आज महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्याचा समारोप होणार आहे. जसजसा शेवटचा दिवस जवळ येत गेला तसतशी ही पर्वणी साधण्यासाठी गर्दी वाढत गेली. शेवटच्या टप्प्यात उरलेसुरले लोक जाऊन आले. विशेषत: काही राजकीय नेते ज्यांनी अद्याप संगमावर डुबकी मारली नव्हती, त्यांनी पण ती परवा साधून घेतली आणि आणि त्यांनी पुण्य मिळवण्याचा प्रयत्न केला.
पर्वणी काळामध्ये संगमावर डुबकी मारल्यामुळे आजवर केलेल्या सर्व पापांचे क्षालन होत असते, अशीच संपूर्ण भारतीय लोकांची भावना आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या दाव्यानुसार या काळात देशभरातील सुमारे साठ कोटी लोकांनी संगमावर स्नान केले आहे. गेले दीड महिना सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर आबालवृद्धांनी स्नान केल्याचे फोटो आणि व्हिडीओ झळकले आहेत. देश-विदेशातील नेते, अभिनेते यांनीही संधी वाया न घालवता पापक्षालन करून घेतले आहे. राजकीय लोकांना याचे विशेष महत्त्व असावे असे वाटते. याचे कारण म्हणजे, त्यांच्याकडून विविध प्रकारचे कारनामे झालेले असतात. जनतेला दिलेल्या आश्वासनांना विसरणे हेही एकप्रकारचे पापच समजले पाहिजे. जाहीरनामा, वचननामा अशा प्रकारातून जनतेला जे भुलवलेले असते त्याचे पापक्षालन खरे तर ही कामे पूर्ण करून केले पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये जगताना राजकीय नेत्यांना फार मोठ्या तडजोडी कराव्या लागतात आणि मग त्याचा उतारा म्हणून कुंभमेळ्यामध्ये हजेरी लावून किमान आपण प्रायश्चित घेतले आहे आणि आपल्यावरचा कलंक मिटवला आहे अशी त्यांची भावना होत असावी.
सामान्य लोकांनी मात्र आटापिटा करत कुंभमेळास्थळी हजेरी लावली असे आपल्या लक्षात येईल. उत्तर प्रदेश सरकारने उत्तम व्यवस्था केली होती, तरी परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल अशी त्यांनाही अपेक्षा नसावी. आपल्या देशात लोकसंख्येचा स्फोट झालेला असल्यामुळे कितीही तयारी केली, तरी ती कमीच पडते असा आपला अनुभव आहे. गर्दी झाली की, चेंगराचेगरी होते आणि त्यात जीव जातात हे मात्र प्राधान्याने टाळले पाहिजे. महाकुंभमेळा सोडला, तर आपल्याजवळच नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा भरणार आहे. तिथेसुद्धा तेवढीच गर्दी होईल यात शंका नाही. काही कारणामुळे जे लोक यावर्षी प्रयागराज या ठिकाणी जाऊ शकले नाहीत, ते नाशिकमध्ये जाऊन गंगेमध्ये स्नान करू शकतात. पाप आणि पुण्य या संकल्पना भारतीय जीवनावर मोठाच पगडा ठेवून आहेत. या जन्मी पुण्य केले, तर पुढील जन्म चांगला मिळतो अशीही लोकांची भावना आहे. ऐतिहासिक असा कुंभमेळा भरवून देशामध्ये धार्मिक पर्यटनाला फार मोठी चालना मिळाली आहे. जगभरातील नागरिकांनी या कुंभमेळ्याला हजेरी लावून आपल्या महान संस्कृतीचा संदेश सर्वत्र पोहोचविला आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान हे दोन्ही घटक भारतीय संस्कृतीचा आत्मा आहेत. कुंभमेळ्यामुळे या दोन्ही बाबींना बळ मिळाले आहे असे आपल्या लक्षात येईल.