सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या कार्याची महानता आणि त्यांच्या विचारांची आजही किती गरज आहे, यावर पुन्हा प्रकाश टाकला असता बर्याच गोष्टी समोर येतात. अज्ञान, भ्रामक समजुती यामध्ये गुरफटलेल्या शुद्र, अतिशुद्र आणि स्त्रिया यांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी खूप मोठा प्रयत्न केला.
सावित्रीबाईंचा विचार प्रामुख्याने मूलगामी आणि प्रगल्भ असा होता. केवळ वरवर शिक्षण म्हणजे अक्षर ओळख अशा पद्धतीचे शिक्षण न देता त्यांनी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, आत्मसन्मान या संदर्भातील शिक्षण दिले. त्यांनी स्त्रिया आणि शुद्रादीशुद्र लोकांमधील आत्मभान जागृत केले, तरीही त्यांच्या कार्याकडे नेहमी पारंपरिक पद्धतीने पाहिले जाते. त्या महात्मा जोतिराव फुले यांच्या अर्धांगिणी होत्या आणि त्यांनी एक पत्नी म्हणून काम केले इथपर्यंतच त्यांच्या कार्याचा उल्लेख काही वेळा होतो; मात्र त्यांनी केवळ परंपरागत पद्धतीने पतीसोबत काम केलेले नाही, तर त्या स्वतः बुद्धिमान होत्या. स्वतंत्रपणे विचार करणार्या होत्या. सुरुवातीला महात्मा फुलेंच्या सांगण्यानुसार त्यांनी शिक्षण घेतले असले, तरीही पुढे त्या ज्ञानसंपन्न झाल्या. यातून एकूणच समाजाची स्थिती काय आहे, हे त्यांना दिसत होते.
सुरुवातीला या कार्यासाठी समाजातील काही घटकांकडून सावित्रीबाईंना शेण-गोट्याचा मार खावा लागला, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पतीबरोबर त्यांना घर सोडावे लागले होते. त्या काळात अशा प्रकारे बाहेर पडताना सुरक्षिततेचा प्रश्नही खूप मोठा होता. अशा प्रकारे पतीसोबत बाहेर जाणे म्हणजे, त्याकाळी खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जाणारे होते. पारंपरिक पद्धतीने त्या घरातच राहिल्या असत्या, तर त्या अर्थाने सुरक्षित आयुष्य त्यांच्या वाट्याला आले असते; पण त्यांनी पतीबरोबर समाज परिवर्तनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर त्यांना पश्चात्ताप झाला असे त्यांच्या वागण्यातून किंवा विचारातूनही कुठेही दिसून आले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सावित्रीबाईंनी आयुष्यभर आपल्या विचारांची मशाल सतत जागृत, पेटती ठेवली. स्त्रियांसाठीचे त्यांचे कार्य हे दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यांनी केशवपनासाठी विरोध केला. त्याकाळात बलात्कारामुळे किंवा पारंपरिक पद्धतीने ज्याला पाय घसरणे असे म्हणतात, त्यातून विधवा गरोदर राहत होत्या. अशा स्त्रियांच्या मदतीसाठी त्यांनी मोठे काम केले. बालहत्या प्रतिबंधक गृह काढून त्यांनी अशा स्त्रियांची मदत केली. ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षामुळेच आज मुली-महिला शिकून घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे आज स्त्रियांची दिसणारी उन्नती, त्यांना मिळालेले स्वातंत्र्य हे सावित्रीबाईंच्या कार्याचे फलित आहे, हे विसरून चालणार नाही.
सावित्रीबाईंनी सामाजिक न्याय, विषमता नाहीशी होणे आणि आत्मसन्मान जागविणे हेच खरे शिक्षण अशी शिक्षणाची व्याख्या केली होती. त्या द़ृष्टीने खरोखरीच किती स्त्रिया शिक्षित झालेल्या आहेत, याचा विचार केला, तर एकीकडे खूप आशादायक चित्र आहे. स्त्रियांचा आत्मसन्मान जागा झालेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे, त्या अर्थाजन करू लागल्या आहेत, विचारांनी आणि आत्मविश्वासाने स्त्रिया जाग्या झाल्या आहेत, असे दिसते; पण या सर्व बदलांमध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा पाहिला, तर त्याविषयीच्या जागरूकतेबाबत थोडी निराशाजनक स्थिती आहे. आज गुलामगिरीतून स्त्री बाहेर आली, हे खरे आहे; पण मला शिक्षण, समता मिळते आहे, अर्थार्जन करण्याची संधी मिळते आहे, एवढ्यावरच ती थांबताना आढळत आहे. सावित्रीबाईंनी जातिभेदाबद्दलही खूप मोलाचे कार्य केले. त्यांच्यासोबत फातिमा शेख होत्या. त्यामागे हिंदू-मुस्लिम सलोखा हा भाव होता. जोतिबांनी घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला त्यामध्ये सावित्रीबाईंचाही सहभाग होताच. अशा प्रकारच्या जातिभेदासाठी आजची शिक्षित स्त्री किती प्रमाणात जागरूक आहे, असा प्रश्न उपस्थित केला, तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. सुरुवातीच्या काळात सावित्रीबाई पत्नी म्हणून जोतिरावांसोबत कार्यात सहभागी झाल्या; मात्र तिथेही जोतिरावांनी मांडलेल्या विचारांवर चिंतन, मनन करून त्या आपले मत मांडत असत, हे त्यांच्या काव्यातून स्पष्ट होते.