Ram Navami | लोकहृदयातील श्रीराम 
संपादकीय

Ram Navami | लोकहृदयातील श्रीराम

पुढारी वृत्तसेवा

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

प्रभू श्रीराम... भारतीय लोकजीवनाचा आदर्श. शाश्वत आनंदी जीवन हा रामाचा संदेश आहे. आज रामनवमी. त्यानिमित्त...

प्रभू रामचंद्रांना भारतीय परंपरेतील विष्णूच्या दहा अवतारांंपैकी सातवा अवतार मानण्यात येते. विष्णुसहस्रनामामध्ये राम हे विष्णूचे 394 वे नाव असल्याचा संदर्भ सापडतो. प्रत्येक प्राणीमात्रात ज्याचा वास म्हणजे निवास असतो, जो रमण करतो त्याला राम असे म्हटले जाते. म्हणजेच राम हा प्रत्येक प्राणीमात्राशी आणि मानवसमूहाशी निगडीत आहे. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांना वनवासींनी खूप सहाय्य केले होते. डोंगराळ भागात वनवासींच्या आदर्श आणि अद्भुत शक्तीने भारतीय मूल्यांची प्रस्थापना करून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना लोकहृदयात अधिष्ठित केले.

वाल्मीकींनी रामायण लिहून प्रभू रामचंद्राला साहित्याच्या दालनात अमर केले. तुलसीदासाने रामचरित मानस हा ग्रंथ लिहून संपूर्ण हिंदी भाषक उत्तर भारतात प्रभू रामचंद्रांना मध्ययुगातही अजरामर करून ठेवले. मराठीमध्ये ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या भावार्थ रामायणाने तीन पिढ्यांवर गारुड केले. तसेच दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडूसारख्या राज्यांतही रामायणाचा लोककला-लोकजीवनात समावेश दिसून येतो. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मामध्येही प्रभू रामचंद्रांचे श्रेष्ठत्व आणि पावित्र्य मान्य केले आहे. त्यामुळे श्रीरामाला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जाते.

भारतीय परंपरेनुसार श्रीराम हे सूर्यपूत्र म्हणून ओळखले जातात. रामाचा जन्म सूर्य कुळात झाल्याचे दिसून येते. पुराणानुसार राम, कर्ण आणि शनी हे सूर्यकुळालील तीन वंशज मानले जातात. त्यामुळे रामाभोवती सूर्याचे तेजोवलय प्रकटताना दिसते. अभ्यासकांनी प्राचीन सांस्कृतिक इतिहासाची तुलनात्मक चिकित्सा करून प्रभू रामचंद्र हे आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे सिद्ध केले आहे. रामाचा जन्म कौसल राज्यात कौसल्या व दशरथ यांच्या पोटी झाला. राजघराण्यात जन्म झाला असला, तरी रामाचे जीवन हे कंटकमय होते.

रामायण ही दुष्ट प्रवृत्तीवर सुष्ट सद्गुणाने मिळविलेल्या विजयाची कथा आहे. कुशल नियोजन, उत्तम व्यवस्थापन आणि सामान्य दीनदलित आणि वनवासी यांच्या सामर्थ्यामुळे रामाला विजय मिळविता आला. त्यामुळे वनवासी हे पिढ्यान् पिढ्या रामकथा ऐकत आहेत, सांगत आहेत आणि एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हा अजोड सांस्कृतिक वारसा देत आहेत. रामाभोवती असलेले तेजस्वी वलय राजा माणूस नव्हे, तर लोकनायक म्हणून आजही कायम आहे. रामाविषयीच्या लोककथा भारताच्या कानाकोपर्‍यात विखुरलेल्या आहेत. प्राध्यापक कोडेज यांच्या मते, दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई सुमारे 100 बेटावर म्हणजे इंडोनेशिया, मलेशिया, जावा, सुमात्रा, बोरनियो तसेच व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि थायलंड या देशामध्ये श्रीरामाचे महत्त्व नित्य जीवनात रुजले गेले. थायलंडमधील सम्राट हे स्वत:ला रामाचे वंशज म्हणून धन्य मानतात. तेथील मंदिरे, लोकगीते, लोकनाट्य यातूनही रामायणाचे प्रसंग प्रभाविपणे चित्रित केले जातात. अ‍ॅकोर वॉट हे मंदिर त्याचे उत्तम उदाहरण होय. इंडोनेशियातील अनेक स्थळांना रामायणातील नावे आहेत. रामायण हे संस्कृत महाकाव्य लिहिणारे वाल्मीकी हे मराठवड्यातील परभणी जिल्ह्यातील वालूर या ऐतिहासिक नगरीत जन्मले. तुळजापूरच्या भवानीदेवीने प्रभू रामचंद्रास रावणाने सीतेला कोणत्या मार्गाने लंकेकडे नेले, याचा मार्ग दाखविला. म्हणून तुळजापूरच्या तुळजाभवानीस रामवरदायीनी असे म्हटले जाते. पुढे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू असा प्रभू रामचंद्राने केलेला प्रवासही विविध स्थानांच्या रूपाने व कथांच्या रूपाने प्रकट होतो.

प्रभू रामचंद्र प्राचीन भारतातील लोकल्याणकारी राज्याचे उद्गाते होते. महात्मा गांधींनी त्यांच्या आदर्श राज्य कल्पनेस रामराज्य असे नाव दिले आहे. राम या अर्थाचे अनेक संदर्भ प्राचीन वैदिक संस्कृत भाषेत आढळतात. काही वैदिक ग्रंथांनुसार रामाचा अर्थ आनंददायी, रमणीय, सुंदर, मोहक असा होतो. हिंदू, बौद्ध आणि जैन व शीख परंपरातील अनेक कथा रामाचे सर्वसमावेशक रूप म्हणून प्रकट करतात. शाश्वत आनंदी जीवन हा रामाचा संदेश आहे. रॉड्रीक हिंडरी यांनी हिंदू आणि बौद्ध परंपरेतील तुलनात्मक नीतीशास्त्राचा अभ्यास केला आहे व त्यात रामाचे महत्त्व सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT