ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर 
संपादकीय

मालवणी मातीतलं सोनं

मालवणी भाषा जिवंत ठेवण्यामध्ये गवाणकरांचा मोठा वाटा

पुढारी वृत्तसेवा

- अरुण नलावडे, ज्येष्ठ अभिनेते

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाने मालवणी भाषेला जगभरात ओळख मिळवून दिली. स्मशानातील वास्तव्यापासून ते बिगारी कामापर्यंत नियतीचे खेळ त्यांनी अनुभवले. कदाचित म्हणूनच ते इतरांपेक्षा वेगळे होते.

ज्येष्ठ रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले प्रख्यात नाटककार गंगाराम गवाणकरांचे निधन चटका लावून जाणारे आहे. गंगाराम गवाणकर सतत नाटक करत राहणारा माणूस होता. मालवणी भाषेवर मनापासून प्रेम करणारा हा नाटककार होता. नाटककार आत्माराम सावंत यांच्यानंतर मालवणी भाषा जिवंत ठेवण्यामध्ये गवाणकरांचा मोठा वाटा राहिला आहे.

गवाणकर 1972 पासून आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक सदरांतून, तसेच दूरदर्शन मालिका आणि मराठी चित्रपटांचे लेखन करत होते. त्यांचे बालपण भयानक होते. गावापासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात विमानतळावरील बिगारी काम, जेजे स्कूल ऑफ आर्टस्मधलं शिक्षण, नाईट हायस्कूलमधील शालेय शिक्षण, फुटपाथवरील जगणं, जीपीओमध्ये नोकरी, साईन बोर्ड रंगवणं अशा हालअपेष्टातून जात त्यांनी यशस्वी वाटचाल केली; मात्र कधीच कुरकूर केली नाही की, परिस्थितीचे भांडवल करून काही पदरातही पाडून घेतले नाही. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नाटकाची उर्मी होती. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यांचे नाटकवेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे तशा स्थितीतही ते नाटक पाहायचे, करायचे. जे काही भोगले-सोसले त्याचा उदोउदो केला नाही. याबाबत कधी विचारलं, तर ते म्हणत की, त्या परिस्थितीनेच मला खूप काही शिकवले. संकटातून स्वतःला सावरून जिद्दीने उभे राहण्याची ताकद त्या माणसामध्ये होती आणि ही ऊर्मी, ताकदच त्यांची प्रेरणा होती. कदाचित म्हणूनच उतारवयातही ते शारीरिकद़ृष्ट्या धडधाकट आणि ताजेतवाने होते. त्यांची विनोदबुद्धी आणि लेखणी तशीच शाबूत होती. मालवणी भाषेला राज्य मान्यता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ‘वस्त्रहरण’चे 4500 प्रयोग करून त्यांनी विश्वविक्रम केला. या नाटकाचे 5000 हून अधिक प्रयोग झाले. भूतकाळात कमालीच्या हालअपेष्टा सोसल्यानंतर त्याचं प्रतिबिंब आपल्या कलाकृतींमध्ये, साहित्यामध्ये, लेखनामध्ये उमटण्याची दाट शक्यता असते; पण गवाणकर याला अपवाद ठरले.

‘वस्त्रहरण’मध्ये विनोदी अंगाने दशावताराची रंगकथा सांगतानाच दशावतारी कलावंतांची शोकांतिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे मांडली की, ते नाटक पाहताना कोणताही प्रेक्षक भारावून जातो. त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखा जिवंत असत. ‘वस्त्रहरण’मधल्या व्यक्तिरेखाही तशाच असल्याने त्या लोकांना भावल्या. याखेरीज ‘वन रूम किचन’ किंवा ‘वात्रट मेले’ यांसारख्या नाटकांमध्ये गवाणकरांनी अचूक सामाजिक भान ठेवत ज्या व्यक्तिरेखा साकारल्या त्या जिवंत वाटण्याचीही हीच कारणे होती. ‘वस्त्रहरण’ला गवाणकरांच्या लेखणीला जोड मिळाली ती मालवणी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या मच्छिंद्र कांबळी या नटसम—ाटाची. सुरुवातीच्या काळात ‘वस्त्रहरण’ बंद करण्याची वेळ आली होती; मात्र मुंबईतील प्रयोग पु. ल. देशपांडे यांनी पाहिला आणि ‘असा देशी फार्स मी आजपर्यंत पाहिलेला नाही, मलाही त्यात भूमिका करायला नक्की आवडली असती’ अशी कौतुकाची थाप दिली. त्यामुळे ‘वस्त्रहरण’ची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली.

गवाणकरांंचे आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण’देखील वाचनीय आहे. स्मशानातील वास्तव्यापासून ते बिगारी कामापर्यंतचे नियतीचे सारे खेळ त्यांनी अनुभवले; मात्र अशा कटू अनूभवांचे त्यांनी हास्यात रूपांतर केले. ‘वेडी माणसे’, ‘दोघी’, ‘प्रीतीगंध’, ‘चित्रांगदा’, ‘वर भेटू नका’, ‘पोलिस तपास चालू आहे’, ‘वर परीक्षा’, ‘अरे बाप रे’, ‘महानायक’, ‘वडाची साल पिंपळाक’, ‘भोळा डांबिस’, ‘मेलो डोळो मारून गेलो’ अशा नाटकांनी गवाणकरांनी रंगभूमीवर राज्य केले. त्यांना विनम— श्रद्धांजली!

(शब्दांकन ः हेमचंद्र फडके)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT