मित्रा, आपल्या संस्कृतीमध्ये भेटीगाठींचे वेगळेच महत्त्व आहे. सणावारांचे महत्त्व म्हणजे, नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या गाठीभेटी हेच असते. गाव सोडून सगळे लोक शहरात गेल्यामुळे किमान दिवाळीला सगळ्यांच्या गाठीभेटी होत असतात. लग्नाच्या आधी होणार्या सीमंतीपूजनामध्ये नवीन होणार्या वधू-वर यांच्या कुटुंबांच्या गळा भेटी होत असतात. ईद-ए-मिलाद या सणाच्या दिवशी हिंदू-मुस्लीम भाई एकमेकांची गळाभेट घेत असतात. तू आणि मीच बघ ना? आपल्या दोघांना एकमेकांना भेटल्याशिवाय करमत नाही. आपण रोज भेटतो, नवीन चर्चा करतो, त्याची पण एक गंमतच असते.
आपले भेटणे आणि राजकीय लोकांचे भेटणे मात्र वेगळे असते भावा. राजकीय लोक एकमेकांना कोणत्याही कामासाठी भेटले, तरी त्याचे अनेक अर्थ निघत असतात. मुंबईत दोन भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या असतानाच एक भाऊ थेट निघाला आणि सकाळीच मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला जाऊन पोहोचला. दोन भाऊ एकत्र येणार, यावर शिक्कामोर्तब होण्याआधीच पत्रकार मंडळींनी एक भाऊ फुटला अशा प्रकारच्या बातम्या पसरवायला सुरुवात केली. जो भाऊ मुख्यमंत्री महोदयांना भेटला त्याने आपण रस्ते, वाहतूक यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो होतो, असे जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले. कितीही तळमळीने रस्त्यांच्या प्रश्नासाठी गेलो होतो, असे म्हटले तरीही लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. कारण, रस्त्यांचा प्रश्न स्वातंत्र्योत्तर काळापासून तसाच प्रलंबित आहे. त्यात वेगळी चर्चा करण्यासारखे असे काय होते, असा मुद्दा लोकांनी उभा केला आहे. म्हणजेच राजकीय लोकांची साधी गाठभेटसुद्धा अनेक अर्थ घेऊन येत असते.
मित्रा, तुला असे वाटत असेल की, या भेटीगाठी थेट होतात की काय? अजिबात तसे नसते असे माझे मत आहे. बरेचदा एखादा जिल्हा पातळीवरचा नेता राज्य पातळीवरील आपल्या पक्षाच्या विरोधातील नेत्याला भेटतो तेव्हा त्याचेही अर्थ वेगळे असतात. अशी गाठ भेट झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पहिला पक्ष सोडून हजारो कार्यकर्त्यांसह दुसर्या पक्षात प्रवेश केला जातो. आपल्या सामान्य लोकांच्या जशा गाठीभेटी अतिशय सामान्य असतात तशा मात्र राजकीय लोकांच्या कधीच नसतात. त्यांच्या भेटीगाठीत अनेक अर्थ दडलेले असतात.
हे बघ, काही असले, तरी गाठीभेटी होत राहिल्या पाहिजेत. कारण, तीच आपली खरी संस्कृती आहे. कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ नंतर कंपन्यांनी ऑनलाईन मीटिंग बंद करून ऑफिसमध्ये येणे सक्तीचे केले आहे. याचे कारण गाठीभेटी होत राहिल्या पाहिजेत हेच आहे. लोक प्रत्यक्ष एकमेकांना भेटतील, तरच एक संघभावना तयार होईल आणि अशा टीमवर्कमुळे कामाची गती वाढत असते, हे सिद्ध झाले आहे.