रडणारा माणूस मिळेल भाड्याने! Pudhari File Photo
संपादकीय

रडणारा माणूस मिळेल भाड्याने!

पुढारी वृत्तसेवा

मंडळी, जपानमध्ये जे घडतंय ते ऐकून तुमचेही डोळे पाणावतील; पण हसून! तिकडे काय आहे, तर ‘मॅन फॉर हायर’ म्हणजे पुरुष भाड्याने मिळतो आणि तोही काही कामासाठी नाही, तर तुमच्यासोबत बसून रडण्यासाठी! होय, होय, चुकीचं वाचलं नाही तुम्ही! ‘सोबत रडण्यासाठी किरायाने माणूस मिळेल’ अशा जाहिराती जपानमध्ये दिसून येत आहेत.

आता कल्पना करा की, तुम्ही दु:खी आहात, ब—ेकअप झालंय, सासुबाईंनी टोमणे मारले आहेत, बॉसने लेट मार्क टाकला आहे. अशावेळी तुम्ही त्याला कॉल करा, तो वेळेवर येईल, डोळ्यांत अश्रू आणि हातात रुमाल घेऊन. तुमच्या शेजारी बसून तुम्ही रडता रडता हुंदके घेत असाल, तर तोही हं, हं करत डोळे पुसतो. केवळ पाणीच नाही, तर भावनाही वाटून घेतो!

आता यावर आमचं भारतीय मन काय म्हणतंय?

आपल्याकडे असे रडणारे अनेक मिळतात आणि तेही फुकटात!

म्हणजे, अगदी रडायला नको म्हटलं तरी प्रवासात पुढच्या सीटवरचा प्रवासी स्वतःचं दु:ख उघडून बसतो. इथे लोकसंख्या पुष्कळ असल्यामुळे सगळ्या कामांना माणसे मिळतात. प्रवासात जशा सोयरिकी जुळतात, तसेच एकमेकांचे दुःखही शेअर केले जाते. आपल्या घरातील एखादी व्यक्ती निधन पावली तर भेटणार्‍या लोकांची गर्दी महिनाभर हटत नाही. लोक आवर्जून जसा वेळ मिळेल तसे येतात आणि तुमचे सांत्वन करून जातात. त्यामुळे रडण्यासाठी माणसे देण्याच्या उद्योगाला भारतात किंवा महाराष्ट्रात फारसा स्कोप नाही, हे तुमच्या लक्षात येईल.

पण, एक विचार करा, आपल्याकडे जर असा रडका माणूस भाड्याने द्यायचा बिझनेस सुरू केला तर? तुम्ही केवळ जाहिरात द्या. ‘रडायला साथी हवा? आम्ही आहोत तुमच्या सोबत!’

पॅकेजेस : बेसिक प्लॅन : वेळ 15 मिनिटे आणि भाडे 300 रुपये, सोबत डोळे पुसण्यासाठी एक टिशू पेपर फ्री मिळेल.

प्रीमियम प्लॅन : खांद्यावर डोके ठेवून रडता येईल. आमचा माणूस तुमच्यापेक्षा मोठ्या आवाजात रडेल.

स्पेशल मराठी प्लॅन : रडताना कोल्हापुरी मिसळ फ्री!

मग त्याची जाहिरात काही अशी असेल : आज रडण्याचा मूड आहे?

पण, मित्र बिझी आहेत?

कॉल करा 1800-रड-भावा-तुमचं दु:ख, आमचं ध्येय!

शेवटी काय, हसण्यामागंही अश्रू असतात आणि रडण्यामागं हसण्याची संधी! जपानी लोक मनापासून माणूस भाड्याने घेतात; पण आपल्याकडे कोणीतरी समजून घेतं हेच मोठं आहे, तेसुद्धा फुकटात आणि तुमच्या वेळेत. कारण, सहवेदना दाखविणारी आपुलकीची, घरची माणसे, मित्र आपल्या आसपास तत्पर असतात.

तर सांगा, तुमचा ‘क्राईंग बडी’ कोण आहे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT