‘शिवा आणि नंदा ही दोन टँकर जहाजं भारतीय सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना’ ही बातमी ऐकताच भारतातले लोक देवभोळे! महादेवांना वंदन करत ‘अखेर माझा महादेव नंदीसोबत पावला भारताला’ अशा उत्साहात तर नास्तिक लोक तात्याला कसा झोडायचा भारतात आल्यावर याची वक्तव्यं करत ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या आवेशाने एलपीजी मिळणार याचा विजयघोष करण्यात दंग! तिकडे होर्मुझ सामुद्रधुनीतून तात्याच्या जहाजांना हिरवा कंदील दिसेना म्हणून भारताच्या झेंड्यातला हिरवा रंग चोरून मागतोय की काय, आता अशी परिस्थिती! कारण इराणने भारतीय जहाजांना समुद्री मार्ग खुला करून ओरडून सांगितलंय, आम्ही भारतीयांना मनाई करू शकत नाही. जहाजावर भारतीय झेंडा दिसल्यास त्वरित परवानगी देऊ.
आता तात्याला वाकडी वाट करत जहाजावर भारतीय झेंडा रोवायची वेळ आलीय आणि वर भलताच आवेश! भारत आमचा मित्र देश! नरमाईनं तात्या भारताबरोबर सलगी करत भारताकडे सरकत आहे. एकूण काय पर्याय नाही भारताशिवाय! पण झेंड्याचं काय? अजिबात मिळणार नाही झेंडा तात्याला. तात्या काय गुंडाळून नेईल ते सांगता यायचं मुश्किल! कतारमधील रास लाफान बंदरातून आपले शिवा आणि नंदा जेव्हा मुद्रा आणि कांडला बंदरात गुजरातमध्ये पोहोचणार तेव्हा तात्याची लाचारी भारतात फोफावणार हे नक्की. सलगीपासून हालगीपर्यंत जाणार. तात्या हालगी वाजवून सनईचे सूर काढण्यात सराईत.
कधी आमच्या देशाच्या वळचणीला लपून बचावासाठी उदो उदो करत आपल्या देशात उडी घेईल हे जवळ बसणार्यांच्या लक्षात येईल तर शपथ! ‘हा माझा मित्र - तो माझा बंधू’ करत कोणावर बंदूक आणि मिसाईलच्या टोकावर निशाणा साधेल हे सांगायला नको. लांब राहून अमेरिका माता की जय एवढंच सध्या बोलावं. सगळं मार्गी लागेपर्यंत आणि बरंच काही साध्य होईपर्यंत. अन्यथा तात्याला झुरळाप्रमाणे झाडूसोबत हळुवार अमेरिकेपर्यंत पोहोचवायला भारतीय मंत्री मागे-पुढे पाहणारे नाहीत! असो. एलपीजीचा प्रश्न सोडवून इराणने आपल्या देशाशी थंडाई निर्माण केलीय तीही भर ग्रीष्मात... यावर तात्याच्या तोंडाला फेस येणं साहजिक आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आणि हिरमुसला तात्या ह्या दोन वास्तवामध्ये भारतीय जहाजं मात्र हसत खेळत समुद्र पार करत आहेत असं म्हणायला हरकत नाही..!