राज आणि उद्धव एकत्र येतील का, या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज ठाकरे यांनी टाळीला हात पुढे केला आणि फार आढेवेढे न घेता उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या हाताला हात लावत आपला हात पुढे केला. टाळी अजून वाजलेली नाही आणि लागलेलीही नाही. दोघांचे आता जमले किंवा जमणार असे समजण्याची घाई कराल तर पचका होईल. हे दोघे भाऊ आधी वेगळे का झाले? त्यांच्या वेगळे होण्याची अशी कोणती कारणे शिवसेनाप्रमुख हयात असताना हयात होती आणि आज ती नाहीत?
महाराष्ट्राने सीमाप्रश्नाचा नाद कधीच सोडला आहे. बेळगाव कारवारसह कर्नाटकचा मराठी मुलुख महाराष्ट्रात कधीही येणार नाही हे सर्वांना कळून चुकले आहे. याचे कारण सीमाप्रश्नाची सूत्रे भाजप, काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांच्या हाती आहेत आणि हे दोन्ही पक्ष आपापल्या सीमारेषांमध्ये महाराष्ट्राच्या न्याय्य बाजूनेही उभे राहण्यास तयार नाहीत. जसे सीमाप्रश्नाचे भिजत घोंगडे अनेक पिढ्या पडून आहे उद्धव-राज एकीकरणाचेही तसेच होऊ घातलेले दिसते. फरक इतकाच की सीमाप्रश्नी एक एकीकरण समिती प्रत्येक सरकारात स्थापन होते तशी ‘ठाकरे एकीकरण समिती’ वगेरे अजून तरी कुणी स्थापलेली नाही. बाकी ठाकरेंची भाऊबंदकी ही शिवसेनेतल्याच सीमाप्रश्नांमधून सुरू झाली असल्याने उद्धव-राज यांच्यातला ‘सीमाप्रश्न’ सुटला तरच त्यांचे एकीकरण शक्य आहे.
राज यांनी उद्धव यांचे नाव न घेता समोरच्यांची इच्छा असेल तर एकत्र काम करण्याची तयारी जाहीर केली. उद्धव यांनीही राज यांचे नाव न घेता शिवसेना आणि महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या मंडळींसोबत दादरच्या ‘राज कॅफेत’ सतत चहापान करणार नाही, असा शब्द मागितला. हा शब्द राज देणार असतील तर माझ्या बाजूनेही नसलेले भांडण मिटवत असल्याचे उद्धव यांनी जाहीर केले. दोघेही म्हणाले, भांडण आमच्यात असे नाहीच. आणि राज तर म्हणाले, महाराष्ट्रापुढे आमच्यातले भांडण किंवा वाद या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे!
गडबड इथून सुरू होते. शिवसेनाप्रमुख सक्रिय असताना राज हे शिवसेनेतून बाहेर पडले. राज यांचे हे बाहेर पडणे साधे, सरळ, सर्वसामान्य आणि सर्वमान्य नव्हते. शिवसेनाप्रमुखांच्या अंगाखांद्यावर राज मोठा झाला आणि आता काही तरी करतूत दाखवावे म्हणून घराबाहेर पडला, असे ते बाहेर पडणे नव्हते. ‘दादू येतो रे, भेटू लवकरच’, असे सांगून काही राज यांनी निरोप घेतला नव्हता. दादूही मातोश्रीच्या दारापर्यंत राजाला निरोप देण्यास गेला नव्हता. शिवसेनेविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करून राज यांनी तेव्हा शिवसेनाप्रमुखांनाच ललकारले. कोणतीही महाशक्ती पाठीशी नसताना इतके मोठे बंड माणूस कुठल्या ‘किरकोळ’ कारणासाठी करू शकतो? हा उठाव करताना मातोश्रीच्या चार भिंतींत असे कोणते किरकोळ कारण तेंव्हा महाराष्ट्रापेक्षा, शिवसेनाप्रमुखांपेक्षा आणि शिवसेनेपेक्षाही तेव्हा मोठे ठरले? आणि आज अचानक तेच कारण किरकोळ आणि महाराष्ट्र त्यापुढे मोठा वाटू लागला ?
हे प्रश्न घेऊन कोणीही ठाकरे बंधूंसमोर उभे नाही. कारण उत्तरे माहिती आहेत. राज-उद्धव यांची भाऊबंदकी व्यवहारावरूनच सुरू झाली आणि त्यांचे भांडण राजकीय बंधार्यांचेच आहे. आमच्यातले वाद महाराष्ट्रापुढे , मराठी माणसापुढे किरकोळ आहेत, असे उद्धव आणि राज दोघेही सांगत असले तरी दोघांचाही व्यवहारी पिंड पाहता दोघेही खोटे बोलत आहेत, हे कोणीही सांगेल. कारण एकत्र काम करण्याची राज यांची हाक आणि या हाकेला उद्धव यांनी दिलेली सशर्त साद यात बिनसलेला व्यवहार आजही उभा आहे. आजचे राजकारण हा शुद्ध व्यवहार आहे. व्यवहार जमला तर राज-उद्धव एकत्र येतील. त्यामुळे महाराष्ट्र, मराठी माणूस यांच्यासाठी एकत्र येण्याचा आव आणण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्र समोर ठेवून व्यवहाराचे बोलून घेतलेले बरे! व्यवहार जिथून बिनसला तिथून बोलणी सुरू करा. पुणे कुणाचे, नाशिक कुणाला, मराठवाड्याचे काय? आणि मुंबईचे कसे करायचे? पूर्व-पश्चिम करायचे की शहर-उपनगर वाटणी करायची? व्यवहारात नाते वगैरे असत नाही. नाते व्यवहारात वाईटपणा आणते आणि व्यवहार बिनसतो. त्यामुळे आधी व्यवहार जुळतो का पाहा.
उद्धव-राज सोबतच काम करत होते. कुणी कुणाच्या हाताखाली नव्हता. नेतृत्वाचा हा पासंग जिथे हलला त्या महाबळेश्वरी दोघेच जाऊन बसलात तरी चालेल. तुमचे नाते तुम्हाला विचारून निर्माण झालेले नाही. ते जन्मतःच तुम्हाला मिळाले. राजकीय व्यवहार मात्र तुम्ही निवडला आणि वेगळे झालात. आताही महाराष्ट्राच्या भल्याचा विचार म्हणून सोबत काम करण्याची तुमची भाषा ही व्यवहारीच आहे. म्हणून ठाकरे बंधूंनी आधी व्यवहार सांधावा. नाते तोडले तरी तुटत नसते. उद्धव-राज एकीकरणाची चर्चा सुरू झाली ती राज यांच्या मुलाखतीने. महेश मांजरेकरांनी ही मुलाखत घेतली असल्याने जिगरी दोस्ताने विचारलेले जिगरी प्रश्न असे मुलाखतीचे स्वरूप साहजिक म्हणायचे. 56 मिनिटे 54 सेकंदांच्या मुलाखतीत मांजरेकरांनी भाजप-मनसे युतीचीही चाचपणी केली. गुजरात भेटीपासून महाराष्ट्राचा स्वार्थ म्हणून राज भाजपसोबत राहिले असते तर मुख्यमंत्रीही होऊ शकले असते, अशी भन्नाट पट्टकथा मांजरेकर या मुलाखतीत मांडतात. महाराष्ट्राच्या भल्यासाठी भाजप-मनसेने एकत्र येणे गरजेचे आहे, यावर राज यांचा कौल ते घेतात. त्यावर राज यांनीही शक्यतांची दारे खुली ठेवली आहेत. राज म्हणतात, भाजपसोबत मी येणं राजकीय होईल. सगळ्याच वेव्हलेंग्थ आमच्या जुळतील असे नाही; पण राजकारणात कुठल्या गोष्टी कधी घडतील सांगता येत नाही. उद्या आमचा शेकहँड देखील होईल किंवा आम्ही समोरासमोर येऊन नमस्काराचे हात जोडले जातील.
थोडक्यात, एकाच मुलाखतीत राज यांनी उद्धवसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आणि भाजपसोबत शेकहँडची आशाही बोलून दाखवली. पुढे काय? महायुतीत चौथ्याला जागा नाही. तीन खुर्च्या मांडताना आमचीच अडचण होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे सांगून टाकले. राज यांच्या मैत्रीचा उल्लेख करूनच त्यांनी हे सांगितले. त्यामुळे भाजपसोबत मनसेचा शेकहँड हा दुपारचा चाळा म्हणून ठीक आहे. उद्धव-राज एकत्र येण्याचा मार्ग अनेक अडथळ्यांचा आहे. त्यातले दोन महत्त्वाचे. उद्धव ‘महाविकास’मधून बाहेर पडले तर आणि भाजप-शिंदे सेनेची ‘सोयीची सोयरीक’ तोडून राज स्वतंत्र झाले तरच हे भाऊ एकत्र येतील. भाजप तशी परवानगी देईल का, याचा अदमास राज यांनी आधी घ्यावा.