(चॅनेलवर बातमीदार) जनता टीव्हीवरून बगळे आपले सर्वांचे स्वागत करतो. आपण आज चर्चा करणार आहोत चाणक्याबाई आणि विरोधक अबक यांच्याशी. खरे बाबा प्रकरणाबाबत... तर चाणक्याबाई तुम्ही सांगा, जे काही सध्या चर्चेत आहे ते!
चाणक्याबाई : आम्ही आयोग आणि तत्त्व सांभाळून वर्तणूक करतो. कर्तव्यात बाधा येत असतील, तर आम्ही पायपण धुतो. खरे बाबांना मान देणे राजकीय हिताचे आहे. त्यात खोटे काय आहे.
बातमीदार : विरोधक अबक तुमचे काय म्हणणे आहे? यात तथ्य आहे का?
विरोधक : कर्तव्य सोडून सगळं करता तुम्ही चाणक्याबाई. ज्या पायांना माती खायची सवय आहे, ते पाय कशाला धुतलेत?
चाणक्याबाई : ही तुमची अंधश्रद्धा आहे. आम्ही श्रद्धा म्हणून ही कार्ये करतो. मान तरी द्यायला हवा थोडातरी खरे बाबांना!
विरोधक : जनसामान्यांच्या श्रद्धेचा भंग, अंधश्रद्धा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे.
चाणक्याबाई : होय, तेही खरं आहे.
विरोधक : त्या तुमच्या खर्यात ना खर्रच्च.....! खोटेपणा भरलेला दिसतोय.
चाणक्याबाई : आम्ही सत्तेवर राहून खर्याचं खोटं करू शकत नाही.
विरोधक : सत्तेवर राहून पुरावा शोधावा. नुसतंच खरेपणाची साक्ष दिल्याने उंदराचे मांजर नाही होत.
चाणक्याबाई : पुरावे यत्र-तत्र-सर्वत्र आहेत. उंदरांनाही स्वातंत्र्य आहे मांजरीची साक्ष घ्यायला.
विरोधक : एसआयटी बसवायलाच पाहिजे. शोध चालू ठेवून या प्रकरणातले एकत्र लागेबांधे शोधले पाहिजेत एसआयटीअंतर्गत.
चाणक्याबाई : त्यापेक्षा आम्ही राजीनामा देतो.
विरोधक : तो तर जनतेनेच मागितला आहे. द्यायलाच पाहिजे. तुम्हाला निलंबित करून ओलीस ठेवले पाहिजे. म्हणजे या बाबाच्या करतुती अजून समोर येतील.
चाणक्याबाई : कर्तुत्व म्हणा. करतुती या शब्दाचा विरुद्ध अर्थ होतो.
विरोधक : हा खरे तर एपस्टिन निघाला. याचा एकेक बंगला कोटीचा आहे म्हणे!
चाणक्याबाई : ते त्यांनाच विचारा. आम्हाला इतर जबाबदार्यांबरोबर त्यांची सुटका कशी होईल, ही जबाबदारी आहे.
विरोधक : मला वाटते, आता आयोगाचं नाव बदला तुम्ही. निव्वळ भोंदूगिरीय....! ही तुमची नीती आयोगावर थोपवू नका.
बातमीदार : आपण ही चर्चा इथेच थांबवू. बाकी चर्चा खरे बाबांना अटक झाल्यावर. तोपर्यंत निषेधात्मक पूर्णविराम. जय हिंद!