Shivrajyabhishek Sohala  (File Photo)
संपादकीय

शिवराज्याभिषेक : सार्वभौम राज्याची स्थापना

पुढारी वृत्तसेवा

डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक

6 June Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक ही इतिहासातील एक महान क्रांतिकारी, ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना आहे. मध्ययुगीन काळात राज्यकारभार करणे, पत्रव्यवहार, तह, करार, न्यायदान, चलन व्यवस्था, कृषी कायदे, करप्रणाली, संरक्षण, दळणवळण आदी कामांसाठी राज्याभिषेक अत्यावश्यक होता. जोपर्यंत राज्याभिषेक नव्हता, तोपर्यंत शिवरायांनाही सरदाराचा पुत्र, जमीनदार, वतनदार, असेच समजले जात असे. शिवराज्याभिषेकाने स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला. सार्वभौम राज्य स्थापन झाले.

भारतात आज आपण संसदीय लोकशाहीत आहोत. आपल्याला संविधानाने अनेक हक्क, अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. तसेच, विहित अटी पूर्ण करणाऱ्यांना निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिपदी कोणत्याही जाती-धर्माचा व्यक्ती लोकशाही मार्गाने निवडला जातो. विद्यमान नेतृत्व हे वंशपरंपरेने नव्हे, तर कर्तृत्वाने आणि लोकनियुक्त आहे; पण मध्ययुगीन काळात अशी परिस्थिती नव्हती. भूमिपुत्रांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, नेतृत्व करणे ही संकल्पना खूप कठीण होती. येथील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, अस्पृश्य जातींना केवळ कष्ट करायचे, लढायचे; पण प्रतिनिधित्वाचे स्वप्न पाहावयाचे नाही, हा तो काळ होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करतात, ही एक महान क्रांतिकारी, ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना आहे.

राज्याभिषेक ही दबलेल्या, नाउमेद झालेल्या, पिचलेल्या, हताश झालेल्या एतद्देशीयांना नवचैतन्य देणारी घटना आहे. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा नाउमेद झालेल्या भारतीयांच्या मनात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने निर्माण केली. सभोवताली मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज, कुतुबशहा राज्य करत होते; पण तो अधिकार एतद्देशीयांना नव्हता. तो महत्प्रयासाने मिळविण्याचे क्रांतिकारक कार्य छत्रपती शिवाजीराजांनी केले. त्यामुळे त्यांचा समकालीन असणारा कृष्णाजी अनंत सभासद सांगतो, हा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. अर्थात, शिवराज्याभिषेक ही घटना असामान्य आहे, असे सभासद म्हणतो.

छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. त्यांच्या राज्याभिषेकाला अनेक अडचणी आल्या. त्यावर त्यांनी मात केली. त्यांच्या कणखर आणि दूरदृष्टीच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. जिजाऊंनी त्यांच्या खासगी खर्चाची २५ लाख पगोडा रक्कम राज्याभिषेकप्रसंगी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांकडे सुपूर्द केली. स्वराज्य स्थापनेसाठी अनेक अडचणी आल्या; पण शिवाजीराजे संकटसमयी लढणारे होते. रात्रंदिन काबाडकष्ट करणाऱ्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी घाम गाळला, रक्त सांडले. राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन प्रत्यक्षदर्शी कृष्णाजी अनंत सभासद यांनी रसाळ, लालित्यपूर्ण भाषेत केलेले आहे. ते म्हणतात की, वाराणसीचे पंडित गागाभट्ट हे शिवराज्याभिषेकासाठी आले. शिवाजीराजांनी चार पातशहा जिंकल्या. अनेक किल्ले जिंकले. पाऊण लाख घोडा लष्कर निर्मिले, त्यामुळे त्यांना राज्याभिषेक व्हावा, त्यासाठी पूर्ण नियोजन केले. अनेक मातब्बर लोक बोलावले. बत्तीस मण सोन्याचे सिंहासन निर्मिले. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक रायगडावर यथाविधी पार पडला.

राज्याभिषेकाचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारा दुसरा महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी म्हणजे इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्सेंडेन होय. हा राज्याभिषेकाला रायगडावर हजर होता. तो लिहितो, ६ जूनला सकाळी सात किंवा आठच्या सुमारास मी दरबारात गेलो. शिवाजीराजे एका भव्य सिंहासनावर बसले होते. सरदार, अधिकारी, प्रतिनिधी त्यांच्या समोर बसले होते. पुत्र संभाजीराजे व इतर मंत्री मानानुसार स्थानापन्न झाले होते. शिवाजीराजांनी हेन्रीला व नारावण शेणवीला जवळ बोलावले. शिवाजीराजांना मुजरा करून हिऱ्याची अंगठी भेट दिली त्या प्रसंगाचे व त्या ठिकाणी केलेल्या सजावटीचे इथंभूत वर्णन हेत्री ऑक्सेंडेनने केलेले आहे. राज्याभिषेकावेळी रायगडावर हत्ती, घोडे कसे आणले असतील? याचे आश्चर्य हेन्री व्यक्त करतो. अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनाही आश्चर्य वाटावे आणि त्यांनी रायगडावर येऊन शिवरायांना मुजरा करावा, हे शिवराज्याभिषेकाचे महत्त्व आहे. राज्याभिषेकाने शिवाजी महाराज अधिकृत राजा झाले. ते छत्रपती झाले. राज्यकारभार करण्याचा त्यांना अधिकार मिळाला. राज्याभिषेकाने त्यांना जागतिकस्तरावर मान्यता मिळाली. रयतेला राजा मिळाला. शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली. हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्घोष होता. नाउमेद झालेल्या प्रजेला राज्यकर्ता होण्याचा आत्मविश्वास राज्याभिषेकाने मिळाला. राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांनी स्वतःचा शिवशक सुरू केला. राज्याभिषेकाने शिवाजी महाराज शककर्ते झाले. त्यांनी स्वतःची चलन व्यवस्था सुरू केली. सोन्याचे होन व तांब्याची शिवराई ही त्यांची चलन व्यवस्था होती. आधुनिक लोकशाहीचा पाया या शिवराज्याभिषेकात आहे. आपले राज्य, आपला राजा, आपले चलन, आपली संहिता, आपले निर्णय, आपली संस्कृती हे केवळ राज्याभिषेकानेच शक्य झाले.

शिवराज्याभिषेकाचा रयतेला आनंद झाला. मातोश्री जिजाऊ कृतार्थ झाल्या. शहाजीराजे-जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. मावळ्यांच्या त्यागातून हा सुवर्णक्षण पाहता आला. या राज्याभिषेकाला एकूण एक करोड बेचाळीस लाख होन इतका खर्च झाला, असे सभासद सांगतात. हा पहिला राज्याभिषेक होय. त्यानंतर २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवरायांनी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला. यामध्ये संस्कृत विद्वान असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. या राज्याभिषेकाचे पौरोहित्य निश्चलपुरी यांनी केले. हा दुसरा राज्याभिषेक होता. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी रायगड निवडला; कारण हा किल्ला सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजी महाराजांनी धार्मिक, राजकीय, भौगोलिक परिस्थितीचा यथायोग्य अभ्यास करून राज्याभिषेक सोहळा पार पाडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT