हरियायाणाच्या कैथल जिल्ह्यातील धनौरी गावात दोन किशोरवयीन मुलांची क्रूरपणे गळा चिरून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, ही हत्या त्यांच्याच वयाच्या मुलांनी केली, हे अधिकच विचलित करणारे आहे. ही घटना केवळ हिंसक नव्हे, तर समाजात वाढत चाललेली असंवेदनशीलता आणि नैतिक मूल्यांची घसरण दर्शवणारी आहे.
विशेषतः हरियाणातील घटनेत अरमान नावाचा मुलगा, जो मारला गेला, तो पाच बहिणींचा एकुलता भाऊ होता. त्याच्या कुटुंबावर यामुळे आपत्तीचा डोंगर कोसळलेला आहे. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 14 -15 वर्षांची मुले-मुलींची इतकी छेडछाड का करतात? वयाच्या या टप्प्यावर अशा विकृत कल्पना त्यांच्या मनात कुठून येतात? आपल्या कुटुंब संस्था त्यांना असे संस्कार का देऊ शकत नाहीत की, ते इतर मुलींबाबत आदरभाव ठेवतील? शिक्षण संस्थांमध्ये नैतिक शिक्षण लयाला गेले आहे का? शिक्षक विद्यार्थ्यांना सद्वर्तनाचे, सदाचाराचे महत्त्व पटवून देण्यात कमी पडत आहेत का? याखेरीज हत्येतील आरोपींच्या मनोवृत्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी हे का गृहीत धरलं की, छेडछाडीचा बदल गळा चिरूनच घेता येतो? ही मानसिकता कुठून आली? या क्रौर्यामागे नेमकी कारणे काय आहेत?
यामागे एक चटकन समोर येणारे कारण म्हणजे, मनोरंजन माध्यमे. बॉलीवूडने दशकानुदशके समाजात जी अपसंस्कृती रुजवली, तिचा हा परिणाम मानला जातो. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ‘हीरो’ नायिकेची छेड काढताना, तिला त्रास देताना दाखवला जातो. मग, पुढे तोच नायक तिचा प्रियकर बनतो आणि हीच छेडछाड प्रेमविवाहात रूपांतरित होते. या कथानकांनी किशोरवयीन मुलांमध्ये हे बिंबवलं की, छेडछाड म्हणजेच प्रेमाचे पहिले पाऊल. टीव्ही मालिकांनी तर यात आणखी भर घातली. टीआरपीच्या शर्यतीत क्रौर्य, असंवेदनशीलता यांची स्पर्धा लागली. परिणामी, समाजात अशा वागणुकीकडे ‘न्यू नॉर्मल’ म्हणून पाहिलं जाऊ लागलं. शिक्षण संस्था आणि कुटुंब संस्था या विचित्र प्रवृत्ती खोडून काढण्यात कमी पडल्या. इंटरनेटच्या झपाट्याने वाढलेल्या वापरामुळे आणि सोशल मीडियामुळे तर स्वैर लैंगिक वर्तनाचे अराजक रूपच निर्माण झाले. किशोरवयीन मुलांच्या हातात आलेल्या मोबाईल फोनने त्यांना वेळेआधीच प्रौढ करून टाकलं आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर ना पालकांचे नियंत्रण आहे ना शिक्षकांचे! कोव्हिड काळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांना मोबाईलचा मोकळा वापर मिळाला; पण त्यातून अनेक मुले अश्लील कंटेंट आणि विकृत विचारसरणीकडे ओढली गेली.
आज स्थिती अशी आहे की, अनेक किशोरवयीन मुले पोर्नोग्राफिक कंटेंट, अश्लील गाणी, व्हिडीओ आणि हिंसक वेबसीरिज पाहून त्याचे अनुकरण करू लागली आहेत. मोबाईल आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या विषप्रवाहात ही मुले वाहून जात आहेत. दुर्दैवाने, त्यांना आज कुणी सांगणारे नाहीये की, हा मार्ग आत्मविनाशाचा आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि बि—टनसारखे देश याविरोधात कायदे करत आहेत. शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालत आहेत; पण आपल्या देशात अजूनही अशा कठोर उपाययोजना नाहीत. कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर टिप्पणीनंतर आपल्या नेत्यांना जाग येईल. धनौरी गावातील ही हत्या केवळ दोन किशोरवयीनांचा मृत्यू नाही, तर आपल्या समाजातील मूल्यव्यवस्थेचा आणि दिशाहीनतेचा आरसा आहे. यावर उपाय म्हणून काही गोष्टी तातडीने गरजेच्या आहेत. कुटुंबात नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा. शाळांमध्ये केवळ पाठ्यपुस्तकांचे शिक्षण पुरेसे नसून मूल्यशिक्षणाचा समावेश केला गेला पाहिजे.