा असतो. सृष्टीने हिरवा शालू पांघरलेला असतो, रिमझिम बरसात होत असते आणि येणार्या सणावारांमुळे वातावरणामध्ये एक प्रकारची भाविकता भरून असते.