Raj Thackeray & Uddhav Thackeray | भाऊबंदकी ते भावबंधन? Pudhari File Photo
संपादकीय

Raj Thackeray & Uddhav Thackeray | भाऊबंदकी ते भावबंधन?

राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर

अरुण पाटील

मृणालिनी नानिवडेकर

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर वयाच्या 65 व्या वर्षी राजकीय जीवनातले सर्वात मोठे आव्हान उभे आहे, ते आव्हान मुंबईवरची सत्ता राखण्याचे आहे. त्यांचे चुलत बंधू आणि एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी राज ठाकरे अशा वेळी त्यांना साथ द्यायला तयार होतील? ‘हॅपी बर्थ डे’ म्हणायल्या गेलेल्या राज यांनी केवळ लाल गुलाब दिले नाहीत; तर आशेचे किरण ‘मातोश्री’त पोहोचवले आहेत. बाळा नंदगावकरांनी सुचवले, राज हे तयार झाले आणि संजय राऊत स्वागताला उभे झाले, अशी आतली बातमी आहे.

मराठी भाषा संवर्धनाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले. मुंबईकरांनी या बंधुभेटीचे उत्स्फूर्त स्वागत केले. उद्धव ठाकरेंनी, ‘एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी’, असे त्या मंचाचा वापर करून जाहीर केले. राज मात्र मराठीच्या मुद्द्याची चौकट ओलांडायला त्या दिवशी तरी तयार नव्हते. राजकारणात ‘मुद्द्यापुरता पाठिंबा’ असा एक शब्द प्रचलित आहे. त्यामुळे राज यांचा मैत्रीचा प्रस्ताव हा केवळ मुद्द्यांपुरता मर्यादित असावा, असे त्यांचे त्या दिवसातले वर्तन सांगत होते. केवळ उबाठाला नव्हे तर सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण होते. सुप्रिया सुळेच नव्हे, तर प्रकाश रेड्डीही मंचावर होते. मराठीचा जयजयकार एवढाच मर्यादित विषय होता. मात्र उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला ‘मातोश्री’ला प्रत्यक्ष जाऊन राज यांनी विषय पुढे जाण्याची शक्यता जागवली आहे. दोन पावले पुढे टाकण्याचे संकेत दिले आहेत. लाल गुलाबाची भेट ही केवळ बंधुभेट नव्हती. माझे मोठे बंधू आणि शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे एक्स पोस्टवर लिहीत राजकीय संदर्भांचा उल्लेख राज यांनी केला. ते चोख शब्दप्रयोग करतात. पुढच्याच वाक्यात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही भेट झाल्याचे लिहून आम्हा दोघांचे मूळ कूळ एक याचा उल्लेख करत सांगायचे ते सांगून टाकले, बोलायचे ते बोलून टाकले!

भावाभावांचे नाते एका प्रखर राजकीय नेत्याच्या वारशामुळे अन्य कुटुंबांपेक्षा वेगळे आहे. चुली वेगळ्या असल्या तरी मालमत्ता संयुक्त आहे. ती स्थावर नाही तर जनतेवरील प्रभावाची आहे. भाऊबंदकीची उदाहरणे पावलोपावली आढळतात. भारतातले अर्ध्याहून अधिक जमीनविषयक खटले हे भावकीचे! अशा सरसकट सर्व खटल्यांची चर्चा थोडीच होते; होते ती ठाकरेंची, अंबानींची. मुंबईतल्या मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे दोघे वारसदार यांच्यातला हा विषय आहे. भावाभावांचे परस्परांशी वाजले ते बाळासाहेबांच्या हयातीत. एक भाऊ आक्रमक तर दुसरा संघटक. परस्परपूरक गुणांचा गुणाकार तर सोडाच, पण बेरीजही झाली नाही. वजाबाकी होत गेली आणि शिवसेनेला मोठा राजकीय फटका बसला. 2008 आणि 2009 ही मनसेच्या ताकदीला जनतेने दिलेल्या प्रतिसादाची वर्षे होती. त्यानंतर मनसेचा जोर ओसरला. राज ठाकरे आरंभशूर असल्याची टीका सुरू झाली आणि त्याच सुमारास उद्धव ठाकरे यांना ‘अच्छे दिन’ आले. भाजपशी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती न करताही उद्धव ठाकरेंनी उत्तम शक्तिप्रदर्शन केले. मोदी लाटेतही बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरही शिवसेनेने उत्तम कामगिरी नोंदवली. याचे श्रेय उद्धव यांच्या नावावरच जमा होईल. असे असतानाही प्रारंभी वेगळे राहून ते भाजप सरकारमध्ये सामील का झाले याची कारणे खरे तर अनाकलनीय आहेत. 2019 साली सत्तेतला अर्धा वाटा म्हणजे मुख्यमंत्रिपद, ते मिळाले नाही म्हणून वेगळे झालो, असा युक्तिवाद करत उद्धव यांनी राजकीय भूमिका बदलली. काँग्रेसशी जवळीक साधत महाविकास आघाडी उभारली. मोदी-शहांना आव्हान दिले. शरद पवार यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, असे उद्धव जाहीरपणे नमूद करतात. ते जनतेला आवडले आहे का याचा निकाल विधानसभेने ‘नाही’ असा दिला.

आता शिवसेनेसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत याचा निकाल पुन्हा एकदा लागणार आहे. तो कमालीचा महत्त्वाचा आहे. शिवसेना हा मुंबईचा आवाज आहे का, हे ठरणार असल्याने राज यांच्याशी हात मिळवत ‘हम साथ साथ है’ हे मतदारांना सांगणे उद्धव यांना गरजेचे वाटत असावे. त्यामुळे वातावरण बदलेल. त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे. भावाला कठीण दिवसात साथ द्यायची का याचा निर्णय घरातून बाहेरचा रस्ता दाखवल्या गेलेल्या, दुखावलेल्या भावाला घ्यायचा आहे. राज कमालीचे मानी आहेत. खर्‍याला खरे म्हणणे आणि खोट्याला खोटे हा ठाकरी बाणा त्यांच्यात ठासून भरला आहे. वरळी डोममध्ये दोघे भाऊ एकत्र आले तेव्हा ते फारसे मोकळे नव्हते. त्यांची काहीसे राखूनची देहबोली पूर्वानुभवाचा भाग असावी. तसेही राज ठाकरे अपयशाची पर्वा करत नाहीत आणि भूमिका बदलल्याच्या टीकेचीही. कधी ते मोदी यांचे प्रशंसक असतात तर कधी विरोधक. यामागची गणिते सांगताना ते जेव्हा जे पटते ते करतो, असे म्हणून मोकळे होतात. धरसोडीचा आरोप झाला तरी एकही आमदार पाठीशी नसलेले राज गर्दी खेचतात. त्यांच्यातला राजकारणी जनतेची स्पंदने जाणून असतो. भावाला आता आपली गरज आहे हे ते नक्कीच जाणत असावेत. कार्यकर्ते युतीसाठी आग्रही आहेत. दोघे एकत्र आले तर शिवसेना उबाठाला दिलासा मिळेल हे उघड आहे. पण मनसेचे काय? राज अशा संकटाच्या वेळी साथ देताना अर्ध्या जागा मागतील काय? भाजपचे नेते खासगीत सांगतात राज - उद्धव एकत्र आले तर शिवसैनिक राज यांच्याकडे पुढचा आणि खरा नेता म्हणून बघतील. भाजप नेत्यांचे हे मत उद्धव यांना केलेल्या विश्वासघातामुळे असू शकेल. याबाबत राज यांना नेमके काय वाटते ते महत्त्वाचे आहे. त्यांना संकटात संधी दिसते आहे का? एकीत बळ आहे असे वाटते काय? मातोश्रीवर ते वादानंतर मोजक्या वेळी सहावेळा गेले. एकदा निरोप घ्यायला, दुसर्‍यांदा उद्धव यांना रुग्णालयातून घरी पोहोचवण्यासाठी. पुढच्या दोन वेळी अत्यवस्थ बाळासाहेबांच्या आजारपणावेळी आणि मृत्यूप्रसंगी. त्यानंतर मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी. निरोप घेतानाची भेट सोडून ही बहुतेक कारणे कौटुंबिक. 20 वर्षांच्या मतभेदानंतर ते पक्षप्रमुख भावाच्या वाढदिवसाला गेले. याचा अर्थ त्यांना मैत्री वाढवायची आहे, असाच काढला जाईल.

प्रत्येक राजकीय मैत्री ही फायद्यासाठी असते. दोन्हीकडचे कार्यकर्ते उत्सुक आहेत. या संभाव्य ऐक्याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेलाच तेवढा बसेल की महायुतीलाही यावर भाजपचीही आकडेमोड सुरू असणार. जनतेच्या मनात काय आहे हे महाराष्ट्राने आधी सांगितले, पुढेही सांगेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवताहेत. जनतेचे मत निवडणुका होतील तेव्हा कळेल. सध्या राज यांच्या मनात काय आहे हे समजणे उत्सुकतेचा विषय आहे. मनसेच्या बैठका वाढल्या आहेत. विस्ताराचे काम करत राहा असे कार्यकर्त्यांना सांगितले गेले आहे. दोघे भाऊ एकत्र आले तर मुंबई जिंकतील का माहीत नाही. पण ते राजकारणातले निर्णायक वळण ठरू शकेल. शिवसेना - काँग्रेस जिथे एकत्र येऊ शकते, तिथे उद्धव- राज यांनी परस्परांना टाळी देणे अशक्य नाही, असे आज तरी दोन्हीकडचे कार्यकर्ते सांगताहेत. राजकीय हेलकाव्यांवर झुलणार्‍या महाराष्ट्राला सध्या नवा राजकीय विषय मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT