एका महाभागाने तर चक्क जेसीबी यंत्राच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.  Pudhari File Photo
संपादकीय

तडका : असतील तर मिळतील..!

पुढारी वृत्तसेवा

जेमतेम दहा वर्षांपूर्वी जर तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर तुम्हाला सोबत रोख रक्कम बाळगण्याची गरज पडत असे. खिशात, पाकिटात, चोर कप्प्यात, बॅगेत कुठेही पैसे ठेवले तरी ते चोरीला जाण्याची भीती असे. पाकीटमार नावाचे लोक फार पूर्वी मुंबईत आणि नंतर त्यांच्या जमातीचा प्रसार होऊन महाराष्ट्रभर विशेषतः बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर आपली चोरीकला दाखवून लोकांची पाकिटे लंपास करत असत. त्यानंतर जागोजागी एटीएम मशिन आल्या. एटीएमचा लाँगफॉर्म ‘अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन’ असा असला तरी त्याचा खरा लाँगफॉर्म ‘असतील तर मिळतील’ असा आहे. एटीएममध्ये पैसे आहेत, तुमच्याकडे कार्ड आहे, तरी पण तुमच्या अकाऊंटला पैसे असतील तरच ते तुम्हाला मिळतील, हे त्याचे तत्त्व आहे.

चक्क एटीएम फोडायचं नियोजन

पाकीट मारणे, बॅग हिसकावून घेणे अशा किरकोळ गोष्टी करून या क्षेत्रातील चोरही कंटाळले होते. एखाद्याचे पाकीट मारले तर मिळून मिळून मिळणार किती? तर दोन पाचशे रुपये. शिवाय पूर्वी पँटींना वॉच पॉकेट नावाचा एक खिसा असे. लोक किरकोळ रक्कम पाकिटात ठेवून बाकी रक्कम या वॉच पॉकेटमध्ये ठेवत असत. या वॉच पॉकेटचा स्पर्श पोट नावाच्या अवयवाला होत असल्यामुळे तिथून पैसे चोरणे अत्यंत कठीण होते. या सगळ्या प्रकारामुळे चोर मंडळी पण कंटाळली होती आणि घाऊक एकरकमी घबाड मिळण्यासाठी काय करता येईल, याचा शोध घेत होती. एटीएम मशिन आल्याबरोबर या चोरांना आपल्या समस्येचे उत्तर मिळाले. त्यांनी चक्क एटीएम फोडायला आणि नियोजनबद्ध पद्धतीने एटीएम पळवून न्यायला सुरुवात केली. परभणी शहरातील एका महाभागाने तर चक्क जेसीबी यंत्राच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. कुठे एटीएमला जाड दोरखंड बांधून त्याला जीप किंवा तत्सम वाहनाच्या मदतीने ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. सर्वसाधारणतः एका एटीएम मशिनमध्ये वीस ते पंचवीस लाख रुपये बसू शकतात. शंभर-दोनशे रुपयांचे पाकीट मारण्यापेक्षा थेट 25 लाखांची एटीएम मशिन फोडलेले चांगले, असा विचार जर एटीएम फोडणार्‍याने केला असेल तर त्यात काही चुकीचे असावे असे वाटत नाही. उलट पक्षी आपली मेहनत वाया घालवण्यापेक्षा काटेकोर नियोजन करून एकदाच घबाड हाती घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बँकेवर दरोडा टाकणे नको, लोकांची पाकिटे मारणे नको, त्यापेक्षा सरळ सरळ एटीएम फोडावे आणि त्यातील गल्ल्यावर डल्ला मारावा, असा विचार करून चोर मंडळी नियोजन करत असावीत.

एटीएम मशिन सोडून पासबुक प्रिंटिंग मशिन पळवली

नजीकच्या काळात एटीएमच्या यंत्राच्या शेजारी आणखी एक यंत्र आले आहे. या यंत्राच्या साहाय्याने तुमच्या पासबुकवर प्रिंटिंग करता येते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यात झालेला व्यवहार समजू शकतो. या पासबुक प्रिंटिंग मशिनमध्ये एकही रुपया नसतो. लिहिता-वाचता न येणार्‍या काही दरोडेखोरांनी एटीएम मशिन पळवायचे सोडून ही पासबुक प्रिंटिंग करायची मशिन पळवली आणि एक-दीड किलोमीटर जवळच्या शेतामध्ये ती उघडली तेव्हा झालेली चूक त्यांच्या लक्षात आली. शिक्षणाचे महत्त्व समजून देणारी ही घटना याच देशात घडलेली आहे. एकंदरीत किरकोळ चोरीमारी न करता थेट मोठा डाव खेळणारे म्हणजेच एटीएम पळवणारे हे चोर बुद्धिमान आणि चाणाक्षच म्हणावे लागतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT