आमच्याकडे जुने अनुभवी (मालकाच्या हातावर बसणारे) ससाणे त्यांचे वय झाल्यामुळे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नवे ताज्या दमाचे ससाणे भरती करणेचे आहेत. त्यासाठी खालील अटी, शर्थी आहेत -
1) ससाणे महाराष्ट्रातीलच असले पाहिजे.
2) त्यांना मराठी बोलता आले पाहिजे.
3) हिंदी समजता आले पाहिजे.
4) परंतु, त्याने चुकूनसुद्धा हिंदी बोलता कामा नये.
5) मुंबई, ठाणे, नवी मुंबई या इलाख्यावर उडण्याचा त्याचा अनुभव जमेस धरला जाईल.
6) कोल्हापूर, सांगली, सातार्याकडच्या ससाण्यांनी कृपया अर्ज करू नयेत. त्यांनी तिकडे कवडे, लव्हाट्या, चित्तूर, पाणकोंबड्या यांच्यावर समाधान बाळगावे.
7) सदर ससाण्याला मौल्यवान भूखंडाची (रियल इस्टेट) चांगली जाण असली पाहिजे.
8) गुजराती, बिहारी, यू.पी. आणि बंगाली वस्तीवर त्याला अधूनमधून त्यांना दिलासा देण्यासाठी भरारी मारता आली पाहिजे.
9) लुंगी नेसणारा आणि मुंबईला बॉम्बे म्हणणार्या ससाण्याला प्राधान्य दिले जाईल.
10) ससाणा धूर्त व शहाणा हवा. जेणेकरून त्याला स्वतःचा मालक व मालकाचा हात ओळखता आला पाहिजे.
11) चुकूनही त्याने वांद्रे किंवा शिवतीर्थाकडे फिरकता कामा नये.
12) मालकाच्या हातावर नको त्यावेळी त्याने बसता कामा नये.
13) शिकार केल्यावर 50 ग्रॅम एवढाच तुकडा त्याने खावा व उरलेली शिकार त्याने मालकाच्या हवाली करावी.
14) शक्यतो अडाणींशी त्याचे सौहार्दाचे संबंध असावेत.
तरी पात्र ससाण्यांनी आपला ताजा फोटो आणि प्रोफाईल आमच्या पत्त्यावर ई-मेल करावे. मुलाखतीस येणार्या ससाण्यांना जाण्या -येण्याचा खर्च व दोन वेळा तांबडा-पांढरा रस्सा यथेच्छ दिला जाईल.
महत्त्वाची टीप : परप्रांतीय ससाणे अजिबात चालणार नाहीत. त्यांनी इकडे अवतीभवती फिरकूही नये. महाराष्ट्राचा विकास हाच त्याचा ध्यास असला पाहिजे. ससाण्याच्या नावाखाली भुरट्या पक्ष्यांनी आपण ससाणा आहोत, असे भासवून फसविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना भरसमुद्रात सोडले जाईल.