पहिला चहा | ट्रम्पना द्राक्षे आंबट... 
संपादकीय

पहिला चहा | ट्रम्पना द्राक्षे आंबट...

पुढारी वृत्तसेवा

शांततेचा नोबेल पुरस्कार ट्रम्प यांनाच मिळेल, असे त्यांना स्वतःला वाटत होते; पण नाही. पुरस्कार मिळाला नाही. ट्रम्प यांचे स्वप्न विरले. मग, त्यांचे आकांडतांडव सुरू झाले. हा पुरस्कार कसा अयोग्य आहेपासून ते हा पुरस्कार देणारा नॉर्वे कसा अयोग्य आहे, हे सांगायला ट्रम्पनी सुरवात केली. असे केल्यानेही हा पुरस्कार काही त्यांना मिळणार नव्हताच. उलट इभ्रत गेली ती गेलीच. म्हणतात ना, 'बूँद से गयी वो हौद से नहीं आती...' पण, एवढ्यावर थांबतील तर ते ट्रम्प कसले... त्यांनी संपूर्ण नॉर्वे देशाला 'घाणेरडा देश' असे संबोधले.

इतकेच नव्हे, तर अमेरिकत नॉर्वेजियन स्थलांतरितांचे स्वागत केले जाणार नाही, असा इशाराही दिला. वास्तविक, नोबेल समिती ही स्वतंत्र समिती आहे. त्यात नॉर्वे सरकारकडून कसलाही हस्तक्षेप केला जात नाही, तरी ट्रम्प नॉर्वेलाच घाणेरडा देश म्हटले. चिडलेल्या ट्रम्प यांना कुणाला काय बोलावे, हेही कळेना. त्यांची गत कोल्ह्यासारखी झाली आहे. द्राक्षे हाती लागली नाहीत, मग द्राक्षे आंबट आहेत, ती द्राक्षे वाटणारा घाणेरडा आहे... एखादे लहान मूल परवडले. ट्रम्प हे एका मोठ्या शक्तिशाली देशाचे अध्यक्ष आहेत, असे वाटत नाही. एकंदरीत ट्रम्प यांना द्राक्षे आंबट लागली आहेत...

ट्रम्प यांच्या नाराजीच्या यादीत आणखी एक पुरस्कार जोडला गेला. पुलित्झर! ट्रम्प यांनी पुस्तके लिहिली, तरी त्यांना पुलित्झर मिळाला नाही. तीही खदखद त्यांच्या मनात आहे. उद्या ते असेही म्हणतील, 'पुलित्झर पुरस्काराच्या परीक्षकांना साहित्यातील काही कळत नाही!’ ट्रम्प यांना करण्यासारखे बरेच आहे. प्रत्येकाला बळेच पुस्तके देऊन त्यांच्या पुस्तकांची विक्री वाढवता येईल... परीक्षकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग सुरू करता येईल. पुस्तक वाचून पुरस्कार न देणाऱ्या परीक्षकांना दोष देता येईल. पुस्तक वाचण्यापूर्वीच पुरस्कार द्यायला हवा, असा नवा नियम करता येईल.

नोबेल मिळाले नाही म्हणून नोबेलवर राग, नॉर्वेवर राग आणि पुलित्झर मिळाला नाही म्हणून साहित्यविश्वावर राग, अशी ही नाराजीची साखळी सुरू राहिली, तर जगाला शांततेच्या पुरस्कारापेक्षा ट्रम्प यांच्या रागाच्या व्यवस्थापनासाठी एखादा स्वतंत्र पुरस्कार सुरू करावा लागेल. ट्रम्प यांनी थोडे समजुतदारपणे घेतले, तर कदाचित त्यांना एक गोष्ट नक्की मिळेल, थोडासा आदर! तोपर्यंत ट्रम्प यांच्यासाठी 'द्राक्षे आंबट'च असतील...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT