सर्वसामान्यांची अपेक्षा..! Pudhari File Photo
संपादकीय

सर्वसामान्यांची अपेक्षा..!

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या कामाचा धडाका

पुढारी वृत्तसेवा

कोणतेही सरकार असो त्याने जनतेची कामे तत्काळ मार्गी लावावीत हीच अपेक्षा आहे. आता आपल्या महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून धडाधड कामे व्हायला हवीत. जनतेची तरी काय अपेक्षा असते त्यांची कामे कोणत्याही कटकटीविना पार पाडावीत. एक उपमुख्यमंत्री तर नुकत्याच काश्मीरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर थेट श्रीनगरला पोहोचले आणि त्यांनी तिथून राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत पाठवण्याच्या प्रक्रियेला गती दिली. दुसरे उपमुख्यमंत्री खंबीर प्रशासनासाठी सर्वत्र ओळखले जातात. केवळ पुणे, बारामती नाही तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ते लक्ष ठेवून आहेत, असे दिसून येते. मुख्यमंत्री देवाभाऊ हे तर नेहमीच आपल्या कामात व्यस्त असताना दिसतात. राजकीय नेत्यांबाबत, सोशल मीडियावर काहीही लिहिले जाते, स्वपक्षातील लोकही पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याचा आता काही त्यांच्या कामावर फरक पडताना दिसत नाही.

उपमुख्यमंत्री दादा यांनी आपल्या कठोर स्वभावाला मुरड घातली असून क्वचित ते मिश्कील विधाने करतात. आपल्या स्वभावातील हा बदल त्यांनी मुद्दाम आणि प्रयत्नपूर्वक घडवून आणला आहे. आमचे सरकार अक्षरशः दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सात दिवस म्हणजेच वर्षाचे 365 दिवस सुट्टी न घेता काम करत आहे, असे ते नेहमीच सांगत असतात हे विशेष! अशी जनतेची सेवा करणारे राजकर्तेच राज्याला हवे आहेत, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे. दादा नेहमीच सांगत असतात की, मी पहाटे चारला उठतो, फिरायला जातो, व्यायाम करतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो. त्यानंतर मी रात्री दहा-अकरापर्यंत काम करतो. ते पुढे असेही म्हणाले की, 11 ते 2 मुख्यमंत्री काम करतात आणि शिंदे पहाटे दोन ते चार काम करतात. याचा अर्थ आमचे सरकार चोवीस तास काम करत आहे. अशा 24 तास काम करणार्‍या सरकारला जनतेने आशीर्वादच दिले पाहिजेत.

आमचे म्हणणे मात्र थोडेसे वेगळे आहे. या महोदयांना विनंती आहे की आपण सर्वजण अथक काम करत राहा; परंतु दिवसभरात थोडा वेळ आरामाचा असला पाहिजे. किमान आठ तास दररोज झोप झाली पाहिजे तर आरोग्य चांगले राहते, असे सगळे डॉक्टर सांगतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये म्हणजेच प्रत्येकाने आठ तास काम केले तरी 24 तास सरकार जागे राहील, यात काही शंका नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा धडाका पाहता त्या प्रत्येकाने किमान आठ तास आराम केला पाहिजे, असे सुचवावेसे वाटते. सरकार शिफ्टमध्ये काम करो किंवा न करो; परंतु लोकांची कामे होत राहिली पाहिजेत, ही आजच्या काळाची निकड आहे. लालफितीचा कारभार अत्यंत कासवगतीचा आणि सामान्य नागरिकांना वैताग आणणारा असतो. जनतेच्या ग्रामीण भागातील फायलीपासून ते थेट महानगरी मोठ्या फाईलींचा प्रवास झपाट्याने होत राहिला तर सरकार गतिमान आहे असे वाटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT