देवी लईराई सद्बुद्धी देवो file photo
संपादकीय

देवी लईराई सद्बुद्धी देवो

पुढारी वृत्तसेवा

शिरगाव येथील श्री देवी लईराईची जत्रा म्हणजे गोवा आणि आसपासच्या परिसरातील भाविकांसाठी एक कुंभमेळाच असतो. वर्षभर धोंडगण या जत्रेची वाट पाहत असतात. जत्रोत्सवात होणारे अग्निदिव्य हा उत्सवाचा केंद्रबिंदू. त्यासाठी भाविकगण महिनाभर म्हणजेच गुढीपाडव्यापासून व्रतस्थ होतात. पूर्वी फारचकडकरीत्या पाळले जाणारे सोवळेओवळे आज कालानुरूप थोडेफार बदलले असले तरी त्यातील भक्तिभाव यत्किंचितही कमी झालेला नाही. केवळ जुने जाणते लोकच नव्हे, तर अगदी लहान मुलांपासून युवावस्थेतील मुले उत्साहाने घरातील हे व्रत घेत ‘धोंड’ होत असतात. दरवर्षी यात भरच पडत असते. भावभक्तीचा हा सोहळा अगदी अपूर्व आणि अनुपम असाच असतो. घरापासून दूर मंदिरात किंवा कुठे तरी झोपड्या बांधून हे धोंडगण एकत्र राहतात. स्वत:साठी अन्न शिजवतात. गोवेकरांना तसे शिवराक राहणे म्हणजे जीवावरचे संकट. मात्र गणेश चतुर्थीनंतर आपल्या या आवडत्या गोष्टीला गोवेकर आनंदाने सुट्टी देतात ते या लईराईच्या जत्रेसाठी. इतर सणवारांसाठीही शाकाहारी असणे हे आवश्यकच असते; मात्र तो एक दोन दिवसांचा प्रश्न असतो. चतुर्थीत पाच दिवस आणि कधी कधी उत्साही लोक अगदी 11 दिवसपर्यंत हा सण साजरा करतात. दीड दिवसांची मुभा असतानाही स्वखुशीने लोक हा शाकाहार स्वीकारतात, हे कौतुकास्पद म्हटले पाहिजे.

नाटक, संगीत, भजन यात गोमंतकीयांचा हात धरणारा कुणी नाही. चातुर्मासात चार महिने वातावरण भजन, कीर्तनाने दुमदुमून गेलेले असते. अलीकडे तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला गोव्यात अनेक ठिकाणहून पंढरपूरला वार्‍या जातात. दरवर्षी यात एखाद दुसर्‍या वारीची भरच पडत असते. गणेश चतुर्थी येण्यापूर्वी तर घुमट आरतींसाठी गावागावांत खास तयारी चालते. मागची पिढी या माध्यमातून संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवत असते. अगदी तसेच या लईराई जत्रोत्सवाचे आहे. अनेक घरांत पूर्वापार लईराईचे धोंड होण्याची प्रथा आहे. शक्यतो एकदा हे व्रत घेतल्यानंतर त्यात कुणी खंड पडू देत नाही. एक पिढी वयस्कर होते तेव्हा आपल्या घराण्यातील हा ‘वारसा’ पुढे चालायला हवा म्हणून घरातील लहानग्यांना व्रतस्थ होण्यास सांगितले जाते. वरवर केवळ एक दिवसाचा जत्रोत्सव आणि अग्निदिव्य असे वाटत असले, तरी व्रतस्थ होण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात आणि ती जबाबदारी आयुष्यभरासाठी असते. जत्रेच्या दिवशी भाविक धोंडगण अग्निदिव्य पार पाडतात. जळत्या निखार्‍यांवर चालतात. आपले समर्पण आणि शुद्धत्व देवासमोर सिद्ध करण्याची ती एक पद्धत आहे.

एरवीही वर्षभर या ना त्या पद्धतीने आपण देवाची करुणा भाकत असतो. पूजा वगैरे असते तेव्हाही आपल्या सेवेत काही कमी अधिक झालेले असल्यास क्षमा कर, अशी प्रार्थना करत असतो. कितीही प्रयत्न केले तरी चुकीची शक्यता असतेच. त्यामुळे अशी प्रार्थना केली जाते. अग्निदिव्याचा प्रकार हा थोडासा पुढे जाणारा आणि थोडेसे शारीरिक कष्ट सोसण्याचा आहे; मात्र यामागील भावना खूप सुंदर आहे. आपण या पृथ्वीतलावर जन्म घेतो ते इथे असलेली वनसंपदा, जलसंपदा व इतर गोष्टींचे विश्वस्त म्हणून. आपण त्या ओरबाडून न घेता त्याचा योग्य तेवढा उपभोग घ्यावा आणि उरलेले पुढील पिढीसाठी शिल्लक ठेवावे, ही भावना असावी लागते. पण, दुर्दैवाने आज प्रत्येक बाबतीत मानव निसर्गाला ओरबाडतो आहे. जंगले कमी होताहेत. वाघ व इतर रानटी प्राणी लोकवस्तीत घुसत आहेत. आपण त्यांच्या अधिवासांवर अतिक्रमण केल्यामुळे ते आपल्या वस्त्यांत आलेत, ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला तयार नसतो. आपल्या वाढत्या भौतिक भुकेला थोडी शांतता मिळावी, यासाठी लईराई जत्रोत्सवासारखे सणवार नक्कीच हातभार लावतील. डिचोलीतील शिरगाव हा भाग खाणींमुळे पोखरला जात आहे. त्याला जनमानसातून विरोध होत आहे. अशा ठिकाणीच लईराई देवी वास्तव्य करते. या भूमीचे रक्षण हेच तिचे लक्ष्य असणार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत... धर्माला ग्लानी येते तेव्हा त्याच्या पुनरुत्थानासाठी मी जन्म घेतो, असे कृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे. हे एक चक्र आहे. शरीरशुद्धी, मनाची शुद्धी, समाजशुद्धी गरजेचीच असते. कदाचित लईराई मातेचा या भागातील वास्तव्याचा हेतू भविष्यातील हे संकटच असू शकेल. वस्तीत येणार्‍या प्राण्यांकडे आपण अधिक संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. गेल्या दोन दिवसांत ब्लॅक पँथर आणि एक बिबट्या मृत्युमुखी पडला. हा केवळ त्यांचा मृत्यू नाही, तर जैवसाखळीतील संभाव्य असमतोलाचा तो इशारा आहे. राजकारणी आणि सर्वांनीच सावध ऐका पुढल्या हाका... हे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्वातून बाहेर पडण्याची सद्बुद्धी देवी लईराईने द्यावी, अशीच करुणा आपण भाकू शकतो.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मनापासून अशा सोहळ्यांत सहभागी होत असतात. प्रत्येक वेळी ते गोमंतकीयांच्या भल्यासाठी प्रार्थनाही करत असतात. आज लईराईच्या जत्रोत्सवातही ते नक्कीच अशी प्रार्थना करतील. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या मंदिरात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून होणार्‍या पूजेएवढेच महत्त्व गोव्यात लईराई जत्रेला आहे. या भावनेतूनच मुख्यमंत्र्यांनी मडगावातील दिंडी आणि लईराई जत्रेला अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य महोत्सवांचा दर्जा दिला होता. अर्थात, काही तांत्रिक कारणांमुळे ‘राज्य दर्जा नको’ अशी भूमिका घेतली असली, तरी भाविकांनी कधीच या जत्रेला आपल्या हृदयात राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा. शेवटी ही जत्रा गोवेकरांचा मानबिंदू आहे. त्यावर सरकारी अधिकृततेची मोहर उमटल्यास दुग्धशर्करा योग साधेल. गावागावांतून व्रतस्थ धोंड शिरगावकडे निघतील, पवित्र स्नान करतील आणि अग्निदिव्याला सज्ज होतील. गोवा आणि आसपासच्या भागातून लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. गोव्यापुढे असलेले प्रश्नही एखाद्या अग्निदिव्यापेक्षा कमी नाहीत. धोंडगणांबरोबर गोमंतकीयही परीक्षा देत आहेत. या जत्रेला अलोट जनसागरही लोटत असतो. देवी प्रत्येकाला यश देवो, समृद्धी देवो. देवी लईराईचा जत्रोत्सव आनंदात होवो, तिची कृपाद़ृष्टी गोव्यावर राहो. सर्व भक्तगण आणि समस्त गोमंतकीयांना जत्रोत्सवासाठी शुभेच्छा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT