संपादकीय

Russia Ukraine War : प्रत्यक्ष युद्ध आणि माहिती युद्ध

Arun Patil

रशिया माहिती युद्ध किंवा मानसिक युद्ध करण्याची प्रचंड क्षमता असलेले राष्ट्र आहे. अमेरिका, युरोप आणि 'नाटो'सुद्धा माहिती युद्धामध्ये माहीर आहे. गेले 17 दिवस चाललेल्या माहिती युद्धामध्ये यामध्ये नेमके काय केले गेले? याचा सैन्यावर, राष्ट्राच्या सामान्य जनतेवर आणि जागतिक मतावर काय परिणाम झाला? यामध्ये कोण जिंकले आणि कोण हरले?

रशिया आणि युक्रेन युद्धामधील एक वेगळा महत्त्वाचा पैलू जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे, तो म्हणजे माहिती युद्ध किंवा मानसिक युद्ध. जगातील टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ दाखवले गेलेले युद्ध म्हणून याकडे पाहता येईल. प्रत्यक्ष जमिनीवर युद्ध सुरू असताना मानसिक युद्धही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रशियाला माहिती युद्ध किंवा मानसिक युद्ध करण्याची प्रचंड क्षमता असलेले राष्ट्र समजले जाते. रशियाने याचा वापर सिरिया, इरान आणि अर्मेनियामध्येसुद्धा केलेला होता. अमेरिका, युरोप आणि 'नाटो'सुद्धा माहिती युद्धामध्ये माहीर आहे. रशियाच्या माहिती युद्धामध्ये डिप फेक टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.

याचा अर्थ कॉम्प्युटरच्या मदतीने तयार केलेली खोटी ऑपरेशन्स, जी प्रत्यक्ष झालेली नाहीत, ती सदोदित दाखवत राहायची. असे दाखवायचे की, रशिया आपल्यावर हल्ला करणार आहे. यामागचा उद्देश युक्रेनच्या जनतेला घाबरून टाकायचे. ज्यामुळे ते देशाच्या सरकारच्या विरोधात जातील; परंतु तसे झाले नाही. याचा उलटा परिणाम झाला आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की हे युक्रेनचे हिरो बनले.

डिप फेक टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळी खोटी चित्रे, ग्राफिक्स, वेगळ्या विषयावर लेख, फोटो टाकले जातात. युद्धाची माहिती मिळवण्यासाठी माध्यमे शोध घेत असतात. त्यांना प्रचंड प्रमाणात अशी माहिती मिळते. रशियाने सायबर जगतामध्ये सीमेवर सैन्याच्या जमवाजमवीचे शेकडो व्हिडीओ टाकले. टिकटॉक किंवा इतर सोशल मीडियावर रशियाकडून आक्रमक कारवाई केली जात असल्याचे दाखवले गेले.

याशिवाय आंतरराष्ट्रीय मते जिंकण्याकरिता रशिया सैन्याला मागे घेऊन जाणार आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघटनेमध्ये रशिया आता जबाबदारीने वागेल असे लेख प्लॅन केले गेले. परंतु, लगेच ही पद्धत बदलली आणि बेलारुसमधल्या केवळ स्वातंत्र्यलढ्याला रशियाने मदत केली, असे दाखवले. जी दोन राज्ये युक्रेनपासून वेगळी झाली, तीसुद्धा स्वत:हून वेगळे होण्याची मागणी करत होती, असे दाखवले. यामागचा उद्देश असा होता की, रशियन सैन्य या लढाईला लढाई म्हणत नाही. ते केवळ याला एक 'स्पेशल ऑपरेशन' म्हणते.

केवळ युक्रेनमध्ये असलेल्या नाखूश लोकांना मदत करण्याकरिता रशियन सैन्य हे तिथे पोहोचलेले आहे. नंतर असेही दाखवले की, रशियन नौदल समुद्रातून ओडिशा आणि निकोराय भागावर हल्ला करणार आहे, असे दाखवले. परंतु, खरा हल्ला खारकिव्ह आणि खेरसोन या शहरांवर झाला. याचाच अर्थ माध्यमांचा वापर अचूकपणाने, चतुराईने करून युक्रेनसह जगाची दिशाभूल केली गेली.

युक्रेनवर सायबर हल्ला झाल्यानंतर तेथील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद पडली. त्यावेळी अ‍ॅलन मस्क यांनी सॅटेलाईटच्या मदतीने युक्रेनला इंटरनेट दिले. त्यामुळे युक्रेन मानसिक युद्धात रशियाचा जोरदार मुकाबला करत आहे. युक्रेनने दाखवले की, नेक आयलंडवर त्यांच्या 12 सैनिकांनी रशियन सैन्याशी लढा दिला; पण हे खरे होते का? युक्रेनचे शूर सैनिक, सामान्य नागरिक लढाईसाठी तयार आहेत, हे दाखवण्यासाठीची ती रणनीती होती. त्यात यश आले असेलही; परंतु दुसरीकडे 20 लाखांहून जास्त नागरिकांनी युक्रेन सोडले आहे.

अशाच प्रकारे युक्रेनच्या राष्ट्रपतींना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवले. यामुळे असे दिसले की, युक्रेनचे राष्ट्रपती स्वत: युद्धात भाग घेत होते. त्यातून ते देशाचे हिरो बनले. वेस्टर्न मीडियामध्ये रशियाच्या हल्ल्याला एक राक्षसी हल्ला असे दाखवले गेले. रशियन सैन्याने युक्रेनच्या हॉस्पिटलवर हल्ला केला. यामध्ये स्त्रिया आणि लहान मुले मारली गेली, असेही दाखवले गेले.

युक्रेननेही रशिया त्यांच्या विरुद्ध प्रचंड मोठा बॉम्ब वापरत आहे, असा आभास तयार केला; परंतु ते नक्कीच खरे नसावे. रशियाने युक्रेनच्या न्युक्लिअर रिअ‍ॅक्टरवर हल्ला केल्याने तिथे अणुबॉम्बचा स्फोट होऊ शकतो, असेही दाखवल्याने काळजी वाढली. युक्रेनने पकडलेल्या रशियन सैनिकांच्या मुलाखती टीव्हीवर प्रकाशित केल्या. यामध्ये रशियन सैनिक सांगत होते की, आम्हाला या लढाईमध्ये यायचे नव्हते.

आम्ही केवळ तीन वर्षांकरिता रशियन सैन्यामध्ये आलो आहोत. याशिवाय रशियाचे बरबाद केलेले रणगाडे, मोठ्या गाड्यांचेसुद्धा फोटो दाखवले. हे किती खरे आहे, याविषयी साशंकता आहे. रशियाने केलेल्या माहिती युद्धाचा युक्रेनवर फारसा परिणाम झाला नाही. युक्रेनचे नेतृत्व, त्यांचे सैन्य आणि बहुतांश नागरिक युद्ध लढत आहेत; मात्र रशिया सांगण्याचा प्रयत्न करत होता की, आम्ही जे हल्ले करत आहे, ते फक्‍त लष्करी तळावर करत आहोत किंवा जेथून फायरिंग होत आहे तिथे करत आहे. आम्ही नागरिकांच्या घरांवर हल्ले करत नाही.

माहिती युद्धाचा परिणाम काय झालेला आहे?

रशियाविरुद्ध चाललेले माहिती युद्ध वेस्टर्न वर्ल्ड आणि युक्रेन चालवत आहे. त्याला यामध्ये जास्त यश मिळत आहे. जगामध्ये बहुतेक देश माहिती युद्धात रशियाच्या विरोधात गेले आहेत. युनायटेड नेशन्समध्ये झालेल्या मतदानामध्ये 143 देशांनी रशिया हल्लेखोर आहे म्हणून त्यांच्या विरोधात मतदान केले. फक्‍त तीनच देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केले आणि 35 देश या मतदानामध्ये तटस्थ राहिले. याचाच अर्थ जगाचे मत हे मोठ्या प्रमाणात रशियाविरोधात आहे. पण, म्हणून रशिया युद्ध थांबवेल का? याचे उत्तर आहे, 'नाही'.

कारण, रशियाला माहिती आहे की, नाटो किंवा युरोप हे फक्‍त माहिती युद्ध करू शकतात. प्रत्यक्ष लढाई करण्याची त्यांची क्षमता नाही. 18 दिवसांच्या लढाईनंतर असे म्हणता येईल की, युक्रेन आणि रशिया एकमेकांच्या विरोधात माहिती युद्ध प्रचंड प्रमाणात करत आहेत आणि जगातील माध्यमे याला बळी पडत आहेत. यामध्ये नेमके खरे काय आणि खोटे काय, हे कळणे कठीण आहे. तूर्त तरी या माहिती युद्धात युक्रेन पुढे आहे. परंतु, यामुळे रशियाचा हल्ला थांबेल आणि रशिया परत जाईल, अशी शक्यता नाही.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन
निवृत्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT