mumbai vartapatra 
संपादकीय

Maharashtra Politics | जायचंय... पण नेमके कुठे?

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानीवाडेकर

महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएला पाठिंबा देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पुढील भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातले कित्येक उन्हाळे- पावसाळे अनुभवलेल्या आणि या प्रदेशातील प्रत्येक राजकीय घटनेशी संबंध जोडल्या गेलेल्या शरद पवार यांच्या समोर ‘आता पुढील वाटचाल कशी करायची’ हा प्रश्न उभा राहिला आहे काय? येथील प्रत्येक राजकीय घडामोड त्यांच्या मर्जीनुसार होते, महाराष्ट्रातले राजकारण त्यांच्या मतानुसार चालते, असे आजही कित्येकांना वाटते. हे सगळे आठवायची वेळ आली आहे ती प्रादेशिक पक्ष एकामागून एक तुटत असल्याने. २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही, असे भाजपचे काही नेते सांगतात. शिवसेना सोडून गेली तरी राष्ट्रवादी काँग्रेस समवेत आहे. आम्ही तुमच्या समवेत येऊ, असा शब्द दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना दिला गेला होता. शब्द देऊन तो पाळला गेला नाही, असे काही भाजप नेते आणि राजकीय निरीक्षक म्हणतात.

मग भाजप जिंकूनही विरोधी बाकावर बसला. त्यावेळी निर्माण झालेली महाविकास आघाडी ही पवारांच्या आशीर्वादाने तयार झाली होती. पवार साहेबांमुळे मुख्यमंत्री झालो, असे उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणतात. या बहुचर्चित २०१९ च्या निकालापूर्वी २०१४ साली शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. तेव्हा निकालानंतर बहुमतापासून थोडेच दूर असलेल्या भाजपला मतमोजणी पूर्ण व्हायची असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता पाठिंबा देऊन टाकला होता. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आणि त्या आधी २००० च्या दशकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व भाजपशी हातमिळवणी करायला तयार होते म्हणतात. त्या त्या वेळच्या भाजप नेत्यांनी ठाम नकार दिल्याने ही चर्चा प्रत्यक्षात आली नाही म्हणतात. आता घड्याळाचे काटे उलटे फिरले आहेत. तुतारीही क्षीण होईल अशी भीती आहे. प्रादेशिक पक्ष आक्रसत आहेत, अडचणीत आहेत अन्‌ अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नव्या संदर्भात भाजपच्या दिशेने वाटचाल करायची शक्यता पुन्हा बोलून दाखवली जाते आहे. यासाठीचे संदर्भही लक्षात घ्यायला हवेत.

लवकरच सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात भाजप प्रणीत एनडीए सरकारला परिसीमन आणि त्यातच अंतर्भूत असलेले महिला आरक्षण विधेयक पारित करून घ्यायची इच्छा आहे, असे म्हणतात. त्यासाठी सत्तारूढ युतीला काही खासदारांचा पाठिंबा हवा आहे. असा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला तर तो उभयपक्षी फायद्याचा ठरू शकतो. २०१९ साली मविआ सरकारच्या निर्मितीसाठी भाजपविरोधात गेलेल्या शिवसेनेची शकले झाली. राष्ट्रवादीही फुटली. २०२४ चा लोकसभा, विधानसभेचा कौल वेगळा लागला. मात्र आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे हिशेब बदलणे सुरू झाले आहे. शिवसेनेचे आठ खासदार ज्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत निवडून आले होते, त्यांच्याच छत्रछायेखाली राजकीय वाटचाल सुरू करण्यास सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकसंध राहील काय? असा दुरवस्था प्रसंग टाळण्यासाठी सरळ मतदान करणे योग्य असेल का?

शरद पवार यांचा पक्ष महिला आरक्षणाच्या विधेयकावर सत्ताधारी पक्षाला मतदान करण्याचे धोरण स्वीकारेल, असे सर्वसाधारणरीत्या मानले जाते. महिला आरक्षण हे पवारांनी प्रत्यक्षात आणलेले धोरण आहे. ते राष्ट्रीय स्तरावर एका व्यापक क्रांतीसाठी स्वीकारले जात असताना त्याचा फायदा घेणे उचित. ते सुप्रिया सुळे यांच्या पुढील वाटचालीसाठी उपयोगाचे असे मानले जाते. अर्थात असे मतदान करणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरळ सरळ एनडीएच्या पंक्तीत जाऊन बसणे असेल. हे खासदारांना मान्य आहे काय? आणि आमदारांनाही हा पर्याय स्वीकार्य आहे काय? गेला महिनाभर याच विषयावर चर्चा सुरू आहे. या पक्षाला सातत्याने सत्तेबरोबर राहणे आवडते. त्यामुळे सत्तेपासून दूर राहण्याचे आजमितीला काँग्रेस वगळता कोणताही राजकीय पक्ष टाळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मागे का राहावे? शरद पवारांनी वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या विचारांना ठामपणे विरोध केला असला तरी तडजोडीचे, मैत्रीचे हात मिळवले, असे त्यांचे विरोधक बोलत आहेत.

