Rain Mumbai index | रेन मुंबई : बाजार पावसाचा 
संपादकीय

Rain Mumbai index | रेन मुंबई : बाजार पावसाचा

पुढारी वृत्तसेवा

प्रा. डॉ. विजय ककडे

पावसाचा अंदाज आता केवळ हवामान खात्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यावर थेट आर्थिक व्यवहार आणि नफा-तोट्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘रेन मुंबई’ या नव्या हवामान आधारित इंडेक्समुळे भारतीय वित्त बाजारात पर्जन्यमानावर आधारित ट्रेडिंगचा एक नवा अध्याय सुरू होत आहे.

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, यापेक्षा पडणार्‍या पावसावर किंवा कमी-जास्त होणार्‍या पावसावर पैसे मिळवण्याची संधी ‘रेन मुंबई’ या 1 जूनपासून सुरू होणार्‍या हवामान इंडेक्समार्फत मिळणार आहे. भारतात मान्सून आधारित अर्थव्यवस्था असल्याने साहजिकच कमी -जास्त पावसाचा परिणाम केवळ शेतकरी नव्हे, तर त्यासोबत बांधकाम व्यवसाय, वीज उत्पादन आणि असंख्य उद्योगांवर होत असतो.

2020 पासून देशात मान्सून इंडेक्स प्रकाशित होतो; मात्र त्याचा व्यवहार किंवा व्यापार करता येत नाही. 1 जून ते 30 सप्टेंबर या कालखंडात हवामान अंदाज दीर्घकालीन सरासरीच्या आधारे पावसाच्या संदर्भात व्यक्त केला जातो. यासाठी भारतीय हवामान खात्यामार्फत तयार केली जाणारी आकडेवारी 30 वर्षांच्या सरासरीने वापरली जाते. सेबीने प्रथमच एनसीडीएक्स या संस्थेला मुंबईसाठी पर्जन्य आधारित इंडेक्स तयार करणे व त्याच्या व्यापार्‍याला अनुमती देणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, जो 1 जूनपासून लागू होणार आहे. यामध्ये ज्यांचे कमोडिटी डिमॅट खाते आहे, त्यांना व्यवहार करता येणार आहे. हा हवामान आधारित व्यवहार असल्याने तो निश्चितच अधिक जोखमीचा असणार आहे. याचे स्वरूप समजून घेतल्यास आपणही त्यात सहभागी होऊ शकता.

‘रेन मुंबई’ हा व्यापार योग्य करार करण्यासाठी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांचा कालावधी उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला इंडेक्स खरेदी किंवा विक्री करता येणार आहे. महिन्याच्या अखेरीस त्याची पूर्तता होऊन पुढील महिन्याचा इंडेक्स घेतला जाईल. हा इंडेक्स तयार करत असताना 30 वर्षांच्या पावसाची सरासरी म्हणजे 1991 ते 2020 या कालखंडातील पर्जन्यमान सरासरी घेतले जाणार असून यापेक्षा अधिक किंवा यापेक्षा कमी एक मिलिमीटर पाऊस झाला, तर त्याचा फायदा किंवा नुकसान इंडेक्स घेणार्‍याला होईल. प्रत्येक महिन्याची पर्जन्य सरासरी मुंबईच्या बाबतीत जूनकरिता 539.7, जुलैकरिता 794.9, ऑगस्टसाठी 524.3 आणि सप्टेंबरसाठी 347.8 अशी आहे. या सरासरीपेक्षा प्रत्यक्षातील पाऊस अधिक किंवा कमी होईल, या अंदाजावर इंडेक्स खरेदी-विक्री केली जाणार आहे. या इंडेक्समध्ये लॉट साईज 50 असून प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त नऊ टक्के वाढ किंवा घट ही मर्यादा आहे.

इंडेक्सकरिता मान्सून फॉर्म्युला वापरला असून त्यामध्ये ‘प्रत्यक्षातील पाऊस वजा सरासरी पाऊस’ असे सूत्र वापरले जाते. या इंडेक्सचे ट्रेडिंग नेहमी करत असलेल्या ऑप्शन ट्रेडिंगप्रमाणेच राहणार आहे. इंडेक्सच्या एक्सपायरी दिवशी त्याची पूर्तता रोख रकमेत केली जाणार आहे. याचा व्यापार कालावधी हा सकाळी 10 पासून रात्री साडेअकरापर्यंत असणार आहे. इंडेक्समध्ये एक मिमी पाऊस वाढणे किंवा कमी होणे याच्याशी इंडेक्समधील वाढ किंवा घट अवलंबून असणार आहे. समजा एखाद्याने 50 चा एक लॉट घेतला आणि 50 मिमी इतका अधिकचा पाऊस झाला, तर त्याला 2,500 चा फायदा होईल. रेन इंडेक्समध्ये प्रथमच व्यापाराची किंवा सट्टेबाजीची सुविधा उपलब्ध होत असून त्यातून हवामानाच्या बाबतीत अधिक योग्य अंदाज मिळू शकतील. पूर्वी असलेला मान्सून इंडेक्स केवळ मार्गदर्शक होता. आताचा रेन मुंबई इंडेक्स हा मात्र व्यवहारयोग्य होत आहे. शेअर बाजारातील सट्टेबाजीचे व्यवहार नेहमीच जोखमीचे असतात. त्यातही पुन्हा हवामान आधारित इंडेक्स हे अधिक जोखमीचे असल्याने यामध्ये अर्थातच सर्वसामान्य गुंतवणूकदाराने काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. या इंडेक्सचा खरा फायदा हा सरकारलाच होणार असून प्रत्येक व्यवहारावर मिळणारे कराचे उत्पन्न हे पैशाची पर्जन्यवृष्टी करणारे ठरेल, हे निश्चित! भारतीय वित्त बाजारात नव्या पर्यायाचे स्वागत कशाप्रकारे होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT