संपादकीय

तडका : मग अशक्य ते शक्य होईल…!

दिनेश चोरगे

समाजव्यवस्थेत सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. पण अजूनही प्रामाणिक माणसांचा सन्मान केला जातो. त्यामुळेच आपल्या देशात गाईंच्या तुलनेत महिषवर्गीय प्राण्यांना क्षुल्लक समजले जाते. गाय दिसली की पाया पडणारे असंख्य भाविक रस्त्याने फिरताना तुम्हाला दिसतील. पण तुम्ही कधी कुणाला म्हशीच्या पाया पडताना पाहिले आहे काय? कधी कुणाला रेड्याच्या पाया पडताना पाहिले आहे काय? ते होणार नाही.

गाय पवित्र मानली जाते. गायीचे दूध आरोग्यासाठी उत्तम आहे असे समजले जाते. पण त्याचबरोबर मिठाई तयार करण्यासाठी मात्र म्हशीचे दूध वापरले जाते हे विसरून चालणार नाही. म्हणजे म्हशींनी चारा खाऊन, उत्तम दर्जाचे घट्ट दूध देऊन मानवाची सेवा केली आहे. पण लक्षात कोण घेतो? तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी वेदमंत्र मुखातून वदविण्यासाठी रेड्याची निवड केली होती हे आठवून पाहा. ज्ञानेश्वरांवर टीका करणार्‍या त्या काळच्या समाजधुरिणांनी काय उपयोग आहे वेदमंत्र पठण करण्याचा? कुणाच्याही मुखातून वेद मंत्र पठण करून दाखवता का? असे त्यांना चॅलेंज केले. नेमका त्याच वेळेला एक रेडा विशेष काही काम नसल्यामुळे रमत गमत बाजूने चालला होता. ज्ञानेश्वरांनी त्याला उभे केले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय आश्चर्य! रेड्यामुखी भडाभडा वेद मंत्र बाहेर येण्यास सुरुवात झाली. खरे तर या घटनेपासून रेड्यांना एक प्रकारचे स्टेटस प्राप्त झाले आहे. वेदमंत्र पठण करून घेण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी एखाद्या बैलाची किंवा गाईची निवड केली नाही तर एका रेड्याची निवड केली हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे.

रेडे रिकामटेकडे का असतात याचे कारण आहे. एक तर ते पुरुष जातीचे असल्यामुळे म्हशींसारखे त्यांना दूध देण्याचे काम नसते. ते इतके नाठाळ असतात की, त्यांना बैलगाडीला किंवा औताला जुंपून शेती कामासाठी वापरता येत नाही. मग असा जगण्याचा कुठलाच उद्देश नसलेला एखादा रेडा उन्मत्त होऊन गावभर गोंधळ घालायला लागतो आणि माजलेला रेडा म्हणून ओळखला जातो. असा एखादा वेडा झालेला रेडा समोरून येत असेल तर लोक भयभीत होऊन पळायला लागतात. सैरावैरा धावताना तो कुणाला धडक मारेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे रेड्यापासून सावध राहण्याची काळजी तमाम जनता घेत असते.

कुणाही व्यक्तीचा प्राणी वर्गात समावेश करून उल्लेख केला की, बहुधा मानवाला समाधान मिळत असेल. उन्मत्त झालेला रेडा, भुंकणारा कुत्रा किंवा बेफाम उधळणारा घोडा ही विशेषणे माणसांना लावून त्यांचा अपमान करणे ताबडतोब बंद केले पाहिजे. या ठिकाणी आम्ही माणसांचा अपमान नव्हे तर प्राण्यांचा अपमान करणे बंद केले पाहिजे, असा युक्तिवाद करत आहोत. शिवाय एखादा रेडा उन्मत्त झाला असेल तर त्याच्या नाकात वेसण घालून त्याला जेरबंद कसे करता येईल हे पाहिले पाहिजे. उगाच कुणाला रेडा, घोडा म्हणून प्राणी वर्गाचा अपमान करू नये. समाजातील उन्मत लोकांचा मात्र बंदोबस्त करायला हवा आणि मग समाज जीवन उन्नत होत जाईल यात शंका नाही. समाजात गुन्हेगारी आणि उन्मत्त लोकांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यांना वेळीच वठणीवर आणून अशक्य ते शक्य करण्याची गरज आहे. तरच समाजव्यवस्था सुधारण्यास मदत होईल आणि माणसाचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT