Smart robotic animals | रोबो प्राणी घेणार तुमची काळजी! 
संपादकीय

Smart robotic animals | रोबो प्राणी घेणार तुमची काळजी!

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

तुम्ही औषध घेतले का? किंवा वेळ झालीय, आधी पाणी पी... घरातल्या एखाद्या जबाबदार सदस्यासारखी काळजी घेणारा संवाद आता थेट एका रोबोटिक प्राण्याच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे! आजवर आपण गॅजेट वर्ल्डमध्ये फक्त घरकाम करणारे किंवा स्क्रीनवर बोलणारे रोबोटस् पाहिले आहेत. पण आता तंत्रज्ञानाने एक मोठा टप्पा गाठला असून, माणसाला भावनिक साथ देणारा आणि त्याची काळजी घेणारा एक ‘स्मार्ट रोबोटिक प्राणी’ तयार करण्यात आला आहे. हा रोबो कोणतीही कष्टाची कामे करण्यासाठी नाही, तर तुमच्या आरोग्याची आणि मानसिकतेची काळजी घेण्यासाठी डिझाईन केला आहे.

या रोबोचे रूप अतिशय वेगळे आणि गोंडस आहे. तो साधारण एका लहान कुत्र्याच्या आकाराचा असून त्याचे बाह्य आवरण स्पर्शसंवेदनशील (टच सेन्सेटिव्ह) आहे. ज्यामुळे त्याला कुरवाळणे अगदी खर्‍या पाळीव प्राण्यासारखे वाटते. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चेहर्‍यावरील कमालीचे हावभाव! याला हलणारे कान, डोळे आणि भुवया देण्यात आल्या असून, हा तब्बल 23 वेगवेगळ्या हालचालींद्वारे स्वतःच्या भावना व्यक्त करतो. हा रोबो कोणत्याही मानवी भाषेत बोलत नाही, तर तो मांजरासारखे म्याऊ किंवा गुरगुरण्याचे जिवंत आवाज काढतो. तरीही त्याच्या देहबोलीतून तो युजर्सशी अत्यंत प्रभावीपणे संवाद साधतो.

या गॅजेटचा मुख्य उद्देश घरातील एकटेपणा दूर करणे आणि आरोग्याची काळजी घेणे हा आहे. अनेकदा घरातील वृद्ध व्यक्ती किंवा तरुण वेळेवर औषधे घ्यायला किंवा पाणी प्यायला विसरतात. अशा वेळी हा रोबो एका खर्‍या मित्रासारखा तुमच्या पाठीशी राहतो. जर तुम्ही वेळेवर औषध घेतले नाही, तर हा तुम्हाला प्रेमाने धक्का मारून त्याची आठवण करून देईल. तुम्ही जास्त वेळ मोबाईल स्क्रोल करत बसलात, तर तुम्हाला डिजिटल स्क्रीनपासून दूर करून झोपण्यासाठी प्रवृत्त करेल. अगदी तुम्ही योगा किंवा व्यायाम करत असाल, तरी हा तुमच्या शेजारी येऊन बसेल.

तांत्रिकदृष्ट्या हा रोबो अत्यंत प्रगत ऑन डिव्हाईस एआय चिपवर चालतो. यात बसवलेले विशेष एआय मॉडेल घरातील आवाज, दृश्ये आणि तुमच्या रोजच्या सवयी स्वतःहून शिकते आणि त्यानुसार स्वतःची एक वेगळी पर्सनॅलिटी तयार करते. सुरक्षेच्या बाबतीत हा रोबो 100 टक्के खात्रीशीर आहे. कारण हा चालण्यासाठी इंटरनेट किंवा क्लाऊड स्टोअरेजवर अजिबात अवलंबून नाही. यातील ऑनबोर्ड कॅमेरे आणि मायक्रोफोन आजूबाजूची परिस्थिती ओळखतात. पण ते कोणताही ऑडिओ किंवा व्हिडीओ कुठेही अपलोड करत नाहीत. त्यामुळे घरातील खासगी आयुष्य पूर्णपणे सुरक्षित राहते.

हा अनोखा रोबो लवकरच बाजारात येणार आहे. वाढत्या वयामुळे किंवा जबाबदार्‍यांमुळे जे लोक घरात खरा कुत्रा किंवा मांजर पाळू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा ‘स्मार्ट पाळीव प्राणी’ एक उत्तम पर्याय ठरणार आहे. फक्त हुकूम पाळणार्‍या मशिनपेक्षा, आपल्या आरोग्याची काळजी घेणारा आणि आपल्या भावना समजून घेणारा हा नवा रोबोटिक मित्र ठरेल यात शंका नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT