स्वतःला वापरण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या गाड्या असोत किंवा घोडे असोत किंवा पाळलेले भारी श्वान असोत किंवा बांधलेले बंगले असोत... या सर्वांशिवाय धनाढ्य लोकांना प्रतिष्ठेसाठी पिस्तूल असणे आवश्यक असते. धनसंचय खूप झाला की, लोकांच्या नजरेत येते आणि या धनवान माणसाला असुरक्षित वाटायला लागते. कोणी आपल्यावर हल्ला करेल काय? कोणी आपली सुपारी देईल काय? कुणी मुलाबाळांचे अपहरण करेल काय? अशा एक ना अनेक चिंता त्यांना सतावत असतात. या असुरक्षिततेच्या भावनेमधूनच सोबत रिव्हॉल्व्हर बाळगणे त्यांना महत्त्वाचे वाटायला लागते. अमेरिकेसारख्या देशांमध्ये काडेपेट्या विकाव्यात तशी पिस्तूल विकली जातात. आपल्या देशात देशात अजून तशी सुविधा नाही.
प्रतिष्ठेचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे वाढदिवस जोरदार साजरा करणे. आपल्यासारखे सामान्य लोक घरी एखादा छोटासा केक आणून तो कापून मुलाबाळांचा वाढदिवस साजरा करतात. ज्येष्ठ आणि वयाने मोठी माणसे वाढदिवस साजरा करायला नको म्हणतात. एकंदरीत म्हणजे आपले सामान्य लोकांचे वाढदिवस मिळमिळीत असतात. असे काही मोठ्या लोकांचे नसते. त्यांचे वाढदिवस तशाच मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये पूर्वी गुंड मंडळींचे वाढदिवस साजरे करताना त्यांचे चेले हवेत गोळीबार करून वाढदिवस साजरा करीत असत.एका गावात एक असाच मोठा वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी पिस्तुलातून सुटलेल्या गोळीमुळे ज्याचा वाढदिवस होता, तोच जखमी झाला आहे. चार-पाच धनाढ्य मित्र एकत्र आले आणि त्यांनी आपल्यापैकी एकाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यासाठी सर्व नियोजन केले होते.
ज्याच्याकडे पिस्तूल नाही, त्याला या हत्याराबद्दल फार कुतूहल असते. ज्याच्याकडे पिस्तूल नाही अशा एका मित्राने सहज म्हणून पिस्तूल हातात घेतले आणि ते हाताळताना त्यातून गोळी सुटली ती थेट ज्याचा वाढदिवस होता, त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे आणि खासगी रुग्णालयात उपचार करायचे करून घेत आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या मोठ्या लोकांच्या पद्धती वेगळ्या असतात. गोळीबाराची घटना घडली तेव्हा पोलिसांना तिथे काही ग्लास, हुक्का पाईप आणि पत्त्यांचे सेट मिळाले आहेत. गोळीबार करणारे उपकरण आपण हाताळत आहोत याची जाणीव हाताळणार्या व्यक्तीला नव्हती.