Education System Reform | उच्च शिक्षण आनंददायी व्हायचे तर... 
संपादकीय

Education System Reform | उच्च शिक्षण आनंददायी व्हायचे तर...

पुढारी वृत्तसेवा

प्रा. गौतम बिस्वास, माजी संचालक, आयआयटी, गुवाहाटी

शिक्षणपद्धती, मूल्यमापन, वसतिगृह-कॅम्पसमधील वातावरण आणि विद्यार्थ्यांना अपयशातून पुन्हा उभे राहण्याची संधी देणाऱ्या व्यवस्थेचा नव्याने विचार करण्याची गरज आहे.

विद्यापीठे किंवा संस्थांमधील काही विद्यार्थी विशेषतः संवेदनशील गटात मोडतात. उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्यावर शैक्षणिक दबाव, आर्थिक ताण, सामाजिक वातावरणाशी जुळवून घेण्यात येणाऱ्या अडचणी, आयुष्यातील स्थित्यंतरे, विविध आव्हाने आणि मैत्री संबंधांतील समस्या यांचा भार जाणवतो. गेल्या काही वर्षांत ही आव्हाने बदलत गेली आहेत. आयआयटीच्या बाहेर त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहिले जाते. सामाजिकदृष्ट्या विशेषाधिकारप्राप्त गट मानला जात असूनही काही विद्यार्थ्यांना वैयक्तिक आयुष्यात नैराश्याचा सामना करावा लागतो. त्यामागे पुढील कारणे आहेत. काही विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होतो आणि त्यांच्यापैकी काही जण अनिष्ट कृती आणि सवयींकडे वळतात, वसतिगृहांमधील राहणीमानाशी संबंधित समस्यांबाबत काही विद्यार्थी आणि प्राध्यापक चिंतित आहेत. बहुतेक वसतिगृहांवर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा भार आहे. त्यामुळे तेथील राहणीमान अपेक्षेप्रमाणे राहत नाही. काही विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासाची सवय सुटणे ही सामान्य बाब आहे. मानसिक थकवा, स्पष्ट उद्दिष्टांचा अभाव, डिजिटल माध्यमांमुळे होणारे लक्ष विचलित होणे किंवा अभ्यासाचा प्रचंड भार ही त्यामागील कारणे असू शकतात. अभ्यास हा दैनंदिन दिनक्रमाचा भाग राहिला नाही की काम पुढे ढकलण्याची सवय वाढते. त्यामुळे पुन्हा शिस्तबद्ध दिनक्रमाकडे वळणे आणखी कठीण होते.

वरील समस्यांवर सध्याच्या उपाययोजनांपेक्षा पुढे जावे लागेल. मुख्य म्हणजे समुपदेशन सेवा अधिक प्रभावी आणि सक्रिय करावी लागेल. संस्थेत नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तेथे व्यतीत होणारा काळ आणि त्यांचे राहणीमान शक्य तितके सुखकर आणि संस्मरणीय करण्याचा प्रयत्न या सेवेमार्फत झाला पाहिजे. समुपदेशन सेवेमध्ये प्राध्यापक समुपदेशक आणि विद्यार्थी मार्गदर्शकांचा समावेश असलेले अनेक संघ असले पाहिजेत. विद्यार्थ्यांशी जवळचे आणि सहानुभूतीपूर्ण नाते निर्माण करणे ही प्राध्यापक समुपदेशकाची भूमिका असली पाहिजे. विद्यार्थ्यांचा संस्थेतील वास्तव्याचा संपूर्ण काळ आणि त्यानंतरही हे नाते टिकले पाहिजे. विद्यार्थ्यांसोबत मैत्र जुळले पाहिजे. त्यांच्या समस्यांची माहिती घेतली पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना संवादाशी संबंधित समस्या असतात. काहींना स्वतःच्या मातृभाषेतही आपल्या कल्पना व्यक्त करण्यात अडचणी येतात. काहींना आर्थिक समस्या असतात. वारंवार अपयशामुळे काहींनी आत्मविश्वास गमावलेला असतो. शिकण्यातील रस गमावलेल्या किंवा अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी विविध रणनीती विकसित करण्याची गरज आहे. काही विद्यार्थ्यांना रँगिंगला सामोरे जावे लागते. आम्ही आयआयटी गुवाहाटीमध्ये काही उत्कृष्ट व्यावसायिक समुपदेशकांची नियुक्ती केली होती. अनेक संघही स्थापन केले. वसतिगृहांतील राहणीमान सुधारण्यासाठी तरुण आणि उत्साही प्राध्यापकांनी महिन्यातून एकदा रविवारी वसतिगृहांत विद्यार्थ्यांसोबत रात्रीचे जेवण किंवा नाश्ता करावा, यासाठी आम्ही प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी स्वीकारण्यासाठी कार्यक्षम मार्गही व्यवस्थेने निर्माण केले पाहिजेत. अधिक साहाय्यकारी वातावरण निर्माण करण्यात शैक्षणिक नेतृत्व, प्राध्यापक, समवयस्कांचे जाळे आणि धोरणकर्ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यातील सर्वांत पहिला मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरणाची आवश्यकता आहे. हे वातावरण सकारात्मक, आनंदी आणि विविध उपक्रमांनी भरलेले असले पाहिजे. त्यातून प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या आकांक्षांचे संवर्धन होईल.

विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हे सोपे काम नाही. प्रत्येक वेगळ्या विद्यार्थ्याला प्रेरित करण्यासाठी उत्कटता, बांधिलकी आणि सहानुभूतीची आवश्यकता असते. अध्यापन-अध्ययनाच्या अनुभवामध्ये विद्यार्थ्यांना अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे आणि त्यात त्यांना पूर्णपणे गुंतवून ठेवण्याचे विविध मार्ग आहेत. त्यासाठी त्यांचा विचारपूर्वक सहभाग आवश्यक आहे. पुरेशी ‌‘स्टुडंट केअर‌’ व्यवस्था निर्माण करण्यासाठी चौकटीबाहेरील कल्पनांची आवश्यकता आहे. आयआयटी गुवाहाटीमध्ये आम्ही संपूर्ण आयआयटी व्यवस्थेतील एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणून ‌‘सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी‌’ची निर्मिती केली. तेथे तीन वर्षे या केंद्राने पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तणाव कमी करण्याचे माध्यम म्हणून काम केले. सादरीकरण कलांशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र विकसित केले होते. प्रत्येक सत्रात आम्ही सादरीकरण कलांच्या पुढील शाखांमध्ये शून्य श्रेयांकांचे अभ्यासक्रम चालवत होतो. या अभ्यासक्रमांना शैक्षणिक अधिसभेची मान्यता होती.

भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये आसामच्या सत्रिया नृत्यप्रकारावर विशेष भर होता. वाद्यसंगीत व्हायोलिन आणि तबला आणि हिंदुस्थानी गायन संगीत यांचा वापर होत असे. निवासी कलाकारांच्या एका संघासह संस्थेने विचारपूर्वक अध्ययन आणि काळजीपूर्वक नियोजनाच्या माध्यमातून देशातील काही नामांकित सांस्कृतिक संस्थांसोबत सहयोगी उपक्रम राबवले. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मनापासून सहभाग आणि त्यांचा उत्साह ठळक होता. विद्यार्थ्यांना आपल्या भावना आणि सर्जनशीलता आनंदाने व्यक्त करण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देणे ही या मागील मुख्य कल्पना आहे. अशा प्रयत्नांमध्ये विज्ञानविषयक छंदमंडळे महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना अपयशावर मात करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक वसतिगृहासाठी संस्थेने प्राध्यापकांमधून लोकपाल किंवा लोकप्रतिनिधी नियुक्त केले पाहिजेत. बिटस्‌‍ व्यवस्थेने ‌‘मित्र‌’ किंवा ‌‘साथी‌’ या स्वरूपात याच्याशी जवळीक साधणारी संकल्पना स्वीकारली आहे. हा एक यशस्वी उपक्रम आहे.

शैक्षणिक उत्कृष्टतेशी तडजोड न करता विद्यार्थ्यांचे कल्याण होण्यासाठी कोणत्या व्यावहारिक सुधारणा करता येतील, यासाठी काही सूचना आहेत. पदवी शिक्षण चार वर्षांतच पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. आंतरराष्ट्रीय श्रेयांक पद्धतीनुसार पदवीसाठी जवळपास १६० श्रेयांकांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यासाठीची कालमर्यादा चार वर्षांऐवजी पाच वर्षे निश्चित करता येऊ शकते. एखादा विद्यार्थी संपूर्ण अभ्यासभार स्वीकारण्यास तयार नसेल, तर तो एखाद्या सत्रात कमी अभ्यासभार निवडू शकतो. मात्र एखादा विद्यार्थी चार वर्षांतच अभ्यासक्रम पूर्ण करू शकत असेल, तर त्याला त्यापासून रोखले जाऊ नये. अध्यापनशास्त्रातील ‘मूल्यमापन‌’ घटकामध्ये सुधारणा करता येतील. शैक्षणिक अधिसभा एखाद्या अभ्यासक्रमातील किमान ४० ते ५० टक्के घटक ‌‘ओपन बुक‌’ स्वरूपात ठेवण्याची शिफारस करू शकते. अशा घटकांमध्ये असाइनमेंट, प्रश्नमंजूषा आणि अंशतः पर्यवेक्षणाखाली घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचाही समावेश असू शकतो. ‌‘ओपन बुक‌’ मूल्यमापनाचे प्रमाण प्रत्येक विभागानुसार वेगवेगळे असू शकते. प्रत्येक सत्रातील किमान एक अभ्यासक्रम किंवा विषय ‌‘फ्लिप्ड क्लासरूम‌’ या अध्यापन पद्धतीने शिकवला जाऊ शकतो. प्रयोगशाळेतील अभ्यासक्रमांसाठी कोणतीही अंतिम परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही. त्यांचे मूल्यमापन सातत्यपूर्ण पद्धतीने करता येऊ शकते. शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रलंबित विषय पूर्ण करण्यासाठी अधिक संधी दिल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचे भविष्य कायमचे रुळावरून घसरण्यापासून वाचते. विद्यार्थ्यांना आधार देणारे धोरण त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची क्षमता वाढवते. त्यामुळे त्यांना अपयशाची भीती न बाळगता शिकण्यासाठी आवश्यक अवकाश मिळतो आणि ते यशस्वीपणे ज्ञान आत्मसात करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT