Sant Gadge Baba | प्रबोधनाचे चालते-बोलते विद्यापीठ File Photo
संपादकीय

Sant Gadge Baba | प्रबोधनाचे चालते-बोलते विद्यापीठ

पुढारी वृत्तसेवा

अनिल दिवसे

अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, शैक्षणिक क्षेत्र, वृक्षारोपण, गोरक्षण, हुंडाबंदी आणि दारूबंदी चळवळ अशा अनेकविध क्षेत्रांत भरीव आणि मोलाचे कार्य केलेल्या संत गाडगेबाबांचा उल्लेख एक थोर समाजसुधारक, लोकसेवक आणि निष्काम कर्मयोगी असा केला जातो. आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने...

संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजसुधारणा आणि विवेकी विचारांचे थोर समाजसुधारक होते. दि. 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेणगाव (जि. अमरावती) येथे जन्मलेल्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य लोकसेवा आणि प्रबोधनासाठी समर्पित केले. गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजामध्ये विधायक बदल व्हावेत, विषमता, अज्ञान, अस्वच्छता दूर व्हावी आणि खर्‍याअर्थाने समाज आधुनिक व्हावा, यासाठी अत्यंत मूलभूत असे प्रयत्न केले. संत गाडगेबाबांच्या जीवन आणि कार्यातून आधुनिक विचार आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोन यांचा नवा अर्थ आजही आपल्याला सापडतो. गाडगेबाबांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समाजामध्ये श्रमाचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी केलेले काम अत्यंत मोलाचे आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी त्यांनी आपल्या हाती खराटा घेऊन स्वतः कृतिशील आदर्श घालून दिला. त्यांच्या हाती असणारा खराटा हे केवळ स्वच्छतेचे साधन म्हणून नव्हे, तर सामाजिक आरोग्य, श्रम प्रतिष्ठा, सामाजिक समता, ध्येयनिष्ठा आणि सामूहिक आनंदाच्या संवर्धनाचा एक अविभाज्य भाग होता.

गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजातील शोषणकारी अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात, यासाठी अतिशय तळमळीने प्रयत्न केले. शोषणकारी कर्मकांडे, अनिष्ठ रुढी-परंपरा नष्ट व्हाव्यात, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मुक्या प्राण्यांची हत्या करू नका, भ्र्रामक कर्मकांडे, नवसायास आणि भूतप्रेत यावर विश्वास ठेवू नका, असे गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून लोकांना अंतरीच्या कळवळ्यातून सांगत राहिले. दगडात देव शोधण्यापेक्षा माणसामधला आणि निर्सगातला देव पाहण्याची द़ृष्टी गाडगेबाबांनी समाजाला दिली.

गाडगेबाबांनी अतिशय सजगपणे लोकजीवनाचे निरीक्षण केले. त्यातून देवधर्माच्या नावावर चाललेले गरिबांचे आर्थिक-मानसिक आणि शारीरिक शोषण, हिंसा यांचे एक विदारक चित्र त्यांनी अनुभवले. सावकारशाहीचा विळखा, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे शेतकरीवर्गाच्या पिढ्यान् पिढ्या कशा वाया जात आहेत, हेही अगदी त्यांनी जवळून पाहिले. शेतकर्‍यांचे शिक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन झाले, तरच त्यांच्या समस्या खर्‍याअर्थाने सुटतील व त्यांचे जीवन सुखी होईल, या भावनेतून त्यांनी राज्यभर शिक्षणाचा जागर केला. तसेच ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे त्यांचे आवडते भजन होय.

गाडगेबाबा म्हणजे समाजाच्या जडणघडणीसाठी दिवस-रात्र राबणारे कर्मयोगीच होते. समाज आरोग्यसंपन्न आणि निकोप व्हावा, नेहमी आनंदी राहावा, यासाठी त्यांनी व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र प्रबोधन केले. काहीजण ध्येयप्राप्तीसाठी अपार कष्ट करतात, तर काहीजण व्यसनाच्या आहारी जाऊन कष्ट करून मिळवलेला पैसा व्यसनासाठी घालवतात आणि म्हणूनच कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी समाजाला प्रबोधनाची हाक दिली. गाडगेबाबांकडून आपण आजच्या काळात कोणता आदर्श घेऊ शकतो, याचा विचार केल्यास प्रत्यक्ष कृतीमधून लोकांपुढे आदर्श निर्माण करण्याचे कार्य गाडगेबाबांनी केलेले जाणवते. दिवसभर हातात झाडू घेऊन रस्ते स्वच्छ करण्याचे काम केले. रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ आणि निर्मळ करण्याचे कार्य केले. केवळ उपदेश करण्यापेक्षा उपदेशाला कृतीची जोड दिली. त्याचप्रकारे आपण कृती आणि ज्ञान यांचा समन्वय साधून लोकशिक्षणाचे कार्य करावे, असा संदेश गाडगेबाबांच्या चरित्रातून आजच्या काळात मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT