आजच्या युगात जगाचे डिजिटल तंत्रज्ञानावर अवलंबित्व परमोच्च पातळीवर पोहोचले आहे. परिणामी, त्याच्या मुळाशी असलेल्या काही दुर्लभ गोष्टींना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाच घटकांमध्ये महत्त्वाचा एक शब्द म्हणजे, ‘रेअर अर्थ एलिमेंटस्’ (आरईई) अर्थात दुर्मीळ खनिजांचा समावेश होतो. यावर केवळ स्मार्ट फोन अथवा लॅपटॉप नव्हे, तर इलेक्ट्रिक वाहने, सौर पॅनल, विंड टर्बाईन, अत्याधुनिक लष्करी यंत्रणा, अगदी आण्विक पाणबुड्यांपासून उपग्रहांपर्यंत अनेक गोष्टी अवलंबून आहेत; पण ही खनिजे कमी प्रमाणात आणि विशिष्ट भूभागातच मिळत असल्याने ती दुर्मीळ म्हणवली जातात.
आरईईमध्ये सॅमरियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, ल्यूटेटियम, स्कँडियम, यिट्रियम, लँथेनम, नियोडिमियम, प्रासिओडिमियम यासह 17 प्रकारच्या खनिजांचा समावेश आहे. यापैकी काही खनिजे चुंबकीय, काही विद्युतवाहक, तर काही रेडिएशन-प्रतिरोधक गुणधर्मांनी युक्त असतात. उदाहरणार्थ, सॅमरियम हे खनिज लष्करी क्षेत्रात विशेषतः जेट इंजिन आणि पाणबुड्यांमध्ये वापरले जाते. तसेच नियोडिमियम हे उच्च शक्तीच्या चुंबकांसाठी उपयुक्त असून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
यिट्रियम आणि गॅडोलिनियम ही खनिजे मेडिकल इमेजिंग आणि सर्जरीत महत्त्वपूर्ण ठरतात. यातूनच लक्षात येते की, ही खनिजे सामान्य संसाधने नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गाभा आहेत. हे एलिमेंटस् प्रत्यक्षात पृथ्वीवर विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र त्यांना त्यांच्या खनिजांमधून वेगळं करणं आणि शुद्ध करणं खूपच अवघड असतं. ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक असते आणि खूप ऊर्जा लागते. म्हणूनच यांना ‘रेअर’ म्हणजेच दुर्मीळ म्हटले जाते. या धातूंचे खनन केवळ खर्चिकच नाही, तर पर्यावरणद़ृष्टट्याही अत्यंत धोकादायक असते. बहुतेकदा ही खनिजे युरेनियम आणि थोरियम यासारख्या रेडिओसक्रिय घटकांबरोबर मिळून असतात. त्यामुळे यांची खाणकाम प्रक्रिया प्रदूषणकारी व आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
जगात सुमारे 440 लाख टन आरईईचा साठा चीनमध्ये आहे. म्हणजेच जगाच्या एकूण साठ्याच्या 49 टक्के खनिज संपत्तीवर चीनची मालकी आहे. केवळ साठवणुकीच्या पातळीवरच नव्हे, तर जगातील 90 टक्क्यांहून अधिक दुर्लभ खनिजे चीनमध्ये रिफाईन होतात. म्हणजेच उत्खनन ते उत्पादन आणि वितरणापर्यंत दुर्मीळ खनिजांच्या संपूर्ण मूल्यसाखळीवर चीनचे नियंत्रण आहे. भारतात कच्च्या खनिजांचे उत्खनन होते; परंतु त्यांचे शुद्धीकरण व प्रक्रिया करणार्या सुविधा खूप कमी आहेत. बहुतेक वेळा कच्चे खनिज चीनला पाठवावे लागते. या उद्योगात जोखीम जास्त आणि मूल्यवर्धनासाठी खर्चिक असल्याने खासगी कंपन्या फारशा उतरलेल्या नाहीत. चीनने नुकतेच 7 प्रकारच्या महत्त्वाच्या दुर्मीळ खनिजांच्या निर्यातीवर निर्बंध घालून अमेरिका व युरोपसह अनेक देशांना धक्का दिला आहे. या खनिजांचा उपयोग फायटर जेट, मिसाईल यंत्रणा आणि अत्याधुनिक सेन्सर्समध्ये होतो.
चीनच्या या धोरणाचा फटका आता भारतालाही बसू लागला आहे. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणार्या दुर्मीळ चुंबकांची कमतरता जाणवू लागली आहे. यासंदर्भात भारताची चीनसोबत चर्चा सुरू असली, तरी यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, चीन आता खासगी कंपन्यांकडून त्यांच्या गोपनीय उत्पादन डेटाची मागणी करू लागला आहे. ही बाब डेटा सुरक्षेच्या द़ृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. या प्रकारामुळे चीनवर अवलंबून राहून जग आपले आर्थिक आणि लष्करी भविष्य धोक्यात टाकत असल्याचे स्पष्ट होत आहे. याची जाणीव आता अनेक राष्ट्रांना झाली आहे.