सुंदरराज पट्टिलिंगम, पोलीस महानिरीक्षक, बस्तर परिक्षेत्र
‘रेड कॉरिडॉर’ म्हणून कुप्रसिद्ध असलेले दंडकारण्य आज शांतता आणि विकासाच्या नव्या वाटेवर उभे आहे. 31 मार्च रोजी नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाने भारताच्या अंतर्गत सुरक्षेत ऐतिहासिक टप्पा गाठला.
भारतीय नकाशावर एकेकाळी ‘रेड कॉरिडॉर’ म्हणून ओळखल्या जाणार्या दंडकारण्यातील परिस्थिती आज पूर्णतः बदलली आहे. 31 मार्च 2026 ही तारीख भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण, याच दिवशी आम्ही नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाचे ध्येय साध्य केले. जिथे कधी सुरुंगांचे स्फोट आणि माओवाद्यांच्या दहशतीमुळे जनजीवन विस्कळीत व्हायचे, तिथे आज शांतता आणि विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. हा बदल एका रात्रीत घडलेला नाही, तर त्यामागे सुरक्षा दलांचे अतुलनीय शौर्य, अचूक रणनीती आणि स्थानिक जनतेचा वाढता विश्वास या त्रिसूत्रीचे पाठबळ आहे.
आमच्या ऑपरेशनल रणनीतीचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे विविध दलांमधील अभूतपूर्व समन्वय. डीआरजी, एसटीएफ, बस्तर फायटर्स, कोब—ा यांसारख्या विशेष दलांसह सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी या केंद्रीय दलांनी खांद्याला खांदा लावून काम केले. पूर्वी नक्षलवादी एका राज्यात ऑपरेशन सुरू झाले की, दुसर्या राज्यात पळून जात; मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व नक्षल प्रभावित राज्यांमध्ये असा समन्वय प्रस्थापित केला की, नक्षलवाद्यांना लपण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही.
या संघर्षातील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ मे 2025 मध्ये आला. अबूझमाडच्या दुर्गम जंगलात भीषण चकमकीत सीपीआय (माओवादी) संघटनेचा सरचिटणीस बसवराजू हा मारला गेल्यामुळे नक्षलवाद्यांचे नेतृत्व विस्कळीत झाले. त्यानंतर कोरागुट्टा हिल्समध्ये सलग 21 दिवस चाललेल्या ऐतिहासिक ऑपरेशनने नक्षलवाद्यांची शस्त्रास्त्र निर्मितीची फॅक्टरी आणि त्यांचे शेवटचे सुरक्षित आश्रयस्थान उद्ध्वस्त केले. यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आणि उरलेले केडर मोठ्या संख्येने शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात सामील होऊ लागले.
बस्तरचा 42 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग केरळ राज्यापेक्षाही मोठा आहे. घनदाट जंगले, डोंगरदर्या आणि नद्यांनी व्यापलेल्या या दुर्गम भागात बाहेरील दलांना काम करणे आव्हानात्मक होते. म्हणून आम्ही ‘डीआरजी’ (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) आणि ‘बस्तर फायटर्स’ या दलांची उभारणी केली. यात 100 टक्के स्थानिक तरुणांची भरती केली. या जवानांना भौगोलिक परिस्थितीची खडान् खडा माहिती आहे. त्यांना स्थानिक गोंडी, हल्बी आणि भतरी बोलीभाषा अवगत आहेत. आपल्याच भागाच्या शांततेसाठी आणि विकासासाठी जेव्हा स्थानिक तरुण बंदूक हातात घेऊन उभे ठाकले, तेव्हा नक्षलवाद्यांचे ‘लोकल नेटवर्क’ उद्ध्वस्त झाले. महिला कमांडो पथकेही यात मागे नव्हती. त्यांच्यामुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली.
‘बस्तर ऑलिम्पिक्स’ आणि ‘बस्तर पंडुम’ यांसारख्या मोठ्या उपक्रमांतून आम्ही स्थानिक जनतेशी थेट नाते जोडले. या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवांमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील भिंत कोसळली. नियद नेल्लानार (तुमचा चांगला गाव) या योजनेअंतर्गत आम्ही अतिदुर्गम भागात पोलीस कॅम्प उभारले. ते विकासाचे केंद्र बनले. कॅम्पसोबतच रस्ते, शाळा, रुग्णालये आणि रेशनची दुकाने पोहोचली. जनतेला प्रशासनाचा आधार जाणवू लागला, तेव्हा त्यांनी स्वतःहून नक्षलवादाला नाकारले. पूर्वी नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर होणारे खोटे आरोप आता पूर्णपणे थांबले. कारण, गावकरी स्वतः आता पोलिसांचे मित्र बनले आहेत. जेव्हा जनतेला प्रशासनाचा आधार जाणवू लागला, तेव्हा त्यांनी स्वतःहून नक्षलवादाला नाकारले.
2005-06 मधील चुरेगावची माझी पहिली चकमक आजही आठवते, आम्ही वीज कर्मचार्यांना सुरक्षा देण्यासाठी जंगलात गेलो होतो. तो काळ संसाधनांच्या कमतरतेचा होता. आज तंत्रज्ञान आणि मानवी सामर्थ्याच्या जोरावर आम्ही हे युद्ध जिंकले आहे. आजचा बस्तर बदलला आहे. आता आमचे लक्ष केवळ सुरक्षेवर नाही, तर शाश्वत विकासावर आहे. येथील तरुणांना आता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस (लघू वनोपज), इकोटुरिझम आणि होम स्टेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नक्षलवाद आता इतिहासाचा भाग झाला असून, बस्तर आता प्रगती आणि शांततेचा नवा अध्याय लिहीत आहे.