तानाजी खोत
भारतीय वंशाच्या गीता गांधभीर या लघुपट निर्मातीला यंदाच्या ऑस्करमध्ये दोन स्वतंत्र गटांत नामांकन मिळाले आहे. चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराला गवसणी घालण्यापर्यंत पोहोचलेल्या गीता नेमक्या कोण आहेत, त्यांचे कर्तृत्व काय आहे आणि ही दोन नामांकनं त्यांच्यासाठी नेमकी का महत्त्वाची आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण ही केवळ एका पुरस्काराची किंवा ग्लॅमरची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे एका जिद्दीची आणि मानवी नात्यांच्या विलक्षण ताकदीची.
1960 च्या दशकात त्यांचे वडील शरद गांधभीर हे केमिकल इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी एका ध्येयाने अमेरिकेला गेले. 1965 च्या ‘इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्ट’मुळे त्यांच्या आई ललिता गांधभीर यादेखील वडिलांच्या सोबतीला अमेरिकेत स्थायिक झाल्या. बोस्टन परिसरातील एका सुशिक्षित भारतीय कुटुंबात गीता लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची बहीण उना गांधभीर या अलास्कामध्ये ‘सुपीरियर कोर्ट जज’ म्हणून कार्यरत आहेत, तर भाऊ अश्विन गांधभीर हा देखील चित्रपट निर्मिती आणि संकलन क्षेत्रात आहे.
गीता यांचे उच्च शिक्षण हार्वर्ड विद्यापीठात झाले. तिथे त्यांनी व्हिज्युअल आर्टस् आणि विशेषतः अॅनिमेशनवर लक्ष केंद्रित केले. हार्वर्डमध्ये असतानाच त्यांना जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्पाईक ली आणि त्यांचे संकलक सॅम पोलार्ड यांचे मार्गदर्शन लाभले. तिथूनच गीता यांचा हॉलीवूडमधील ‘डॉक्ट्युमेंटरी’चा प्रवास खर्या अर्थाने सुरू झाला. पुढे त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे एरिअल ओवेन्स यांच्याशी विवाह केला आणि दोन भिन्न संस्कृतींना आपल्या आयुष्यात सामावून घेतले.
2026 मध्ये 98 व्या ऑस्कर सोहळ्याची तयारी सुरू असताना गीता यांना दोन विभागात नामांकन मिळाले आहे. ‘द परफेक्ट नेबर’ सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी आणि ‘द डेव्हिल इज बिझी’ सर्वोत्कृष्ट लघू माहितीपटासाठी ज्युरींच्या विचाराधीन आहेत. यातील ‘द परफेक्ट नेबर’ची कथा तर थेट गीता यांच्या काळजाला भिडलेली आहे. हा माहितीपट त्यांची नणंद (पतीची बहीण) अजिके एजे ओवेन्स हिच्या हत्येवर आधारित आहे.
गीता यांचा ‘द डेव्हिल इज बिझी’ हा लघुपट एका आरोग्य केंद्राच्या सुरक्षा प्रमुखाच्या नजरेतून मानवी हक्क आणि ‘रिप्रॉडक्टिव्ह राईटस्’(गर्भपात हक्क) यांसारख्या अमेरिकेतील सर्वात वादग्रस्त विषयावर भाष्य करतो. विशेष म्हणजे, गीता यांच्या नावावर यापूर्वीच दोन मानाचे ‘एमी पुरस्कार’ जमा आहेत.
अजिके आणि गीता यांचे नाते केवळ नणंद - भावजयीचे नाते नव्हते, तर त्या एकमेकींच्या खर्या मैत्रिणी होत्या. 2023 मध्ये फ्लोरिडा येथे एका क्षुल्लक वादातून अजिकेच्या शेजारी राहणार्या एका श्वेतवर्णीय महिलेने अजिकेवर गोळी झाडली. एका बाजूला आपल्या पतीचा कोसळलेला आधार आणि दुसरीकडे अजिकेची पोरकी झालेली चार मुले असताना, गीता यांनी या अन्यायाविरुद्ध कॅमेरा उचलला. स्वतःच्या घरातील दुःख टिपताना गीता यांच्यातील कलावंत आणि एक नाते जपणारी ‘वहिनी’ यांत मोठी ओढाताण झाली. रक्ताचे नाते नसूनही एका भारतीय वंशाच्या मुलीने आपल्या आफ्रिकन-अमेरिकन कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा थक्क करणारा आहे.