संपादकीय

लवंगी मिरची : अत्र तत्र सर्वत्र सारखेच!

backup backup

अमेरिकेने भारतावर मात केली आहे की भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे, असा संभ—म निर्माण व्हावा, अशी बातमी आली आहे. मित्रहो, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे सुपुत्र हंटर बायडेन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे आपल्याला असे वाटत असेल की, केवळ भारतीय राजकारणी लोकांचे सुपुत्रच बापाला त्राही भगवान करून सोडतात, तर ते चुकीचे आहे, हे आधी समजून घ्या. अत्र तत्र सर्वत्र सारखेच असते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मुलाचे नाव जिम, जॉन, टॉम किंवा आपल्या भारतीय नावासारखे आदित्य, संतोष, राहुल ठेवायचे सोडून बायडेन यांनी त्याचे नाव हंटर असे ठेवले. हंटर म्हणजे आपल्या मराठी भाषेत त्याचा अर्थ 'शिकारी' असा होतो. आता ज्याचे नावच 'शिकारी' असे ठेवले आहे, तो काही ना काहीतरी विध्वंस करणार, यात काही शंका नाही. हंटर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे, तोही फार इंटरेस्टिंग आहे.

हंटर बाळ याने शस्त्र खरेदी करण्यासाठी अर्ज केला. अमेरिकेत काय कोणीही शस्त्र खरेदी करू शकतो. तुम्ही म्हणाल यात गुन्हा काय आहे? गुन्हा एवढाच आहे की, शस्त्र खरेदी करताना आपण अमली पदार्थाच्या नशेखाली होतो, हे त्यांनी लपवून ठेवले आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, शस्त्र खरेदी करण्यासही अमेरिकेत बंदी नाही. त्याचबरोबर अमली पदार्थांच्या नशेखाली राहणे यासही बंदी नाही. फक्त शस्त्र खरेदी करताना तुम्ही अमली पदार्थाचे सेवन करत असता ही माहिती लपवणे हा मात्र गुन्हा आहे. आहे की नाही गमतीचे? शस्त्रे सहज उपलब्ध होतात आणि अमली पदार्थ ही तितक्याच सहजतेने उपलब्ध असतात. फक्त हे दोन्ही करताना तुम्ही सत्य माहिती सांगणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्या सोप्या मराठी भाषेत सांगायचे असेल, तर दारू पिऊन, जुगार खेळताना, त्याच्या हातून खून झाला असे सांगता येईल. आहे की नाही? अमेरिका हे सर्वात विकसित राष्ट्र आणि जगातील महासत्ता? याचमुळे तिथे माथा भडकलेला कुणीतरी तरुण एखाद्या शाळेत जातो आणि बेछूट गोळीबार करतो ज्यात असंख्य मुले मरण पावतात किंवा कोणीतरी माथेफिरू बंदूक घेऊन मॉलमध्ये जातो आणि सैराट गोळीबार करतो. त्यात असंख्य लोक मरण पावतात.

या अमेरिकेतील नेहमीच्या घटना आहेत आणि विशेष म्हणजे अशा घटना घडू नयेत, यासाठी कोणताही गंभीर विचार अमेरिकेत केला जात नाही. आम्हाला असे वाटते की, आपल्याकडे बरे आहे. किमान शस्त्रे सहज उपलब्ध नाहीत. अमली पदार्थ मिळणेही अत्यंत अवघड आहे. मद्य आपल्याकडे मुबलक उपलब्ध आहे; पण मद्यपान केल्यानंतर एखाद्याचा स्वतःच्या मेंदूवरील ताबा सुटला, तर फार तर घरी परतताना तो रस्त्यात पडेल; पण किमान त्याला शस्त्र मिळणार नाही, हे नक्की! म्हणजे याबाबतीत आपण अमेरिकेच्या खूप पुढे आहोत, याचा अभिमान व्यक्त केल्याशिवाय राहत नाही.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशात मुलाने काही गंभीर गुन्हा केला, उदाहरणार्थ बलात्कार, फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडणे इत्यादी, तर श्रीमंत बाप, मुलगा पोलिस ठाण्याला पोलिसांनी आणण्याच्या आधी त्याच्या जमानतीची कागदपत्रे घेऊन हजर असतो. अमेरिकेतील या केसमध्ये अध्यक्ष महोदयांनी असे काही केल्याचे अद्याप माहीत नाही; पण भारतीय राजकारण्यांच्या नशिबी असणारे भोग अमेरिकेतील राजकारण्यांच्याही नशिबी आहेत, याविषयी आनंद व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष श्रीमान ट्रम्प यांच्याविरुद्ध चार ते पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा फायदा येऊ घातलेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला होईल, असा अंदाज बांधला जात असतानाच बायडेन यांच्या चिरंजीवांचे प्रताप देशासमोर आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT