युवराज इंगवले
वाढती लोकसंख्या जागतिक समस्या होत असताना रशियात मात्र मुलांना जन्माला घालण्याचे धोरण अवंलबले जात आहे. त्याला कारण आहे, गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध! यामध्ये लाखोंच्या घरात सैनिक मारले गेल्याने रशियात घटती लोकसंख्या चिंतेचे कारण बनत आहे. अशातच नेपाळी आणि भारतीय तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून युद्ध मैदानात रशियाने उतरवले आहे; पण घटत्या लोकसंख्येच्या समस्येवर रशियाने एक शक्कल लढवली आहे. रशियात आता बाळ जन्माला घालणार्या आणि त्याचे संगोपन करणार्या तरुणींना सुमारे एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे आमिष दाखविले जात आहे, हे विशेष! ही योजना मार्च 2025 मध्ये रशियाच्या 10 भागांमध्ये सुरू झाली आहे.
देशातील कमी होणारी लोकसंख्या आणि वृद्धांचे वाढते प्रमाण या समस्येवर तोडगा काढणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सुरुवातीला ही योजना केवळ 18 वर्षांवरील महिलांसाठी होती; परंतु आता यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश केला आहे. रशियामध्ये 2023 मध्ये प्रतिमहिला सरासरी जन्मदर 1.41 होता, तर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हा दर 2.05 असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे रशियन सरकार प्रोनेटलिस्ट धोरण म्हणून ओळखल्या जाणार्या योजना राबवत आहे. लोकांना जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रेरित करणे हा या धोरणांचा उद्देश आहे. सध्या लोकसंख्येच्या बाबतीत रशिया जगातील नववा सर्वात मोठा देश असला, तरी तिथे लोकसंख्या कमी होण्याचा धोका वाढत आहे.
रशियातील एका सर्वेक्षणानुसार, 43 टक्के लोक या धोरणाच्या बाजूने आहेत, तर 40 टक्के लोक याचा विरोध करत आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतीन हे सांगत आहेत की, मोठी लोकसंख्या देशाला मोठी लष्करी ताकद बनविण्यात मदत करते, ज्यामुळे देश सामर्थ्यवान बनतो. काही तज्ज्ञ या धोरणाला रशिया-युक्रेन युद्धाशीही जोडून पाहत आहेत. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या लोकसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे. या युद्धात आतापर्यंत सुमारे 2.5 लाख रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय, युद्धामुळे लाखो सुशिक्षित तरुण रशिया सोडून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर, रशियन संसदेने 2024 मध्ये एक कायदा मंजूर केला आहे, ज्याचा उद्देश ‘चाईल्ड-फ्री’ म्हणजेच मुले न जन्माला घालण्याच्या विचारसरणीला आळा घालणे आहे.
या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा जाहिरात लोकांना लग्न आणि मुले जन्माला घालण्याऐवजी अविवाहित राहण्यासाठी किंवा केवळ करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करू शकत नाही. यासोबतच खासगी क्लिनिकमध्ये गर्भपात करण्यावरही कडक निर्बंध लादले जात आहेत. रशियात मातृत्व आणि कुटुंबांना सामाजिक सन्मान देण्यासाठी प्रतीकात्मक पावले उचलली जात आहेत. 10 किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालणार्या महिलांना ‘मदरहुड मेडल’ (मातृत्व पदक) दिले जाते. सोव्हिएत संघाच्या काळात दिला जाणारा हा सन्मान पुतीन यांनी पुन्हा सुरू केला आहे.