मधुरा कुलकर्णी
काही छायाचित्रं फक्त क्षण टिपत नाहीत, ती काळाला थांबवतात. काही छायाचित्रकार असे असतात, जे केवळ पाहत नाहीत, तर जगाला ‘बघायला’ शिकवतात. रघू राय हे त्या दुर्मीळ परंपरेतील नाव. त्यांच्या जाण्याने केवळ एक कलाकार गेला नाही, तर भारताकडे पाहण्याची एक नजर हरपली आहे. रघू राय यांच्या कॅमेर्याने जे काही टिपलं, ते केवळ द़ृश्य नव्हतं, तर त्या प्रत्येक फ्रेममध्ये एक भावना, एक कथा आणि एक काळ दडला होता.
1960 च्या दशकात त्यांनी छायाचित्रण क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांच्या कामाची काही ठळक वैशिष्ट्य सांगता येतात, त्यापैकी एक म्हणजे त्यांनी ‘माणूस’ नेहमी केंद्रस्थानी ठेवला. मोठ्या घटना असोत वा छोट्या क्षणांचे तुकडे; त्यात माणसाची उपस्थिती आणि त्याची भावना हीच त्यांच्या छायाचित्रांची खरी ताकद होती. रघू राय यांनी अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रं काढली; पण त्यांनी त्या व्यक्तींना ‘प्रतिमा’ म्हणून नव्हे, तर ‘माणूस’ म्हणून मांडलं. इंदिरा गांधी, दलाई लामा असोत किंवा मदर तेरेसा; त्यांच्या व्यक्तिचित्रांमध्ये व्यक्तिमत्त्वाचा बाह्य आविष्कार नाही, तर त्यांच्या अंतर्मनाची एक झलक दिसते. हीच त्यांची वेगळी ओळख होती.
वृत्तपत्रं आणि मासिकांसाठी काम करताना त्यांनी बातमीला एक वेगळी द़ृश्यभाषा दिली. त्यांनी छायाचित्रणाला ‘द़ृश्य पत्रकारिते’च्या पलीकडे नेऊन संवेदनशील अभिव्यक्तीचं एक माध्यम बनवलं. त्यांच्या छायाचित्रांना जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळाली आणि त्यांनी भारतीय छायाचित्रणाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. पुरस्कार आणि सन्मान हे त्यांच्या कार्याची केवळ बाह्य नोंद आहेत. खरं महत्त्व त्यांच्या कामाच्या प्रभावात आहे.
ते कधीच ‘मोठ्या’ घटनांच्या मागे धावले नाहीत; पण त्या घटना त्यांच्या कॅमेर्यापर्यंत स्वतःहून येत राहिल्या. 1977 मध्ये एक कचरा उचलणारा माणूस, त्याच्या हातात इंदिरा गांधींचे फाटलेले पोस्टर आणि भिंतीवरील कुटुंब नियोजनाची घोषणा हे त्यांचे छायाचित्र छापण्यास संपादक कुलदीप नय्यर यांनी नकार दिला; पण दुसर्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तोच फोटो प्रकाशात आला.
1969 मधील त्यांचा एक फोटोही प्रसिद्ध आहे. इंदिरा गांधी कागद वाचत आहेत आणि त्यांच्या टेबलभोवती सगळे पुरुष नेते उभे आहेत. खूप बोलके छायाचित्र होते ते. भोपाळ वायू दुर्घटनेतील लहान मुलाच्या दफनविधीच्या छायाचित्रात एका फ—ेममध्ये मानवी चुकांची किंमत, निष्पापतेचा अंत आणि समाजाच्या विवंचनेचा आक्रोश असं सगळं काही सामावलेलं आहे. हे छायाचित्र लोकांच्या मनात घर करून राहिलं. बांगला देश मुक्ती संग्राम आणि त्यानंतरच्या निर्वासितांच्या छायाचित्रांमधून त्यांनी विस्थापन आणि विस्थापितांची वेदना जिवंत केली. जनरल अरोरा आणि जनरल नियाझी यांच्या भेटीचा क्षण त्यांनी नेमकेपणाने टिपला. विजेत्याच्या देहबोलीतला आत्मविश्वास आणि पराभूताच्या चेहर्यावरचं ओझं ही दोन टोकं एका फ—ेममध्ये आणणं, हीच त्यांची ताकद.
त्यांच्या फोटोंनी लोकांना विचार करायला लावलं, प्रश्न विचारायला भाग पाडलं आणि अनेकदा अस्वस्थ केलं. रघू राय यांचं जाणं म्हणजे एका युगाचा पडदा पडणं आहे. ते आपल्यामध्ये नसले, तरी अजरामर छायाचित्रांमधून ते नेहमीच जिवंत राहणार आहेत.