तंत्रज्ञानाचा गैरवापर..! Pudhari File Photo
संपादकीय

तंत्रज्ञानाचा गैरवापर..!

बनावट माल तयार करणे आणि तो ग्राहकांच्या माथी मारणे यात अनेक विक्रेते आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

तंत्रज्ञानाच्या चमत्काराने माणसाचे जीवन सुखी केले असले, तरी त्याला नकळत अनेक दुःखांना सामोरे जावे लागते आणि ते त्याच्या लक्षातही येत नाही. बनावट माल तयार करणे आणि तो ग्राहकांच्या माथी मारणे यात अनेक विक्रेते आघाडीवर आहेत. बनावट पनीर तयार करून विकल्याच्या असंख्य घटना आपल्या नेहमी वाचण्यात येत असतात. दुधाचा एकही थेंब न वापरता तयार केलेले हे अद्भुत पनीर तुमच्या- आमच्या पोटावर काय दुष्परिणाम करत असेल ते एक आपले आतडेच जाणो. असेच विविध प्रकारचे पदार्थ कळत नकळत आपल्या पोटात जात असतात आणि आपल्या आरोग्याला बाधा आणत असतात.

साधे तांदळाचे उदाहरण घ्या. आपल्या घरी भात खाण्यासाठी आपण तांदूळ आणायला जातो तेव्हा काय काय पाहतो? सर्वात प्रथम म्हणजे त्याचा दर हा आपल्याला परवडणारा असला पाहिजे. तांदूळ लवकर शिजणारा असला पाहिजे. तांदळाच्या जातींमध्ये इंद्रायणीसारख्या चिकट भात होणार्‍या जाती आहेत, त्याचसोबत कोलम किंवा काली मुछसारखे मोकळा भात होणारे तांदूळही असतात. तांदूळ खरेदी करताना आपण आणखी एक गोष्ट पाहतो ती म्हणजे त्याचा वास घेऊन पाहतो. सुगंधी दरवळ असणारा तांदूळ बहुतांश लोकांना आवडतो; कारण तो खातानासुद्धा त्याचा तो विशिष्ट दरवळ, सुगंध आपल्या मनाला आणि पोटाला आनंद देत असतो.

आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला सर्रास फसवले जाते. अहिल्यानगर येथील एका तांदूळ विक्री करणार्‍या कंपनीच्या गोडावूनवर अन्न व औषध विभागाने छापा टाकला. जप्त करण्यात आलेला तांदूळ पाहून अधिकारीवर्ग चक्रावून गेला. साध्या तांदळाला बासमतीचा वास यावा म्हणून त्यामध्ये केमिकल टाकले जात होते. किलोमागे अवघे काही पैसे लागणारे ते केमिकल साध्या तांदळाला बासमतीचा सुगंध प्रदान करत होते. हे केमिकल कोणते आहे, याची तपासणी सध्या सुरू आहे. हे केमिकल पोटात गेल्यानंतर काय अपाय करणार आहे, याविषयी निश्चित माहिती अद्याप नाही. दुधाचे दही करून विकले तरी परवडते. लोण्याचे तूप करून विकलेले जास्त भाव देऊन जाते. याचा अर्थ साध्या वस्तूला व्हॅल्यू अ‍ॅडिशन करून जास्तीचा नफा कमावता येतो. अहिल्यानगरमधील या कंपनीने साध्या तांदळाला बासमतीचा वास देऊन त्याचा भाव कुठल्या कुठे नेऊन ठेवला आणि ही कंपनी गेली कित्येक वर्षे असा तांदूळ सर्रास विकत होती.

आपल्यासारखे सामान्य लोक महिन्याकाठी लागणार आहे तेवढा म्हणजेच एक-दोन किलो तांदूळ खरेदी करत असतो. गृहिणीने घरी जाऊन भात लावण्यापूर्वी हा तांदूळ एकदा भिजवून घेतला की, त्याचा वास गायब होतो. आपण आणलेला तांदूळ चुकीचा आहे हे आपल्याला समजते; पण आपण त्याची तक्रार करत बसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT