संपादकीय

लवंगी मिरची : पात्र आणि अपात्र!

backup backup

कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र, याची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुरू आहे. या सुनावणीचा निकाल काय लागेल, याविषयी राज्यातील जनतेलाच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांना उत्सुकता आहे. आमदारांना पात्र- अपात्र ठरवणे ही तांत्रिक बाब आहे; परंतु त्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये कोणत्या आमदारांना अपात्र केले पाहिजे, याचे निकष काही वेगळेच आहेत. म्हणजे पाहा, एकदाचे निवडून आल्यानंतर आमदार आणि कार्यकर्ते जल्लोष करतात. कारण, पुढील पाच वर्षांची त्यांची चिंता मिटलेली असते. जनतेला या सर्वांशी काही देणेघेणे नसते. त्यामुळे जनतेच्या मनात कोणते आमदार अपात्र असतील, याविषयी गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे वर्तन असणार्‍या आमदारांना अपात्र केले पाहिजे, असे आमचे मत आहे. भरमसाट आश्वासने देऊन निवडून आल्यानंतर त्यापैकी किमान दहा टक्के आश्वासने सुद्धा पूर्ण न करू शकणारे आमदार तत्काळ अपात्र केले पाहिजेत आणि पुढील दहा वर्षे त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे. बरेचसे उमेदवार निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षे मतदारसंघात फिरकतसुद्धा नाहीत किंवा जनतेला त्यांचे दर्शनसुद्धा होत नाही, अशा लोकांना तत्काळ अपात्र केले पाहिजे.

विशेषत: मुंबई आणि इतर शहरांमध्ये राहणारे काही उमेदवार आपल्या गावाकडे निवडणूक लढवतात आणि निवडून आल्यानंतर थेट पुढच्या निवडणुकीच्या वेळेला जनतेला दर्शन देतात अशा लोकांना अपात्र केले पाहिजे. बरेचदा आपण पाहतो की, मतदारसंघातील लोक तीन-चार वर्षे वाट पाहून कंटाळल्यानंतर 'आपण यांना पाहिलेत का' असे पोस्टर्स पण जागोजागी लावतात. ज्यांचा पुढे शोध घ्यावा लागेल, असे उमेदवार निवडून आले, तर त्यांना पुढील निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली पाहिजे. निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये आपल्या पुढच्या पाच पिढ्यांची तरतूद करून ठेवणारे आमदार आणि खासदार यांनाही अपात्र केले पाहिजे. कठोरपणे निर्णय घेऊन भ—ष्टाचाराचे संशयित धुके असणार्‍या निवड झालेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र करून घरी बसवले पाहिजे. ज्या लोकांची मुले, पुतणे, भाऊ आणि कार्यकर्ते मतदारसंघात दादागिरी करत असतील अशा उमेदवारांनाही अपात्र केले पाहिजे. उमेदवार नको पण नातेवाईक आवर अशी सर्वत्र स्थिती आहे.

अप्रत्यक्षरीत्या असा उपद्रव करणार्‍या उमेदवारांना किंवा लोकप्रतिनिधींना पण अपात्र ठरवले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की, अशा पद्धतीने पात्र आणि अपात्र आमदारांची निवड करायची ठरली, तर पात्र आमदार कमी संख्येने राहतील. एक लक्षात घ्या की, या गोष्टीला काहीही इलाज नाही. सध्या सुरू असणार्‍या पात्र-अपात्र सुनावणीचे जे काय व्हायचे ते होईल; परंतु जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही म्हणतो त्याप्रमाणे निकष लावून दर अडीच वर्षांनी पात्र आणि अपात्र लोकप्रतिनिधी यांना चाळणी लावून निवड केली पाहिजे आणि अपात्र लोकांना कटाक्षाने घरी बसवले पाहिजे. तर आणि तरच राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकेल. गेल्या अनेक वर्षांपासून देशासह राज्यात राजकारणाचा धुरळाच उडला आहे. कोण कोणत्या पक्षात कार्यरत आहे, हेच जनतेला कळेनासे झाले आहे. राजकारणी सातत्याने कोलांटउड्या मारताना दिसत आहेत. कोण पात्र आणि अपात्र याच्या जनतेला काहीचे देणेघेणे नाही. मात्र, खेळ आता तरी थांबायला हवा. देशात अनेक प्रश्न असताना केवळ पात्र आणि अपात्र याचीच चर्चा सर्वत्र रंगताना दिसतात. जनतेचा कळवळा असलेले अगदी कमीच राजकराणी शिल्लक राहिलेले दिसतात.

SCROLL FOR NEXT