डॉ. नगिना माळी
एखाद्या परिस्थितीचा अर्थ आपण वास्तवाच्या आधारे लावतो की आपल्या सोयीनुसार, यावरच अनेक नाती आणि निर्णय अवलंबून असतात. सोयीच्या अर्थाऐवजी विवेक, सत्य आणि व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज हा लेख अधोरेखित करतो.
व्यक्ती आपल्या सोयीनुसार परिस्थितीचा अर्थ लावते, हे वाक्य नेहमी कानावर पडणारे आहे. आपण त्या अनुभवातून गेलेलो असतो. ती प्रक्रिया आपणही केलेली असते, हे माहिती असूनही असे बोलतोच. या वाक्याचा व्यक्तिपरत्वे अर्थ बदलतो. संदर्भ बदलतो. वाक्य तेच, अर्थ अनेक. म्हणजे काय, तर मला ज्या अर्थामध्ये चांगले वाटते, सुख मिळते, आनंद मिळतो, अगदी दु:खही मिळते, तेच म्हणजे आपण त्या परिस्थितीला दिलेला अर्थ होय आणि ही गोष्ट कोणात आधी घडत असेल, तर शत्रू-शत्रूमध्ये. आता हे काही कट्टर शत्रू नसतात. आपल्याच आजूबाजूचे, कधीतरी नातेवाईकही असतात. कधी ही सोय आपल्यावर येणारा आरोप थांबवण्याची असते, कधी कुरघोड्या करण्याची, कधी वादावाद करण्याची, कधी भांडण लावण्याची, तर कधी सूड उगवण्याची.
जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही, जी या वाक्याचा भाग बनली नाही. कधी ते संदर्भ घरी असतात, तर कधी घराबाहेर. हाच काय तो फरक. या वाक्याची फोड केली, तर समजते की, सोय आणि ‘परिस्थितीचा अर्थ’. सोय म्हणले की, मला जिथे छान वाटते ते, जसे मला हवे तसे आणि परिस्थितीचा अर्थ लावणे म्हणजे काय, दुसरे तिसरे काही नसून सोय पाहणे असते. सर्वसाधारणत: केवळ परिस्थितीचा अर्थ म्हटले, तर सकारात्मकता आहे; पण याला आधी सोय हा शब्द जोडला की, नकारात्मकता झालीच म्हणून समजा. म्हणून स्वत:ची सोय बाजूला ठेवून परिस्थितीचा अर्थ लावायला शिकलो, तर गैरसोय होत नाही. व्यक्तीकडून हे असे रोखले जात नाही, जाणार नाही. कारण, ‘सोयीस’ अपवाद कोणीच नाही आणि त्याबाबत प्रत्युत्तर मिळतेच की, ‘सोय पाहता आली नाही तर काय कामाचे तुम्ही?’ आणि आजकाल तर सोयीनुसार अर्थ लावून त्याचा गाजावाजा केला की, खरेपणाचा आव समोर येतो; पण खरे त्यात काहीच नसते. शून्यातून शून्यात येण्यासारखेच असते ते. तेच लोकांना हवे असते. पटते. मान्य होते. सुख मिळते. आनंद मिळतो. एखाद्या माणसाला कमी कष्टात आनंद मिळत असेल, तर काय हरकत आहे. यापेक्षा काहीही वेगळे नाही.
म्हणून सोयीनुसार परिस्थितीचा अर्थ लावण्यापेक्षा परिस्थितीचा सांगोपांग विचार करून अर्थ लावायला हवा. ‘सोयीस’ अर्थ दिला तर केवळ एका व्यक्तीभोवती फिरणारे ते एक चक्र आहे; पण ‘अर्थास’ अर्थ दिला, तर तो मार्ग होतो. चक्रामध्ये अडकायचे की, मार्गानुसार चालायचे हेही व्यक्तीवर अवलंबून असते. शेवटी तुम्ही चक्रात अडकाल तितके अडचणीत याल. तितकेच चक्रव्यूहात पडाल. आता ही बाब समजण्याइतपत सोपीही नसते. कारण, आपल्यानुसार एखाद्या घटनेचा अर्थ लावणे जितके सोपे तितके परिस्थितीचा अर्थ लावणे सोपे नसते. अर्थ लावण्यासाठी विवेक हवा, सद्सद्विवेक हवा, जाण हवी, वाचन हवे, चर्चा हवी. त्याशिवाय हे शक्यच नाही; पण आजकाल या बाबी आवडत नाहीत. करण्यास वेळ नाही. हीच समस्या आहे.
अजून एक गोष्ट वाखाणण्यासारखी म्हणजे व्यक्ती हा अर्थ लावत असताना कोणतेही संदर्भ पाहत नाही. समोरील व्यक्ती रागात येऊन बोलत असेलही; पण हावभाव साधेच असल्यास आपलाच अर्थ कायम ठेवला जातो. वास्तव काय यापेक्षा वास्तवाअलीकडे काय, हे ठीक वाटते. पलीकडचे आपल्यासाठी महत्त्वाचे नसते. आता या सर्व बाबींमुळे गैरसमज वाढतात. द्वेष वाढतो आणि शीतयुद्धे सुरू होतात. या सर्व परिस्थितींचे पडसाद एकंदरीत समाजमनावर पडते. समाजात अशी मनाने, सोयीने अर्थ लावणाऱ्यांची संख्या वाढली, तर दुरवस्था निर्माण होऊ शकते. संवाद तुटू शकतो व त्याची जागा विसंवाद घेतो. हा असा विसंवाद असतो की, तो नेहमी धुरासारखा पसरतो. हा धूर डोक्यातून उत्पन्न होतो आणि डोक्यामध्येच संपतो.
मनुष्य हा समाजात राहणारा, वाढणारा आणि तिथेच मृत पावणारा आहे, तर मग समाजशील बनण्यात काय अडचण आहे; पण तसे होत नाही. मी, माझी सोय आणि सोयीचा अर्थ यापेक्षा वेगळा व्यक्ती विचार करीत नाही. किंबहुना त्या विचारांचे वारेही अशा व्यक्तीस लागत नाही. सर्व काही त्यातच आनंदी-आनंदगडे वाटते; पण हाही विचार करायला हवा की, हा आनंद नसतो, शांतता नसते. हे मानाने मनाची तात्पुरती काढलेली समजूत असते. कारण, सोयीचा अर्थ तेवढ्याच अंतरावरचा असतो. दीर्घकालीन नसतो. म्हणून सोयीपेक्षा वास्तव, सत्य, तत्त्व पाहून अर्थ लावला, तर मन, मेंदू आणि हात याद्वारे योग्य कर्म होणार. त्याचा परिणाम दीर्घकालीन राहणार.