गण्या : (नदीकाठी पिऊन तर्र) राम नावाचे मोल जपणारी नदी राज्यात कचरा वाहत आहे. कौतुक करणारे चित्रपट काढतील, बघणारे बघतील आणि पुन्हा कचरा ओततील.
बजा : तू आणि मी काय करणार? ते सरकारला कळायला पाहिजे.
गण्या : राम नदीचे पाणी मंद वाहत मुळा नदीला जातं; पण निर्माल्य, बाटल्या, चपलं, बुटं, काय काय पडलंय बघ.
बजा : कोणाला पर्वा आहे याची!
गण्या : असो! मुद्दा आपल्या राम नदीचा आहे. चित्रपट येतोय या नदीवर आधारित...
बजा : बरेच विषय आहेत नदीसंदर्भात.
गण्या : कोणते?
बजा : नदीचे पुनरुज्जीवन, तिची परिक्रमा याविषयी. त्यामुळे तिला अजून महत्त्व मिळेल.
गण्या : ही छोटी नदी चिंचोळ्या वाटेवरून मुळा नदीला मिळते. का होऊ नये तिचे कौतुक.
बजा : तुझ्या बोलण्यात राम आहे.
गण्या : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
बजा : इथे कोण नसे तैसा. बोले तैसा न चाले त्याची बांधावी पाऊले ऐसे भेटतात एकेक. नशेड्या आता बस कर. घरी जाऊ. तूही मघापासून इथे कचरा टाकलास विसरू नकोस.
गण्या : आता तर महिलांप्रमाणे नदीलापण आरक्षण मिळावे, असे विधेयक काढले पाहिजे.
बजा : नदीला आरक्षण? येडा झाला की काय...
गण्या : हे पिणं म्हणजे मुद्दा भरकटू नये म्हणून.
बजा : वाह! तूच भरकटला आहेस. मुद्दा जागेवर राहील का?
गण्या : आपल्याला कुठं राजकारण खेळायचंय! आरक्षण अशासाठी, नदीने स्वतः आपल्या हक्कासाठी लढायची वेळ आलीय.
बजा : ती पावसाळ्यात लढतच असते. घुसते सैनिकासारखी घाण टाकणार्यांच्या घरादारात.
गण्या : तसे नाही. नदीने धरणं धरलं पाहिजे आरक्षणासाठी.
बजा : मग, खडकवासला हे धरण तिने धरलेलं धरणंच आहे. तिथेही घाण करतात लोक.
गण्या : तिला समुद्राचा दर्जा प्राप्त व्हायला हवा. म्हणजे अदब.
बजा : ते कसं?
गण्या : बागबगिचे आले पाहिजेत भोवती. पर्यटनस्थळं उभारली पाहिजेत. नदीकाठच्या पुरातन मंदिरांचे महत्त्व त्याशिवाय कळणार नाही लोकांना. ती एकाकी पडलीत.
बजा : असं होय? ते बघ गण्या पोलिस येताहेत. आपल्याला एकांती फटके पडणार.
पोलिस : काय रे? काय धिंगाणा चालू आहे? इथे नदीकाठी प्यायला बसता? माहीत नाही का नदी बचाव मोहीम चालू आहे.
बजा : यावरच बोलत होतो आम्ही साहेब.
पोलिस : चला निघा. दारूडे कुठचे.