पहिला चहा | प्रीतिसंगमावर राजकीय संगम!  
संपादकीय

पहिला चहा | प्रीतिसंगमावर राजकीय संगम!

पुढारी वृत्तसेवा

(कराड येथील प्रीतिसंगमावर घड्याळवाल्या सुनेत्राताई आणि तुतारीवाल्या सुप्रियाताई यांच्यात झालेला गुप्त संवाद)

सुप्रियाताई : वहिनी, प्रीतिसंगमावर आल्यावर एक गोष्ट जाणवते. नद्या तरी एकत्र येतात. माणसांच्या राजकीय पक्षांचे प्रवाह मात्र वेगवेगळे वाहतात.

सुनेत्राताई : हो ना ताई, नद्यांना सत्तेची महत्त्वाकांक्षा नसते. त्यांना दिल्लीला जायचे नसते, मंत्रालयात खाते मिळवायचे नसते...

सुप्रियाताई : (हसत) तुमच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना अचानक संगमाची आठवण येऊ लागलीय, पण... कालपर्यंत त्यांना आमचा प्रवाह वेगळा वाटत होता.

सुनेत्राताई : कदाचित त्यांच्या दोन्ही बाजूंच्या खुर्च्या मोजून झाल्या असतील!

सुप्रियाताई : नेते बाबांनाही भेटले. पण, पक्ष एकत्र आणण्यासाठी की स्वतःचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी...

सुनेत्राताई : ताई, राजकीय भविष्याची चिंता तर सगळ्यांनाच असते. आम्ही तुमच्या राष्ट्रवादीच्या बातम्या वाचतोय हल्ली खूप.

सुप्रियाताई : आमचं एनडीएचं ठरलेलं नाही अजून...

सुनेत्राताई : मोदीजी पवार साहेबांना रुग्णालयात फोन करून सुप्रिया आणि आम्ही मिळून देश चालवू, असे म्हणाले होतेच...

सुप्रियाताई : हो. पण फोनवरची सदिच्छा आणि प्रत्यक्षात राजकीय युती यात फरक असतो. फोन ठेवला की राजकारण पुन्हा सुरू होतं!

सुनेत्राताई : म्हणजे तुमची राष्ट्रवादी एनडीएत येणार नाही?

सुप्रियाताई : वहिनी, राजकारणात दरवाजे कधी बंद करायचे नसतात.

सुनेत्राताई : आमच्याकडेही असंच आहे. तुमच्या पक्षातले यायला इच्छुकच असतात...

सुप्रियाताई : वहिनी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हटले की, नेत्यांना आनंद होतो. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्हच असते हो!

सुनेत्राताई : ताई, नेत्यांना किती जागा मिळतील, याची उत्सुकता असते. एखादं मंत्रिपद जास्त मिळू शकते...

सुप्रियाताई : बाबा म्हणतात, आधी विचारांची एकजूट करा. केवळ घड्याळाचे काटे जुळवून पक्ष एकत्र येत नसतो!

सुनेत्राताई : उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेतृत्व कोण करणार?

सुप्रियाताई : बाबा म्हणतात, राजकारणात नदीचा प्रवाह कधीही बदलू शकतो; फक्त योग्य वेळी योग्य किनाऱ्यावर उभं राहता आलं पाहिजे!

सुनेत्राताई : उत्तर नाही दिलं. असू दे. पण संगम कोणाचा होणार हे ठरण्याआधीच, कोणत्या किनाऱ्यावर किती जागा मिळतील, याचा पवार साहेबांचा हिशेब तयार असतोच नेहमी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT