मित्रा, कधीकाळी एका वॉर्डात एकच नगरसेवक असायचा. एकदा का त्याला निवडून दिले की, त्याने विकास करो किंवा न करो; परंतु जबाबदारी त्याची एकट्याची असायची. आता ही प्रभाग नावाची भानगड निघाल्यापासून मात्र सगळाच गोंधळ झालेला आहे. एका प्रभागामध्ये चार-चार नगरसेवक असतात. त्यामुळे आपले काम नेमके कोण करणार आहे, हे जनतेला शेवटपर्यंत कळत नाही.
बरोबर बोलतो आहेस तू. मागच्या निवडणुकीच्या वेळी आमच्या प्रभागातून एकूण चार नगरसेवक निवडून आले होते. विशेष म्हणजे, निवडून आल्यानंतर यापैकी एकानेही प्रभागाकडे लक्ष दिले नाही. समजा एखाद्याचे नगरपालिकेत काही काम निघाले, तर तो एका नगरसेवकाच्या घरी जायचा. तो घरी नसेल, तर दुसर्याकडे जायचा. असे फिरत फिरत त्याला एकही नगरसेवक कधी कधी भेटत नसे. याचा अर्थ चारही नगरसेवक निवडून आले आणि नंतर पसार झाले होते. एकटाच नगरसेवक असेल, तर त्याच्यावरच पूर्ण जबाबदारी असते आणि त्याने काम नाही केले, तर पाच वर्षांनंतर जनता त्याला घरी बसवत असते. आता चार नगरसेवक असल्यामुळे आणि त्यांचा कुठलाही विशिष्ट वार्ड नसल्यामुळे आपले काम कोण करणार आहे, हेच कळत नाही.
अरे मित्रा, हे तर काहीच नाही. आमच्या वॉर्डात जेमतेम दोन किलोमीटरचा कच्चा रस्ता झाला. जिथे रस्ताच अस्तित्वात नव्हता तिथे कच्चा झाला, तरी जनता खूश होत असते. या कच्च्या रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी चारही नगरसेवकांनी आपले बॅनर रस्त्याच्या दोन्ही टोकाला लावले होते. जसे जमेल तसे त्यांनी नेत्यांना बोलावून रस्त्याचे उद्घाटन करून घेतले. हा रस्ता माझ्यामुळे झाला असे चारही जणांचे म्हणणे होते. जनतेला कळेना की, हा रस्ता नेमका कोणामुळे झाला आहे? सरते शेवटी असे लक्षात आले की, नगरपालिकेचेच एक मोठे अधिकारी यांचे घर त्या रस्त्यावर असल्यामुळे तो रस्ता झाला.
‘एक वॉर्ड, एक नगरसेवक’ या पद्धतीमध्ये सकाळी किमान 12 वाजेपर्यंत नगरसेवक त्याच्या घरी सापडायचा. जनता हक्काने जाऊन त्याच्याकडून काम करून घेत असे. आता कोणाकडे जायचे हे कळत नाही. घरी कोण सापडेल याची काही खात्री नाही. आपले काम होईल हे तर देवावर सोडावे लागते. अशा स्थितीमध्ये प्रभाग नावाचा प्रकार आणणार्या माणसाला काय म्हणावे ते समजत नाही. हो, हे तर आहेच; पण यासाठी निवडणूक प्रक्रिया पण क्लिष्ट आहे. चार ईव्हीएम यंत्रे वापरावी लागतील किंवा एकाच यंत्रावर तुम्हाला चार वेळेला मतदान करावे लागेल अशी पण शक्यता असते. म्हणजे इथे पण जनता गोंधळून जाण्याची शक्यता आहेच.... यावर्षी महापौर किंवा नगराध्यक्षपद थेट जनतेमधून निवडून द्यायचे आहे की आलेले नगरसेवक निवडून देणार आहेत, याविषयी अद्याप स्पष्टता नाही.