पुरोगामी लोकशाही दलाचे (पुलोद) सरकार हे पवारांच्या या धोरणाचा परिपाक होते, असे इतिहासात डोकावून म्हणणारे लोकही सांगतात. प्रश्न असा आहे की, आज शरद पवार यांचा समावेश असलेल्या आठ खासदारांना आणि दहा आमदारांना या धोरणाचा लाभ होणार आहे का हा. या आठ खासदारांना आणि दहा आमदारांना आता सत्ताधारी पक्षाकडे वाटचाल करायला तयार राहा, असा निरोप दिला गेलेला असल्याची जोरदार चर्चा आहे. या आठ खासदारांना पुढच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मतदारसंघात उमेदवारी मिळेल का? उमेदवारी मिळणार असेल तर भाजप, शिवसेना आणि सुनेत्राताई यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देणार का? हा दुसरा प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरावर ही मंडळी काय करतील याचे उत्तर अवलंबून असेल. अर्थात असा कोणताही निर्णय घ्यायचा झाला तर फायदे-तोटे बघितले जातील.

पक्षांतरबंदी कायद्यामुळे सध्या काही न करता विधेयकाला पाठिंबा देण्याचा मार्ग हा राजकीयदृष्ट्या श्रेयस्कर असेल. अंदाजाचे पतंग ताणले जात आहेत. हा पक्ष काँग्रेसकडे सरकेल किंवा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दूर करा, आम्ही मग तुमच्याकडे येतो, अशी भाजपसमोर अट टाकेल, अशाही चर्चा जोरात सुरू आहेत. या चर्चा कितपत खऱ्या हे येणारा काळ सांगेल. मात्र महत्त्वाच्या नेत्याच्या नेतृत्वातल्या पक्षाबाबत अशा पद्धतीच्या चर्चा होणे हे कशाचे लक्षण आहे? पक्षाला काही ध्येयधोरणे असतात की, धर्मनिरपेक्षता ही केवळ निवडणूक प्रचारात बोलायची गोष्ट आहे की, भाजपचे धोरण हे घटनेचा सन्मान करणारे आहे, याची खात्री राष्ट्रवादीला पटली आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची आहेत. सुप्रिया सुळे संपर्कामुळे महत्त्वाच्या नेत्या आहेत हे निश्चित. त्यांना खरोखरच भाजपकडे जायचे आहे काय आणि स्वतःचे भवितव्य सुरक्षित करून घ्यायचे आहे काय? त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी केलेली वक्तव्ये जाहीर मंचावर आहेतच. तरीही अंदाज बांधत राहणे हे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सध्या सुरू आहे. 'आधे इधर, आधे उधर' हा सिनेमातला लोकप्रिय संवाद. तसे होणार की फक्त विधेयकाला मूल्यधारित पाठिंबा असे राहणार? नेमके काय होते ते कदाचित या आठवड्यात स्पष्ट होईल.

धर्मनिरपेक्ष हा गेल्या पिढीप्रमाणे आमच्या भात्यातला ठेवणीतला शब्द नाही, ती आमची वैचारिक बांधिलकी आहे, असे काही खासदार सांगत आहेत. त्यांच्या मतदारसंघाचे गणित हे भाजपकडे झुकले तर पार कोलमडेल. त्यांना भाजपकडे जाण्याची इच्छा नाही, मात्र अन्य मतदारसंघांना सुरक्षित करायचे असेल तर हा सर्वात उत्तम पर्याय असल्याचे काही आमदारही आता कबूल करीत आहेत. कुठे जायचे हा निर्णय सद्स‌द्‌विवेकावर सोडून देता येणार नाही. एका प्रादेशिक पक्षाची वाताहत होते आहे. पक्षनेतृत्वाची गरज काय आहे? आणि पक्ष तुटणे टाळण्याआधी काही निर्णय घेतले जातील ते पाहायचे. त्यातच आता सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. अडचणीत परस्परांना मदत करण्याऐवजी कुटुंबातील सदस्य पडद्यामागून एकमेकांचे पाय ओढत आहेत का? अनेक दुर्धर प्रसंगांना शरद पवारांना तोंड द्यावे लागले. त्यांचे विरोधक म्हणतात, करावे तसे भरावे. पक्षाची पुढची वाटचाल सुप्रियाताईवर अवलंबून असेल. त्या हे शिवधनुष्य सांभाळू शकतील?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT