. संभाजी महाराज pudhari photo
संपादकीय

छ. संभाजी महाराजांवर परकीयांची स्तुतिसुमने

पुढारी वृत्तसेवा
सुरेश पवार

छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या 8 वर्षे आणि 8 महिने एवढ्या अल्पकारकिर्दीत पोर्तुगीजांना पूर्ण नमवले. सिद्दीला नाकीनाऊ आणले. बलाढ्य औरंगजेबाला जबरदस्त टक्कर दिली. त्यांच्या महापराक्रमाची परकीय मुत्सद्दी, राजकारणी आणि परदेशी प्रवाशांनी प्रशंसा केली आहे.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. दिल्लीच्या मोगलशाहीला, आदिलशाहीला आव्हान दिले आणि इंग्रज, पोर्तुगीज आदींनाही आपली ताकद दाखवून दिली. छत्रपती संभाजी महाराज यांनी बलाढ्य मोगल बादशहा औरंगजेब याच्याशी जबरदस्त झुंज घेतली आणि त्याला फारसे यश लाभू दिले नाही. किंबहुना त्यांच्या हौतात्म्यानंतर मराठ्यांमध्ये निर्माण झालेल्या स्वातंत्र्याच्या धगधगत्या मशालीने औरंगजेबाला महाराष्ट्रातच चिरविश्रांती दिली गेली. एका बाजूला मोगलांना दणका देताना संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना जबरदस्त तडाखा हाणला आणि सिद्दीलाही जेरीस आणले. अवघ्या पावणेनऊ वर्षांच्या कारकिर्दीत चौफेर पराक्रम गाजवून संभाजी महाराजांनी स्वराज्याला बळकटी आणली. इंग्रज, फ्रेंच आणि परकीय मुत्सद्दी, प्रवासी आणि लेखकांनी संभाजी महाराज यांच्याविषयी वेळोवेळी प्रशंसोद्गार काढले आहेत. परकीय अधिकारी, प्रवासी यांनी केलेल्या या नोंदींवरून छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठेपण अधोरेखित होते.

छ. शिवाजी महाराज आग्य्राहून सुटून परत आले. त्यानंतर त्यांनी 1667 मध्ये मोगलांशी तह केला. या तहानुसार संभाजीराजे मोगलांचे मनसबदार बनले. 1669 पर्यंत संभाजीराजे शहजादा मुअज्जम याच्याबरोबर औरंगाबाद येथील (सध्या छ. संभाजीनगर) छावणीत होते. अकरा-बारा वर्षांच्या संभाजीराजांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. अ‍ॅबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी आणि लेखक याने त्यांच्याविषयी लिहिलेली टिपणी मोठी मनोवेधक आहे. तो म्हणतो, ‘युवराज संभाजी वयाने लहान; पण धैर्यवान आणि पित्याच्या कीर्तीला साजेसा शूर वीर आहे. युद्ध कलेत तो तरबेज आहे. तो अतिशय देखणा आहे. सैन्याचे त्याच्यावर प्रेम आहे. पित्याने हेवा करावा, एवढा तो लोकप्रिय आहे.’ कोवळ्या वयातील संभाजीराजांचे हे वर्णन त्यांच्या भावी पराक्रमाची साक्ष देणारे आहे.

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्सेडेन याने छ. शिवराय यांच्याबरोबर संभाजीराजे यांनाही नजराणा दिला. राज्याभिषेकानंतर संभाजीराजे यांनी काही मोहिमाही हाती घेतल्या होत्या. 1676 मध्ये सर जॉन फ्रायर या इंग्रज प्रवाशाने संभाजी राजांविषयी नोंद केली आहे. सर जॉन फ्रायर याने पर्शिया (इराण) आणि भारतामध्ये प्रवास करून निरीक्षणे नोंदवली आहेत. संभाजीराजांविषयी तो म्हणतो, ‘शिवाजी राजाच्या मुलाने भागानगर लुटले. बहलोलखानाच्या लष्कराला शिताफीने बगल दिली. हुबळी, रायबागची लूट केली आणि तो जलद गतीने परतला.’ वयाच्या अठराव्या / एकोणिसाव्या वर्षी संभाजीराजांनी दाखविलेली ही तडफ त्यांच्या भावी शौर्याचे गमकच म्हटली पाहिजे.

राजापूर येथील इंग्रजांच्या वखारीत आपल्या काकासमवेत असलेल्या सर जॉन चाईल्ड यानेही संभाजीराजे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत. ‘शिवाजी दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. त्याची भरभराट होत आहे. त्याचा मृत्यू ओढवला, तरी काही (राज्याला) अडचण येणार नाही. कारण त्याचा मुलगा समजूतदार आहे व त्याचा यौवराज्याभिषेक झालेला आहे’. या चाईल्डने नंतर मुंबई आणि सुरत येथील इंग्रज वखारीतही काम केले. संभाजीराजांचे त्याने केलेले मूल्यमापन पुढे अगदी अचूकच ठरले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्यानंतर मुंबईकर इंग्रजांच्या अहवालातील नोंद संभाजी महाराजांच्या लष्करी ताकदीची कल्पना देणारी आहे.

संभाजीराजांच्या हौतात्म्यानंतर मोगलांची 20 हजारांची फौज स्वराज्यात आली. मात्र, मराठ्यांनी पाण्यात विष मिसळल्याने अनेक मोगल सैनिक मृत्युमुखी पडले आणि या सैन्याला माघार घ्यावी लागली. इंग्रजांच्या या नोंदीने मराठा फौजेचे नीतिधैर्य भक्कम होते, हे स्पष्ट होते. खरे तर त्याआधी एक वर्षापूर्वीच मुंबईकर इंग्रजांनी संभाजीराजे यांनी मोगल येणार म्हणून कशी जय्यत तयारी केली होती, याची नोंद करून ठेवली आहे. संभाजी महाराजांनी गडा-गडावर तोफांसह सर्व युद्धसज्जता केली आहे. त्यामुळे मोगल हल्ला करायला धजत नाहीत, असे इंग्रजांचे निरीक्षण आहे. संभाजी महाराजांचे लष्करी नियोजन किती भरभक्कम होते आणि इंग्रजांसारख्या धूर्त लोकांना त्याचे मर्म कसे उलगडले होते, यावर या नोंदींनी प्रकाश पडतो.

छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. इंग्रज आणि पोर्तुगीजांसह अन्य राज्यकर्त्यांनी आपले दुखवट्याचे संदेश संभाजी महाराज यांच्याकडेच पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा जबरदस्त पराभव करून त्यांचा तीन चतुर्थांश प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. या घडामोडीपासून इंग्रजांनी धडा घेतला आणि त्यांनी संभाजी महाराजांशी सलोख्याचे संबंध ठेवले. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना दिलेला तडाखा, सिद्दीशी दिलेली जबर झुंज आणि मोगलांशी दिलेला कडवा लढा यावरून संभाजीराजांशी मैत्री ठेवल्यास आपल्याला मोगल, पोर्तुगीज, सिद्दी यापैकी कोणाचेही भय बाळगण्याचे कारण राहणार नाही, अशी इंग्रजांची धारणा झाली होती. 1685 मध्ये इंग्रजांनी ही भूमिका घेतली. छत्रपती संभाजी महाराज यांचा दरारा किती होता, याची इंग्रजांच्या या भूमिकेवरून खूणगाठ बांधता येते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्यानंतर स्वराज्यात खजिना मुबलक होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावेळी असलेली फौज आता अडीचपट झाली होती. अपवाद वगळता बहुतेक किल्ले मोगलांशी लढण्यासाठी सज्ज होते. तत्कालीन काही निवडक परकीय लेखक, मुत्सद्यांनी, प्रवाशांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी प्रशंसापर वर्णने केली आहेत. ती या धर्मवीर राजाचे यथायोग्य अचूक मूल्यमापन करणारी आणि तमाम जनतेची मान उंचावणारी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT