उन्हाळा संपूर्ण राज्यात भरात आहे आणि ऊन मी म्हणत आहे. प्रवासात किंवा सहज फिरायला घराबाहेर पडलात तरी आजूबाजूला निसर्गात पाहा. तो आपल्याला आहे त्या परिस्थितीत जगण्याची प्रेरणा देत असतो. साधे गुलमोहराचे उदाहरण घ्या. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ऊन तापायला लागते. सूर्यनारायण आग ओकायला लागतात. उन्हाचे बॉयलर उष्णता फेकायला लागते, त्याच वेळेला गुलमोहराचे पहिले फूल प्रकट होते. जसजसे ऊन वाढत जाते तसतसा गुलमोहराला बहर यायला सुरुवात होते. मे महिन्यामध्ये तापमान जेव्हा सर्वात अधिक असते त्यावेळी गुलमोहर पूर्ण बहरलेला असतो आणि फुलांच्या सावलीचा शीतल गारवा येणार्या-जाणार्या लोकांना देत असतो.
विपरीत परिस्थितीमध्ये फुलण्याची क्षमता आपल्या अंगी असली पाहिजे, असे निसर्ग आपल्याला सांगत असतो आणि आपण डिप्रेशनच्या गोष्टी घेऊन बसतो. अशीच परिस्थिती बहावा या झाडाचीही असते. प्रखर उन्हाळ्याला न जुमानता बहरणारे दोन वृक्ष म्हणजे बहावा आणि गुलमोहर. त्याचप्रमाणे चाफा, पळस आणि अशा असंख्य वनस्पती यांनी बहरण्यासाठी उन्हाळा या ऋतूची का निवड केली असेल हे समजून घेतले पाहिजे. सर्व काही अनुकूल असेल तर कोणीही कर्तृत्व दाखवू शकेल. पण काहीच अनुकूल नसताना म्हणजे पाण्याची कमतरता, थेट डोक्यावर पडणारे तीव्र असे ऊन यांना न जुमानता बहरणारे हे वृक्ष प्रेरक व्याख्याने देणार्या वक्त्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे तुमच्या लक्षात येईल.
संकटाशी झुंज देत बहरण्याची ही प्रवृत्ती बघितली तर तुम्हाला कधीच डिप्रेशन येणार नाही. त्यासाठी मोबाईल स्क्रीनवरची नजर हटवून थोडे निसर्गाकडे पाहण्याची पण सवय लावून घ्यावी लागते.
असेच आणखी एक उदाहरण आहे. प्रशस्त हायवेवरून दुतर्फा वाहने धावत असतात. दोन्ही बाजूच्या चौपदरी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर असतात. त्या डिव्हायडरमध्ये काळी माती टाकून झाडे लावण्याचा नियम असतो, म्हणून कंत्राटदाराने निर्विकारपणे कण्हेरीसारखी रोपे लावलेली असतात. येणार्या-जाणार्या प्रत्येक वाहनाच्या वेगामुळे वारे वाहते आणि ही रोपे दिवस-रात्र अक्षरश: वेडीवाकडी झुलत असतात. पण तुम्ही पाहिलेत तर तरीही ती मूळ धरतात आणि मोठी होतात. पण मोडत नाहीत कधीच आणि हो, त्यांना फुलेही येतात. बहर आला की, बहरून जातात ती. चोवीस तास थापडा खाऊन न डगमगता जिद्दीने उभे राहण्याची प्रेरणा निसर्ग देत असतो. सर्वात मोठी प्रेरणा देण्याची क्षमता निसर्गातच असते. निसर्ग आपणास सर्व काही शिकवत असतो. पण आधुनिक काळात त्याची फिकीर कोणालाच नसल्याचे पाहायला मिळत असल्याचे चित्र आहे. निसर्गाची झालेली हानीच हवामानाचे चक्र बदलत असल्याचे चित्र आहे.