Indian Saints | भक्तीचा संदेश देशभर पोहोचवणारे संत  
संपादकीय

Indian Saints | भक्तीचा संदेश देशभर पोहोचवणारे संत

पुढारी वृत्तसेवा

राजाराम ल. कानतोडे

भक्ती ही कोणत्याही एका जातीची, धर्माची किंवा वर्गाची मक्तेदारी नसून ती प्रत्येक माणसासाठी आहे, हा विचार संत नामदेवांनी मांडला. आज (दि. २०) त्यांची तिथीनुसार जयंती, त्यानिमित्त...

महाराष्ट्राच्या संत परंपरेत अनेक संतांनी आपल्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली. मात्र, आपल्या अभंगांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतात भक्तीचा संदेश पोहोचवणारे संत म्हणजे संत नामदेव महाराज! विठ्ठलभक्ती, नामस्मरण, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विस्तारात मोलाचे योगदान दिले. संत नामदेवांचा जन्म इ. स. १२७० च्या सुमारास नरसी-बामणी येथे झाला, असे मानले जाते. लहानपणापासूनच त्यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. विठ्ठलभक्ती हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेल्या नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायातील भक्ती परंपरेला अधिक व्यापक स्वरूप दिले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान आणि भक्तीचा समन्वय साधला; तर नामदेव महाराजांनी अभंग, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यांनी महाराष्ट्राबाहेरही प्रवास केला. विशेषतः पंजाबमध्ये जाऊन त्यांनी विठ्ठलभक्ती आणि नामस्मरणाचा संदेश दिला. त्यांच्या रचनांचा समावेश शीख धर्माच्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये करण्यात आला आहे. यावरून त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून किती दूरवर पोहोचला होता, हे लक्षात येते.

संत नामदेव महाराजांच्या शिकवणुकीचा मुख्य आधार म्हणजे ईश्वराचे नामस्मरण. त्यांच्या मते, परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी मोठमोठे कर्मकांड किंवा अवघड साधना करण्याची आवश्यकता नाही. निर्मळ मनाने केलेले नामस्मरण आणि निस्सीम भक्ती हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. त्यांनी जातिभेद, उच्च-नीचपणा आणि सामाजिक भेदभावाला आपल्या विचारांतून विरोध केला. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नये, सर्वांशी प्रेमाने आणि समानतेने वागावे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. त्यांच्या भक्तीमध्ये केवळ पूजा-अर्चा नव्हती; तर प्रेम, नम्रता, करुणा आणि माणुसकीला विशेष महत्त्व होते.

संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची मैत्री ही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. दोघांनीही भक्ती, ज्ञान आणि समाजप्रबोधनाचे कार्य केले. संत ज्ञानेश्वरांसह नामदेवांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. या प्रवासातून त्यांनी विविध संतांच्या विचारांचा परिचय करून घेतला आणि भक्तीचा संदेश अधिक व्यापक केला. संत नामदेवांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग म्हणजे विसोबा खेचर यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन. या अनुभवानंतर त्यांच्या भक्तीला व्यापक आध्यात्मिक दृष्टी मिळाली. परमेश्वर केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसून तो सर्वत्र आहे, ही जाणीव त्यांच्या विचारांतून व्यक्त झाली. संत नामदेवांनी हजारो अभंगांची रचना केल्याचे मानले जाते. त्यांच्या अभंगांची भाषा साधी, सरळ आणि सर्वसामान्यांना समजणारी होती. त्यामुळे त्यांचे विचार समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचले. त्यांच्या रचनांमध्ये विठ्ठलावरील प्रेम, भक्ताची तळमळ, ईश्वराशी असलेले नाते आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान दिसून येते. त्यांनी कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून लोकांना चांगले आचरण, प्रामाणिकपणा, परोपकार आणि माणुसकीचे महत्त्व समजावून सांगितले. आजही समाजात जातीय भेदभाव, द्वेष, अहंकार आणि असमानता दिसून येते. अशा परिस्थितीत नामदेव महाराजांची शिकवण अधिक महत्त्वाची ठरते. माणसाची ओळख त्याच्या जातीवरून नव्हे, तर त्याच्या विचारांवर आणि कर्मावरून व्हावी, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा संदेश आहे.

संत नामदेव महाराज हे केवळ विठ्ठलाचे भक्त नव्हते, तर भक्तीच्या माध्यमातून समाजाला जोडणारे महान संत होते. त्यांनी वारकरी संप्रदायाला अभंग, कीर्तन आणि नामस्मरणाची समृद्ध परंपरा दिली. महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत पोहोचलेली त्यांची भक्ती परंपरा आजही त्यांच्या व्यापक कार्याची साक्ष देते. त्यांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते - देव शोधण्यासाठी माणसापासून दूर जाण्याची गरज नाही. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी निर्माण झाली; तर तीच खरी भक्ती आहे. म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही संत नामदेव महाराजांचे विचार समाजाला भक्ती, समता आणि माणुसकीचा मार्ग दाखवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT